सुखाचे धागे...
छान पाऊस. मस्त हवा. संततधार पावसाच्या निमित्ताने मातीकाम करणा-या स्टाफने पण बुट्टी मारलेली.
सो मलाही काही काम नाही. खोलीतही बसवत नाही आणि झिम्माड पावसात फिरवतही नाही. चक्क रेस्टॉरंट मधे भरतकामाचं काम घेऊन बसले.
तीनेक वर्षांपूर्वी हॅन्डलूमच्या प्रदर्शनातून घेतलेलं टसरचं कापड आणि ओढणी. कुर्ता शिवूनही दोन वर्ष झालेत. या कुर्त्यावर न भरतकाम केलं, ना शिवला तसा हा कुर्ता घातला पण. शेवटी या लॉक डाऊनच्या काळात या कुर्त्या-ओढणीवर मेहरनजर पडली आणि या झिम्माडी मधे अस्मादिकांच्या सिध्दहस्ताची मोहर या ओढणीवर उमटली.
तशीही मी फार वैविध्यपूर्ण आणि मोठं मोठे डिझाईन्स छापून आणणे आणि मग बारकाव्याचं किचकट भरतकाम करणे या विचारांची नाही. प्लेन वा अंगच्याच रेषा वा चौकडी वा माफक फुलं पानं असलेले माझे कपडे असतात. त्यात परत शिवतांनाही जरा रेषा-चौकोन-गोल-डिझाईनचा भरतकामा योग्यतेने विचार करुनच ड्रेस शिवून घेते. त्यामुळे ड्रेस-कुर्ता शिवून आला की भरतकामासाठी म्हणून बाजूलाच पडतो. जशी मर्जी असेल आणि वेळ मिळेल तसा या वेटिंग लिस्टमधल्या कपड्यांचा नंबर लागतो.
या काळ काम वेगाने माझ्याकडे कधीही चार दोन कुर्ते भरतकामासाठी म्हणून वेटिंगमधे तयार असतातच. तशीच ती रंगबिरंगी रेशमंही काही डझनांनी उपलब्ध असतात, आणि सुया देखील पंचवीस तीस आरामात घरात पहुडलेल्या असतात.
त्यामुळे साहित्य नाही म्हणून काम अडत नाही. तरी देखील कधीतरी एका ठराविक रंगाच्या रेशमासाठी अडतंच, पण त्याही साठी उठसूट बाजार गाठायला मला काही वाटत नाही.
तर सध्या या खादीसारख्या गाठीदार अदरबदर दो-यांनी विणलेल्या टसर सिल्क ओढणीचा नंबर लागला आहे. खरंतर कुडत्यावरच भरतकाम करायचं होतं. पण हल्ली जरा आपल्या पश्चात मुलीला-सुनेला आपले दिलोदिमागसे केलेल्या भरतकामाचे कपडे जावेत, त्यांनी ते जपून वापरावेत, जपावेत असं फार वाटतं. त्यातही आपणच भरतकाम केलेलं असेल्यामुळे आपलही जरा पसाभर काळीज त्या कपड्यांवर नक्षीच्या रुपाने विखूरलेलं असतंचना. आपला हा वारसा कृतीने जरी नसला तरी रुपाने तरी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जावा असं खरोखरंच वाटतं. तर सगळा सारासार विचार करता सध्या या ओढणीचा नंबर लागला आहे.
भरतकामाचही तंत्र असतं. ज्या कापडावर भरत काम करायचं त्या कपड्याची घट्ट आणि सैलसर वीण, वार्प(लांबीतले उभे धागे) आणि वेफ्ट (रुंदीतले आडवे धागे)साठी वापरलेल्या धाग्यांची जाडी, प्रत, सुतांची संख्या वगैरे अशा ब-याच गोष्टी असतात. टेक्स्टाईलच्या भाषेत याला प्रत्येकी इंचातला काऊंट म्हणतात. जितका धागा बारीक आणि घट्ट विणलेला म्हणजे जास्त काऊंटचा कपडा असेल तितकं बारकाईने सफाईदार भरतकाम करता येतं. विशविशीत विणीच्या व गाठीदार आडवे धागे असलेल्या कापडावर भरतकाम करणं अवघड असतं. काही लिमिटेशन्स येतात. या ओढणीला तेच झालं.
