कुठेही मुका मार बसला, मसल दुखावला गेला, रक्त साकळलं की रक्त चंदन आणि आंबेहळद सहाणेवर उगाळून घ्यायची. ते मिश्रण एखाद्या पळीत तापवायचं आणि सोसवेल इतकं गरम असतानाच दुखावलेल्या जागी लावायचं. सकाळ-संध्याकाळ हा लेप लावून ठेवावा. दुखण्याच्या तीव्रतेनुसार दोन चार दिवसात बरं वाटतं.
तर काल सहाणेवर आंबेहळद आणि रक्तचंदनाची बाहुली उगाळत होते. कमरेवर हात ठेवलेल्या रखुमाई सारखी ही एकसंध गडद मरुन कलरची रक्तचंदनाच्या लाकडाची बाहुली बहुदा जत्रेतून किंवा दवासाजच्या दुकानात मिळत असावी.
माझ्या आयुष्यातील पहिली सहा सात इंची तब्येतदार अशी बाहुली मी माझ्या पायातून अपंग होऊन आयुष्यातली निदान दहा बारा वर्ष एकाजागी बसून, फरकत फरकत जुजबी वैयक्तिक कामं करणा-या आणि बहुतांशपणे परावलंबी झालेल्या माझ्या आजीच्या (आईची आई) संदूकीत पाहिली होती. 'संदूक' हा माझ्या या आजीचाच खास शब्द. हा शब्द जरी कानावर आला तरी तब्येतीपुढे अगतिक होऊन हाताशी-उशाशी असलेल्या या एका पत्री कुलूपबंद संदूकीत तिला बहुमुल्य वाटणारा संसार वा ऐवज जपणारी आजीच आठवते.
लहान वयात ती लाकडी ठोबळ बाहुली, बाहुली म्हणूनच आवडली होती. पण आपली पत्नी पायाने ठणठणीत होऊन निदान माफकपणे तरी स्वावलंबी व्हावी यासाठी माझ्या निसर्गोपचार प्रेमी आजोबांनी वृध्दपकाळातही जंग जंग पछाडून जे सगळे उपचार तिच्या साठी केले होते त्यातला एक उपचार या भक्कम रक्तचंदनी बाहुलीचाही असावा अशी मला खात्री आहे.
ही माझ्या घरात असलेली बोटभर उंचीची रक्तचंदनी बाहुली. कुठे घेतली आता आठवत नाही.
मागच्या वर्षी शहरातल्या खादीभांडारातून एक लहानखोरा रक्तचंदनी ब्लॉकही घेतलाय. भरपूर किंमत मोजून. प्रश्न किमतीचा नाहीये पण अजूनही खादीभांडारसारख्या संस्था महागड्या का वाटत नाहीत, पण खरेपणाची, अस्सलपणाची ग्वाही देत ग्राहकांना डोळे मिटून खरेदी करायला उद्युक्त करु शकताहेत हीच गोष्ट लाखमोलाची आहे.
तर सहाणेवर एखादा जिन्नस उगाळणं आणि अतिशय फाईन पावडर करणं यातही बराच फरक असतो. कुणी आयुर्वेदाचार्य यावर प्रकाश टाकू शकतील. उगाळणं म्हणजे घर्षणातून फाईनेस्ट पार्टिकल्स होणं असं असावं कदाचित. म्हणूनच बाळगुटी नेहमी उगाळून देतात. बाळगुटीची रेडीमेड पावडर मी तरी आजतागायत पाहिली नाही.
तर ते असो.
सहाणेवर जोर लावून एखादी गोष्ट-जिन्नस उगाळणे, उगाळताना सहाणेवर त्या उगाळलेल्या पेस्टमधेच नागमंडलासारखे फॉर्मस तयार होताना, घट्टसर होत जाताना बघणं, त्या जिन्नसाचा रंग सहाणेवर उतरणे, आसपास त्या जिन्नसाचा दरवळ पसरणे या सर्व गोष्टी हल्ली मला फार मेडिटेटिव्ह वाटतात. एखादी गोष्ट एकाच दिशेने उगाळतांना आपले विचार मात्र अष्टदिशांनी फिरुन येतात.
एखाद्या व्यक्तीला त्याच त्या गोष्टी फिरवून सांगायची सवय असली की ती व्यक्ती गोष्टी उगाळतो असं आपण म्हणतो. विशेषतः प्रौढ गृहिणी-महिलांच्या बोलण्याला हे उगाळण्याचं लेबल सहसा पुरुषप्रधानतेतून फार लावलं जातं.
मध्यमवयातील या महिलांच्या या मानसिकतेच, सवयीचं हसही केलं जातं. दुर्दैवाने जुन्याच गोष्टी या वयात इतक्या बारकाव्याने, तडफेने का उगाळल्या जाताहेत या कळीच्या मुद्द्यापर्यंत कोणीच पोहंचायचे कष्ट घेत नाही. हसीं मज़ाक मधे सगळं साचलेले, तुंबलेलं रफ़ा दफ़ा होऊन जातं, केलं जातं.
हं तर काय सांगत होते ?
रक्तचंदनी बाहुली !
प्राचीन काळापासूनच सहाणेवर उगाळायला रक्तचंदनी बाहुला न बनवता बाहुलीच बनवली आहे हे किती समर्पक आहे ना ?
उगाळायला, झिजायला आणि आरोग्यही नीट करायला बाईचं किंवा बाईचच रुप लागतं, वा चर्चेत रंग भरायला बाईचच नाव उगाळावं लागतं.
सदियोंसे जमाना काफी समझदार है !
No comments:
Post a Comment