Tuesday, 8 September 2020

चक्कू...छुरिया...तेज करालो...

चक्कू..छुरिया...तेज करालो...

So Aai let's have sauteed veggies for dinner.
आता असं लेकीने म्हटलं की आपली गत इकडे आड तिकडे विहीर अशी होते. एक तर लेक उत्साहाने स्वैपाकघरात खुडबुडतीये याचं कवतिक करावं की ते सॉते्ड व्हेजीज म्हणजे समोर नक्की काय वाढण येणारे याची धास्ती घ्यावी. पण अस्मादिक समंजस आई असल्यामुळे सॉते्ड तर सॉते्ड म्हणत खुले दिलसे होकार दिला. 
पण मग एकूणच रागरंग बघता मनात म्हटलं या सॉते्डचा एग्झाक्टली अर्थ तरी काय बरं ? आधीच इंग्रजी म्हटलं की आपल्या काळजाचा ठोका चुकतो त्यात नेक्स्ट जनरेशनने सॉते्ड व्हेजीज करायला हातात चाकू घेतलाय म्हटल्यावर तर विचारायलाच नको. 
म्हटलं उगा रातच्या पारी भडका भडकी नको. आपल्याला फक्त सोते हुवे ही हिंदी शब्द रचना वा गेलाबाजार सौतन हेच शब्द माहिती होते. 
पण म्हटलंना अस्मादिकांना आपल्या इंग्रजीचा लई म्हणजे लईच कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे कुठ्ठं काही इंग्रजीचं खुट्टं वाजलं की अस्मादिक मोबाईलमधली डिक्शनरी पिंजूनच काढतात. 
एक बहोत पुरानी आदत है ये अपनी. 
आज तर काय आयताच सॉते्ड खुराक मिळणार होता. बसले डिक्शनरी पिंजत.

आई...घरात एकही चांगला चाकू नाहिये का ? I don't know how do you manage with these knives ? तुला ऑन लाईन चाकूंचा सेट मागवून देऊ का ? हे असले चाकू पाहिले की मुडच जातो भाज्या कापायचा.
आता लेकीला काय सांगू ? घरात एक जुन्या पद्धतीची विळी, अंजली कटर, दोन-तीन काम चलावू चाकू, दोन बडे चाकू एवढा ऐवज असतांना देखील कशाला अजून नवीन चाकू हवेत ? आणि भाजी कापण्याचं कौशल्य त्या चाकूत नसून आपल्या हातात असतं हेही लेकीला कसं पटवून देऊ ? आणि चांगली धार असलेल्या अंजली कटर वर अतिशय उत्तम प्रकारे भाजी कापण्यात अस्मादिक माहिर आहेत हेही तिला कसं सांगू ? कुठल्याही चाकूने उत्तम भाजी कापू शकण्याच्या स्वत:च्या कौशल्यावर व घराघरातनं विविध प्रकारचे  चाकू, कटर्स, श्रेडर्स, चॉपर्स गठ्ठ्याने बाळगणा-यांच्या अतिरेकी श्रीमंती हौसेवर आपल्या मिडल क्लास मातेने हे थोरले लेख फेसबुकवर लिहून लोकप्रियता मिळवली आहे हे या पोरीला कधी कळेल आता ?
....अगं धार गेलीये सगळ्यांची म्हणजे... चाकूंचीच हं.
जातेच आता गावातल्या धारवाल्याकडे किंवा तो दारावर येणारा धारवालाही हल्ली येतोय का ते बघते.

Oh Aai...what a long term program. आपलं काम आत्ता अडलंयना ? You don't know how good knives work. These चाकूज are so irritating. You start using good chakus, then you will realise what I mean. मागवू का ऑनलाईन ? 
...As long as तुझ्या अकाऊंटवरनं मागवणार असशिल तर माझी काही हरकत नाही. Otherwise I am happy with my vilis and cutters and knives.
Aaaiii.....
एकुणच भाज्या चिरता चिरता चाकूला आणि सं'वादालाही धार लागत होती. म्हटलं आता फार ताणायला नको. नसता आसपासचे सगळेच धारी-बिनधारी चाकू वापरात आले असते.

तर ही अशी अस्ते बरं जनरेशन ग्याप. 
फक्त धर्मबाह्य प्रेमसंबंध, जातीबाह्य लग्नसंबंध, परकिय भाषाप्रेम, परदेशागमन, मोदी-राहूल असल्या शेलकी मुद्यांवरच जनरेशन ग्याप गुद्यांवर येत नसते. 
या जनरेशन ग्यापला भलतेच अलवार वा धारधार पापुद्रे असतात ते असे. 
ते ज्याचे त्यालाच कळतात आणि सलतात बरे.

No comments:

Post a Comment