नागपूर जिल्ह्यात टसरचं विणकाम करणा-या ब-याच सोसायट्या आहेत. औरंगाबादला दर दिवाळीत इंद्रायणी नामक प्रदर्शन घेऊन ही मंडळी येत असतात. पण हल्लीची महागाई, पॉवरलूमसारखी सफाईदार-चटपटीत कापडं निर्माण करायची या सोसायट्यांची असमर्थता आणि हॅन्डलूम सिल्कला जनतेचा आर्थिक वरदहस्त न मिळणं त्यामुळे दरवर्षी या कापड निर्मितीला खिळ बसत चालली आहे. तरी देखील विणाईमधे थोडेफार बदल करुन, उभे-आडवे दोरे कमीप्रतीचे वापरुन, इंचातला उभ्या-आडव्या दो-यांचा काऊंट कमी करुन, काटकसर करत या सोसायट्यांमधे अजून तरी धुगधुगी आहे. हं, तर सांगायचा मुद्दा, या लॉकडाऊनच्या काळात मी बरीच नेटसॅव्ही झाले आहे. वेळ आहे. ऑनलाईन भरतकामाचं बरंच काही बघत-शोधत बसते. So I was very much inspired to do elaborate kantha work on this silk chunari. कांथा काम जर खरोखरच सफाईने केलं तर तो भरतकाम केलेला कपडा दोन्ही बाजूंनी वापरता येतो. आणि माझी ही तर ओढणीच होती. So I was determined to use kantha stitch.
ओढणीवर कमी-अधीक जाडीचे वेफ्टधागे वापरुन अंगचेच पट्टे तयार होते. त्या पट्ट्यांचा आधार घेत सरसर धावदोरे घातले. ( रेशमांच्या दोन-चार लडी कमी पडल्यामुळे सटीकपणे मध्यंतरी तोही बाजार करुन आले होते) मधल्या इंचभरच्या पट्ट्यात कांथा स्टिचमधेच पण फूलं-पानं करायचा बेत होता. पण हाय. सिल्कचे धागे कमी वापरुन ही टसरची कापडं स्वस्त करायच्या नादात विणकरांचा वार्प आणि वेफ्टचा असमान काऊंट बघता ही ओढणी अशाप्रकारच्या नजाकती भरतकामाला योग्य नव्हती. लांबीतले धागे अतिशय बारीक आणि बहुदा सिंथेटिक असावेत. पण रुंदीतले आडवे धागे (वेफ्ट) मात्र टसर रेशमाचेच आहेत. पण ते धागे जरा कमी सफाईने पिळे मारलेले आणि कमी-जास्त जाडीचे गाठीदार धागे आहेत. खादीसारखे. बघता क्षणी कापड उत्तमच दिसतंय. उलट पट्टेदार अदरबदर धाग्यांमुळे एक छानसा खादीसारखा आदबशीर फिल आला आहे. बारीक आणि आदरबदर आडव्या धाग्यांमुळेच एकाच रंगात दोन शेडचा आलेला लूक, काळ्या रंगाची करवती वा टेंपल बॉर्डर असलेली ही ओढणी दिसते खूप छान, अंगावर घ्यायला पण छान वाटते. पण हल्लीच्या महागाईच्या काळात या विणकरांच्या सोसायट्यांना लागलेली घरघर बघून विणकरांनी धाग्यांमधे केलेल्या या वार्पमधल्या चोर बदलांमुळे मला माझ्या कांथा कामाला आवर घालून त्यातल्या त्यात वरच्यावर दोरे ठळकपणे राहतील अशा टाक्यांची निवड करावी लागली. कारण इतक्या असमान जाडीच्या आणि विरळ विणीच्या कपड्यावर अतिशय बारकाईचं भरतकाम करणं मला तरी अशक्य होतं. त्यामुळे त्यातल्या त्यात मला सुटसुटीत वाटेल असा फंडा मी राबवला. ऍक्च्युयली मला जसं हवं होतं तसं भरतकाम या कापडावर मी मुळीच करु शकत नाहीये, वा जे करत आहे ते फारसं आकर्षकही दिसत नाहीये. पण हातात काम घेतलंय, आता पुर्ण करायलाच हवं.
