Friday, 31 July 2020

मुळ पुरुष... पाऊस !

हा जो हिरण्यचा लोकप्रिय धबधबा आहे ना तो आहे यादव-मुगलकालीन तीन तलावापैकी शेवटच्या तलावाचा ओव्हर फ्लो. पश्चिमेकडचा धबधबा.

हा तलाव म्हणजे डोंगरांच्या घळीतल्या चिंचोळ्या जागेत आसपासच्या किनारीच्या डोंगरांवरच पावसाचं पाणी एकत्र होऊन बनलेला आहे. असाच एक इतिहासकालीन तलाव पुर्वेकडच्या डोंगरावरच्या डोंगरमाथ्यावर पण बांधलेला आहे. तो तलाव भरला की ते पाणी वाहवत आणून खालचे तीन टेरेस टाईपचे टप्प्यांवरचे तलाव भरवले जात असत.
आमची बाऊंड्री असलेला हा तिसरा व त्यातल्या त्यात रुंद व प्रशस्त तलाव आहे. या तलावापासून दौलताबादचा किल्ला किमान एक दिड किलोमीटर दूर आहे. या तलावाला विस-पंचवीस फूटी रुंद आणि तिनशे फूट लांब भिंत बांधून धरणासारखं अडवलाय. आणि इथुनच मग काही ऐतिहासिक ओपन वॉटर चॅनल्स, तसेच काही बांधीव टेराकोटा पाईप लाईन्सनी हे पाणी किल्ला आणि आसपासच्या परिसरात पोहंचवलं जात असे. किल्ल्याच्या समोर एक रॉयल टर्किश बाथ पण  होता-आहे. तिथेही एका पाईप लाईनने पाणी पुरवठा होत असे. डोंगरांच्या कुशीत दर्या हिरण्यची आणि उत्तर-दक्षिणेकडे प्रशस्त डोंगर रांगा असलेल्या औरंगाबादची इतिहास कालीन पाणी पुरवठा योजना अचंबित करणारी आहे. (आणि सध्याची पाणी पुरवठा योजना मात्र खजील करणारी आहे, हे ही तितकंच खरं) 

तर सांगायचा मुद्दा मी गेली पंचेचाळीस वर्ष औरंगाबादला रहात आहे आणि गेली वीस वर्ष हिरण्यला नियमित येत आहे. हिरण्यच्या निमित्ताने आमचा एकूणच इतिहास हा विषय आवडीचा झाला आहे. आणि आमचं हिरण्य तर मॉन्युमेंटसच्या कुशीतच वसलेलं आहे. साहजिकच इथला छप्पा छप्पा माहित करुन घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो.

पण माझ्या पाहण्यात मराठवाड्यात, औरंगाबाद परिसरात कायम कमी पाऊस असतो. म्हणजे एखादं वर्ष बरा पाऊस तर पुढचे तीन वर्ष चढत्या भाजणीचे कोरडे दुष्काळ. त्यामुळे मला नेहमी आश्चर्य वाटायचं एवढ्या माफक पावसासाठी एवढे तीन चार तलाव बांधणे, दोन-तीन किलोमीटर्सच्या पाईप लाईन्स डोंगराळ भागातून फिरवणे अशी जबरदस्त कामं का केली असतील बरं ? तेही दौलताबादसारख्या सैनिक छावणी परिसरात ? त्यातही ही सगळी यंत्रणा शंभर टक्के फक्त पावसावर अवलंबून असलेली. योग्य प्रमाणात पाऊस आला तर यंत्रणा कामी येणार नसता विहिरी असतातच सहाय्याला. असो तेव्हांचे राज्यकर्ते काही वेडे नव्हते. असेल काही त्यांचही गणित त्यावेळचं.

