Friday, 31 July 2020

21#कोरोनाकेसाईडइफेक्टसऍंडडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह

अशीही रेटारेटी.

कोरोना व्हायरसच्या भुकंपामुळे मानवी जीवनात जी काही गडबड झाली आहे ति काही अजून सुरळीत व्हायची लक्षणं दिसत नाहीयेत. गेले चार महिने झाले लॉक डाऊन झालंय, शट डाऊनचे बाऊटस येऊन गेले तरीही कोरोनाचा उच्छाद संपत नाहिये. हळूहळू जनता आपापल्या परीने पुर्ववत जगणं आत्मसात करत आहे तरी देखील पुर्वीसारखी वाहतुक, बाजार, मनोरंजनाची ठिकाणं, लग्न-समारंभ, जत्रा, भंडारे, सणवार या सगळ्याच उत्सवी आणि रेटारेटीच्या गोष्टींना खिळ बसली आहे. म्हणजे माफक समुहात काही गोष्टी चालू आहेत पण आपल्या भारतीयांना ज्या गर्दीची, कोलाहलाची भरपूर सवय आणि थोडी आवडही असते तसा सीन कुठे हल्ली दिसत नाहीये.
पण मग जो तो घरात बसून आहे त्यामुळे पिंजऱ्यातल्या वाघासारखा अस्वस्थ आहे. पहिले पंधरा दिवस विनोद, गहू-तांदूळ निवडणे, फोडण्या घालणे, भांडी घासणे या गोष्टी करण्यात, त्यावर विनोद करण्यात हसत खेळत गेले. मग आंबे खाऊन लंबे तडांग झोपा काढण्यात उन्हाळा सरला. पण आता जुलै महिना आला तरी कोरोनाचं थैमान चालूचै. शाळा, कॉलेजेस, बाजारपेठा बंद तरी किती दिवस ठेवणार ? पण लॉक डाऊनमुळे शैक्षणिक संस्था देखील बंदच ठेवाव्या लागत आहेत. काही लोकांचं आत्यंतिक गरजेचे शिक्षण डळमळीत झालंय, काही जणांच्या छंदांना खिळ पडलीये तर बहुतेकांच्या रोजीरोटीला ग्रहण लागलंय. घरात नुसतं बसून वेड लागायची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या ऑनलाईन दुकानांची, छंदांची, शिकवण्यांच अक्षरशः पेव फुटलंय. हे खरं तर सगळ्यांच्याच हितासाठी आहे आणि काळाची पावलं ओळखून पावलं टाकणही गरजेचं आहे पण माझं लिखाण जरा विनोदी अंगाने मी पेश करत आहे म्हणून जरा वेगळा टोन आहे.
So take it easy guys.

या लॉक डाऊनमधे एप्रिल-मे मधे जरा विविध विषयांवरचे ऑनलाईन माहितीपर टॉक्स सुरु झाले. काही जणांचे पर्यटनावर, कुणाचे संगितावर तर कुणाचे कलेवर. लंब्या चौड्या कडकडीत उन्हाळ्यात हे विविधरंगी नावीन्यपूर्ण टॉक्स बरे वाटले पण जसं जसं लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला तसं तसं या ऑनलाईन टॉक्स, वेबिनार्स, शेयरींगचा भडीमार रुपी पसाराही खूप वाढत गेला आहे. 
आता रोजच्या दैनिकातही आपण भरपूर जाहिराती बघतच असतो पण जेव्हा या ऑनलाईन जाहिराती-पोस्टस तुमच्या मोबाईलवर, तुमच्या भिंतीवर सातत्याने एक कतारसे यायला लागल्या तर सुकूनभ-या प्रायव्हसीचा अधिक्षेपच वाटायला लागतो. 
आता जो या त्याच्या आवडीच्या, छंदाच्या वा व्यवसायाची गरज म्हणून या पोस्टी पाठवतो तो त्याच्या जागी बरोबरच असतो. पण रोजच अशा माझ्या दृष्टीने बिनकामाच्या साताठ पोष्टी मला यायला लागल्या तर मी वैतागणारच की नाही ? Because whether you like it or want it, they are sent to you.