पण हा अनुभव घेताना मी आपल्या पुर्वज कलाकारांसमोर अजूनच नतमस्तक झाले. औरस चौरस भारतात भरतकामाचे इतके नमुने, प्रकार आणि वैविध्य आहे की एकेकाचे मासले बघूनच आपण थक्क होतो.
पण त्याही पेक्षा जास्त वैविध्य कपड्यांच्या विणींमधे आहे. सुती आणि रेशमी कापडं हे भारताचे कापड उद्योगातले बालेकिल्ले. कापसाला पिकवायला योग्य असलेली विस्तिर्ण जमीन आणि सुती कापडंच वापरायला योग्य असलेलं उष्ण हवामान. अक्षरशः प्रांतोप्रांती सुती-रेशमी कापडं आपापल्या वकूबाने बनवायचे लघू उद्योग कार्यरत अाहेत. तसेच आपापल्या प्रांतातल्या कपड्यांचा उपयोग जाणून घेत, त्या कपड्यांच्या सुताचा, विणीचा अभ्यास करुन वैविध्यपूर्ण रितीने त्या कापडांवर छपाईच्या, भरतकामाच्या कलाकृतींची मोहर आपल्याच ग्रामीण जनतेने प्राचीन काळापासून इतकी चपखलपणे उठवली आहे की आपण हा बावनकशी कलाबुतीचा पसारा बघूनच थक्क होतो. प्रत्येक टाका, छपाईची पध्दत आत्मसात करताना उपलब्ध कापडाला, त्याच्या उपयोगाला पुर्णांशाने जाणूनच या कलाकारांनी त्या त्या कलाप्रकाराला, कारागिरीला एका चरम बिंदूला नेऊन ठेवलंय. मग तो सिंधी टाका, कर्नाटकी कशीदा, कांथा, कश्मिरी टाका, आरसेकाम असो वा छपाईचं कूठलही तंत्र असो. It's a perfect amalgamation of art and materials.
आता माझ्या विषयाकडे वळू. कापडाचं पोत आणि उपयोग बघून त्या त्या प्रकारचं भरतकाम त्या कपड्यांवर करण्यात आपले पुर्वज तरबेज होते. आपल्या पुर्वजांच विणीचं ज्ञान आणि त्या विणीला सुयोग्य ठरेल अशा भरतकामातल्या टाक्यांचा वापर करणं, सुयोग्य टाक्यांचा शोध लावणं पाहिलं की मी अचंबित होते.
आज एकविसाव्या शतकात मी ज्या कारणासाठी अडखळले त्या अडचणींवर आपल्या पुर्वजांनी कधीच मात केली आहे. विशविशीत कापडावर कशा पध्दतीचं भरतकाम होऊ शकतं हे भरतकाम करणाराच काय, कापड शिवणारा देखील छातीठोकपणे सांगू शकतो. इतका नजदिकी सहवास असल्यामुळे ही जाणकार मंडळी नजरेनी, स्पर्शानेच कापड जोखून सल्ला देऊ शकतात. तर आपल्या या भरतकामातल्या टाईम टेस्टेड शहाणपणा मुळे मी पुन्हा एकदा भारुन गेले आहे.
भरतकाम हा विषय माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा आहे. भरतकाम करणं म्हणजे स्वत:साठी ताना घेत सुरेल गाणं गुणगुणणं.
Nothing more !
कालंच जगप्रसिद्ध भारतीय रॉक गायिका उषा उथ्थुप यांचा गुफ्तगु मधला इंटरव्ह्यु ऐकत-बघत होते. गाण्या नंतर बाईंचं दुसरं पॅशन कोणतं असेल तर सलवार कमीज शिवायचं. आता बोला ?
So three cheers for the community !
No comments:
Post a Comment