खळाळत्या प्रवाहात ती अचानकपणे पण सहेतुकच पडली वा तिला पाडलं गेलं. बेसावधपणे पडल्यामुळे ती हडबडली आणि तिच्या हडबडण्याने आसपास आगंतूक बरेच चटोर तरंग उठले.
अखंड आणि अव्याहत वाहणारा प्रवाहच तो. कुठे उंचावरुन, कुठे खाच खळग्यातून, कुठे रेताडा-माताडा-खडकातून. कुठे ढकलून दिल्यासारखा धपकन पडणारा, कुठे वळणाला कवेत घेत संथ होणारा तर कधी लेकरांसारखा खळखळणारा तर कधी घमासानी भोव-याचं रुप घेणारा प्रवाह.
या अशा चपळ प्रवाहात ती अवचितपणे सापडली. पडता क्षणी भेलकांडली पण मग लगेचच सावरली. पण एकाबाजूने येणारा खळाळता प्रवाह तिला सुधरु देईना. तोल सांभाळता सांभाळता ती पूढे खेचली गेली. पण पुढच्या घमासानी भोव-यात स्वत:ला सांभाळणं तर तिला मुळीच जमेना. दोन-तीन वेळा तर बुडाली, गेली असं वाटावं अशीच परिस्थिती झाली. खाली वर येत, नाकातोंडात पाणी जात ती हताशपणे त्या भोव-याच्या स्वाधीन होऊन गोल गोल फिरत राहिली. नाका तोंडात पाणी जाऊन जगते का मरते अशी अवस्था होत अर्निबंधपणे ती बराच वेळ गिरकत राहिली.
मग परत त्या खळाळत्या प्रवाहाची एक संयत लाट आली आणि हिची त्या जीवघेण्या भोव-यातून सुटका झाली आणि थोडीशी सुरक्षित अशी ती काठाकाठाने प्रवाहीत झाली. पण तो प्रवाह म्हणजे अविरत, अखंडपणे परिक्षा बघणारा देवच जणू. खडकावर आपटून परत एक उन्मादी लाट ती जिथे होती तिथे थडकली आणि परत तिला त्या धसमुसळ्या प्रवाहात खेचत घेऊन गेली. आता भोव-यातल्या तरु किंवा मरु सारख्या तुफानी गिरक्या नव्हत्या पण चार हात पुढे तर दोन हात मागे या गतीने तिचा पेंड्युलम झाला. खरंतर या प्रवाहातलं दूरवरच असं शांत व अंतिम ठिकाण तिला खुणावतंय. तिची पण धडपड त्या सुनियोजित प्रवासात सामिल होत त्या अंतिम स्थळी पोहंचायचीच आहे, पण हा मधला धुमश्चक्री प्रवाह तिला तिच्या इच्छित स्थळी मनाजोग्या पध्दतीने पोहोचू देत नाहिये. ती हतबल झालीये या धसमुसळ्या प्रवाहा पुढे. ती अगतिक झाली आहे या बेलगाम वहावल्या जाण्या मुळे.
आता तिने असहाय्यपणे पांढरं निशाण फडकवल्यासारखं त्या प्रवाहामधे स्वतःला समर्पित करुन टाकलयं. आता ना त्या भव-यांच्या गर्ततेची चिंता ना त्या परिणाम शून्य हेलपाट्यांचा त्रागा. अंगावर थडकणा-या प्रवाहाला अंगोपांगी झेलत ती स्वत:च प्रवाहाचा एक अविभाज्य घटक झाली आहे. त्यामुळे स्वतःचा बचाव करणं, स्वतःच संरक्षण करणं, समोरच्याला धुळ चारणं, विरोध मोडून काढणं या सगळ्या युध्द सदृश्य गोष्टींचा निकाल लागला आहे. प्रवाहाशी तह केल्यामुळे आता ती अतिशय समंजसपणे आला क्षण झेलत, त्या प्रवाहाचं बोट राजीखूशीने पकडत तिच्या गंतव्य ठिकाणी प्रस्थान करत आहे.
शुभम् भवतू !
गोंधळलात ना ?
काही नाही हो, श्रावणी सोमवारचा दमदार व्यायाम झालायै. खोली साफ करायला हाऊस किपिंगचा मुलगा आलाय. मी व्यायामानंतरचा फलाहार म्हणून केळ खात गॅलरीत उभी आहे. खालच्या प्रवाहाचा जोर आजमावण्यासाठी केळ्याची साल नेम धरुन पाण्यात टाकली आहे. खालच्या खळाळत्या प्रवाहातलं त्या सालीचं भरकटणं, भेलकांडणं, प्रवाहित होणं बघून हे लिखाण सुचलं हो...बाकी काही नाही.
हॅप्पी मंडे !!
No comments:
Post a Comment