Saturday, 7 November 2020

एक चद्दर..

लेकीने एखादी जुनी चादर throw away साठी मागावी आणि आपल्या निसंगतेचा कस लागावा.
या कोरोनाग्रस्तीच्या काळात कशाचही आक्रितच वाटायलंय.

आई एखादी पातळ पण पक्की डबलबेडची टाकावू चादर देतेस का ?
बघते हं.
घरामधे ह्या ढीगभर चादरी. चढत्या भाजणीच्या क्रमाने जुने-या, टाकावू झालेल्या. पण एक देखील चादर या क्षणी देऊन टाकण्या योग्य वाटेना.
या आठ-दहा नवसर चादरी तर वापरातल्याच आहेत. आणि यंदा तर दिवाळीतली हॅन्डलूम्सची प्रदर्शनही यायची शक्यता नाहीये. ठेवा बरं सांभाळून सटीकपणे आपल्या चादरी.

मग जुन्या आणि काही वर्षांच्या स्टॉक मधल्या चादरींमधल्या गठ्ठ्यामधल्या चादरी भराभर नजरेखालून घातल्या तर
ही काय सुंदर ब्लॉक प्रिंटची आहे...नक्कोच काढायला.
ती काय फिक्कट रंगाची गहु-पापड वगैरे वाळवायला वेळप्रसंगी कामी येईल...
ही तर भलतीच पाणी एॅबसॉर्बंट आहे, जास्तीची भांडी-कुंडी धुतली की बरी येते भांडी पसरवून वाळवायला...
ती तर इस्त्रीच्या टेबलासाठी फारच चपखल आहे...
हिचे काय सुरेख हात-पाय पुसणी होतील...
तिला काय हिरण्यच्या धबडग्यात पाठवून देता येईल...
हिचा वापर गोधडीसाठी करता येईल...
त्या पातळ चादरीचा ब्रशेस-रंग पुसायला बरा उपयोग होईल...
अरारा..रा....रा ! 
हि-ती, हिचं असं-तिचं तस्सं असं करता करता एकही चादर देऊन टाकण्या योग्य सापडेना वा वाटेना.

कस्काय व्हायचं आपलं ? 
एवढ्या पंधरा-वीस वापरातल्या चादरीतंन एक चादर आपल्या हातून येनकेन कारणे सुटेना आणि आपण संसार त्याग कसला डोंबलाचा करणार ? 
हा सोंसार म्हणजे खरंच जालीम मोहमाया आहे. 
साठी जवळ याय लागलीयै.
साठी नंतर वानप्रस्थाश्रम अस्तोय म्हणे. आणि आपला तर अजूनही एकेका चादरीत गृहस्थाश्रमी जीव अडकलेला.
परमेश्वरा तुच आहेस रे बघायला आणि हा गुंता सोडवायला देखील.

No comments:

Post a Comment