पण यंदा या कोरोनामुळे जनजीवन, प्रदुषण करणारी, उष्णता निर्माण करणारी सगळी वाहनं, कारखाने अशंत: ठप्प झालेली होती. त्यामुळे की काय माहित नाही पण यंदा आमच्या मराठवाड्यात, औरंगाबादला पाऊस अगदी शिस्तीत आला आहे. म्हणजे वक्त पे आये और दुरुस्त ही आये असं म्हणत पावसाची नजर उतरवायची वेळ आता आली आहे. गेले आठ दिवस झाले रोज रात्री दमदार पाऊस येतोय, सकाळी चट्ट ऊन पडतंय. 
मागच्या शनिवारी आमचा पश्चिमेचा पहिला धबधबा धुवांधार वहायला लागला तर कालच्या पावसामुळे पुर्वेकडचा धबधबा वहायला लागला आहे. ठिकठिकाणी ओहळ वहाताहेत, पाण्याबरोबर माती वाहिल्यामुळे उतारांवर लेह लड्डाखसारखेच पण मिनियेचर घळी, डोंगर  जागजागी तयार झाले आहेत. दिवसाढवळ्या पाण साप ऐटीत पोहताना दिसताहेत. थोडक्यात मध्य पावसाळ्यातच आमच्याकडे पाणी ओतप्रोत झालेलं आहे. अजून तर पुढचे दोन महिने जायचेत. 
म्हणजे असा अंदाज लावायला हरकत नाही की जर मानव निर्मित प्रदुषणामुळे होणारा निसर्गामधला अधिक्षेप थांबवला तर परत आपण जुन्या निसर्ग वेळापत्रकाला, त्याच्या काही शतकांपुर्वीच्या नैसर्गिक रुपाला पुनर्जन्म देऊ शकतो. 

जर हजार वर्षांपूर्वी इथल्या डोंगरदऱ्यात असाच तब्येतीत पाऊस पडत असेल तर ठिकठिकाणी पाणी अडवून पाण्याला स्ट्रिमलाईन करुन आसपासच्या मानवी वसाहतींपर्यंत पाणी पोहंचवण्याच्या या योजना रास्तच आहेत की नाही ? 
यंदाचा पाऊस बघता आम्हालाही हिरण्यला काही कामं तातडीने करुन घेणं भाग आहे. निर्बंध नसलेल्या निसर्गाच्या, पावसाच्या सगळ्या लहरी आणि मुळ रुप जाणून घेत आम्हालाही काही फेरफार करावे लागतील.

सुनिता देशपांडे यांच्या आहे मनोहर तरी या 
आत्मचरित्रात एकदा त्यांनी आणि पुलंनी दौलताबादच्या घाटात ढग फुटीचा अनुभव घेतल्याचा उल्लेख आहे.

तर अशी आहे इथल्या मुळ पुरुष पावसाची कथा.
कोरोनामुळे आपण थोडे काय थांबलो आणि हा निसर्ग अशा मुळ रुपात उसळून आपल्यासमोर आलाय. 
शिस्तीत आणि मुळ रुपात आलेल्या यंदाच्या पावसाने खरोखरच विचार करण्यासारखी आणि मुख्यतः तातडीने आत्म परिक्षण करण्याची वेळ आपल्यावर आणली आहे. भारतासारख्या कृषीप्रधान उपखंडाने तर नक्कीच या गोष्टीचा विचार करायलाच हवा. नसता आदिम मानवी वसाहतींना उद्युक्त करणारा, आपल्या संस्कृतीला पोसणारा हा पाऊस आणि या वाहत्या नद्या नक्कीच आपल्याला शापीत करतील. 

कर्मयोगाकडे एका वेगळ्या नजरेने पहाणं आणि परखड आत्मचिंतन करणं ही आता काळाची गरज आहे.

अर्थपूर्णपणे ये रे, ये रे पावसा..तुला देते पैसा,
पैसा झाला खोटा..पाऊस आला मोठा...
हे बालगीत खरं ठरलंय.
Amen !

No comments:

Post a Comment