सुरवातीच्या लॉकडाउनच्या नवलाईत काही गृहिणी मैत्रिणी गात्या झाल्या, काही जणी बेकर्स झाल्या. काही जणं चित्रकार झाले, काही जणं वादक झाले. काही जणी नथी घालून मिरवल्या, काही जणी नऊवारीत गिरकल्या, काही जणींनी दुस-यांच्या कविता वाचल्या तर काही जणांनी स्वत:च्याच कविता ऐकवल्या. गानकलेला तर अष्ट दिशांनी धुमारे फुटले. बसल्या ठिकाणी ज्याला जे रुचेल ते त्यानं-तिनं केलं-ऐकलं-बघीतलं. सादर करणा-यांच कौतुक केलं. 
पण आता संथगतीने का होईना आयुष्य पुर्ववत येतंय. जमेल तेवढी आपणही आपली व्यावसायिक-वैयक्तिक कामं नव्या रुपात मार्गी लावायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे सुरवातीच्या लॉकडाऊनच्या काळासारखा शारिरीक आणि मानसिक निवांतपणा आता कुणाजवळ नाहिये.
आलेल्या संकटाला शिंगावर घेत जगण्याचं नविन गणित समजावुन घेत जो तो दैनंदिन जगण्याला भिडत आहे. त्याचाच एक अपरिहार्य भाग म्हणून सध्या जो तो ऑनलाईन बाजारपेठ उभी करत आहे, शाळा भरवत आहे, सर्विसेस देत आहे. आणि त्यासाठी लोकांपर्यंत पोहंचायला सोशल मिडिया हा सगळ्यात सुलभ मार्ग आहे. तोही एका क्लिकवर बसल्या ठिकाणी सहजपणे करता येण्यासारखा.

पण त्यामुळे झालंय काय की नेट ऑन केलं रे केलं की त्या भसंभसं ओतल्यामुळे फसफसुन येणाऱ्या बियरसारख्या या पोष्टी येऊ लागल्या आहेत. म्हणजे सणावारीच्या बाजारात किंवा जत्रेत जशी रेटारेटी असते ना तशीच रेटारेटी या ऑनलाईन माहितीपर पोस्टींची सोशल मिडियावर झाली आहे. 
म्हणजे बाजारात आपल्याला दोन-तीनच गोष्टी घ्यायच्या असतात पण बाकीची गर्दी, झुंबड आपण झेलतोच की तसाच फिल मला हल्ली नेट सुरु केलं की यायला लागलाय. 
या नेट्बाजार मध्ये काय मिळत नाही ?
शिक्षण, ट्युशन्स, सर्व दर्ज्याच्या सगळ्या कलांचे ऑनलाईन शिक्षण, घरपोच भाज्या-किराणा बाजारहाट, घरपोच जेवणाचे डबे-पार्टी फूड, सेलिब्रेशनचे केक्स, ब्युटिशियन्स, ब्युटी प्रॉडक्ट्स, औषधं, सणावारीचं डेकोरेशन-पदार्थ, साड्या-दागिने, पेंटिग्जची विक्री...आता काय म्हणजे काय कायच सांगू ? 
भरीस भर श्रावणातली भजनं, भक्तीगीतं, रागमाला, शास्त्रीय संगीत-वाद्यांच्या मैफिली, असंख्य विषयांवरचे वेबिनार्स, ऑनलाईन कोर्सेस-वर्कशॉप्स...
अक्षरश: भेंडाळून जायला होईल एवढं सगळं ऑनलाईन उपलब्ध होतंय. नुसत्या पोष्टी वाचता वाचताच तास दोन तास उडताहेत. सगळंच जर बघत-ऐकत बसलो तर चोवीस तास देखील पुरणार नाहीत अशी अवस्था आजच झाली आहे. पुढचा काळ कसा असेल माहित नाही. पण ही ऑनलाईन रेटारेटी मला तरी बुचकळ्यात टाकणारी नक्कीच आहे. कदाचित पुढचं आयुष्य याच सहा-याने बहुतेकांना काढावं लागेल. 

दुनियादारी नहीं बदली लेकिन उसकी चाल तो जरुर बदली है. जसं एका वयानंतर लोकांना गर्दी, रेटारेटीत जायला नको वाटतं, सार्वजनिक कोलाहल सहन होत नाही. तसंच काहीसं या सोशल मिडिया वरच्या या ऑनलाईन रेटारेटीमुळे होईल असं वाटतंय. 

कोरोनापुर्व काळात या फेसबुक आणि व्हॉट्सॲप मुळे दुधं ओतू जायची, भाज्या करपायच्या, नळं-इस्त्र्या चालू रहायच्या, रस्ते चुकायचे, सिग्नल्स तोडले जायचे, गाड्या-रेल्वे चुकायच्या पण आत्ताच्या या ऑनलाईन रेटारेटीला मनःपुर्वक न्याय देत बसलोत तर आयुष्यही युं संपेल की काय असं वाटतंय. म्हणजे सोशल मिडियाचं सृजनशील रुप हळूहळू बदलत जाऊन एक व्यावसायिक प्लॅटफॉर्मचं, बाजारपेठेचं रुप तिला येत चाललंय.
तंबूत शिरलेला उंट असा काहीसा एक वाक्प्रचार आहे.
तो वाक्प्रचार मला इथे आवर्जून आठवतोय. 

हा कोरोना कुछ लेके जा रहा है तो कुछ देके भी तो जा रहा है. 
सही या गलत ये आनेवाला कलही बतलायेगा.

No comments:

Post a Comment