तसा यंदा आमच्याकडे पाऊस वेळेवरच आला. पण कोरोनाच्या मळभापुढे या अनाहत पावसाची दखल म्हणावी तशी घेतली नाही गेली. आता वेळेवर जरी आला असला तरी माफकच पाऊस झाला. दोन-चार सरी जोरात येऊन गेलेल्या, चार सहा हलक्या सरी आल्या बरेचदा नुसतं मळभच दाटलं. पण ते काही असो, कायम पावसाच्या प्रतिक्षेत असणा-या आम्हा औरंगाबादकरांना एवढं सुध्दा तोंडी लावणं पुरतं. त्यामुळे हमारी नजरमें अच्छासा माहौल बना है. त्यात सध्या आम्ही हिरण्यला रहातोय. त्यामुळे पावसाळी कामांनी जोर पकडलाय. अधूनमधून पाऊस पडत असला तरी काय होतंय की अधूनमधून अक्षरशः आरस्पानी चटका ऊनही पडतंय. या ऊन्हाचा व्यक्तिश: फार त्रास होतो. परत नको ते तण, वेली-झुडपं भसाभस वाढतात. सुरवातीला पावसाने तरारलेली आणि ऊन्हाने माखलेली ही पोपटी हिरवाई नजर निववते. पण या हिरवाईत उभं राहून काम करायची वेळ आली की किडे-मकोडे-डास-मुंगळ्यांचा फार त्रास होतो. कुठेही पाऊल टाकताना जपूनच रहावं लागतं. डासांचा तर त्रिखंडात संचार होतो. खरंतर इतकी झाडंझुडं असून देखील हिरण्यला डास फार कमी असतात. पण सध्याच्या आमच्या साफसफाई मुळे आणि या उनपावसाच्या खेळामुळे डास खूप वाढलेत.
म्हणजे गेले तीन महिने झाले रोज संध्याकाळी सहाच्या पुढे आम्ही आपापली कामं (मोबाईल-आयपॅड वापरणे, गाणी ऐकणे) करत डिनर होई पर्येंत लॉनवरच बसायचो. पण गेले १५-२० दिवस झाले अवचित येणाऱ्या पावसाच्या सरी आणि हल्लेखोर डासांच्या झुंडींमुळे आम्ही लॉनवर बसणं थांबवलंय. कव्हर्ड रेस्टॉरंट मधे बसलं तर लाईटकडे आकर्षित होणा-या किड्यांचा त्रास आणि अंधारात बसलं तर डासांची आक्रमणं. थोडक्यात संध्याकाळी मोकळ्या हवेत दोन तास आपापल्या कामात गर्कपणे बसायच्या दिनक्रमाला खीळ बसली आहे. सहा नाही वाजत की मी खोलीतच बसते हल्ली. भले मग किती का उदास वाटेना. दिवसातल्या चोविस तासातील संध्याकाळचा हा प्रहरबदल तोही बंदिस्त खोलीतला फार कंटाळवाणा असतो. बाकी दिवसभरातले प्रहरबदल बिनबोभाट होतात. एकेका प्रहराचही प्राक्तन अस्तयं.
हं..तर काय सांगत होते ? हल्लीच्या कंटाळवाण्या संध्याकाळीबद्दल.
एवढ्यातच शहरात गेले होते. तर काही कामानिमित्त एका पुस्तक प्रकाशकांच्या ऑफिसमधे जावं लागलं. कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात वा प्रदर्शनात गेलं की खिशाचा अंदाज घेत निदान एक तरी पुस्तक मी विकत घेतेच घेते. It's my promise to myself.
मग भलेही ती पुस्तकं कपाटाचं का धन होईना पण प्रदर्शनातून वा दुकानातून एक तरी पुस्तक घेतल्याशिवाय पायरी उतरायची नाही म्हणजे नाही. अगदी वीस रुपयांच रांगोळीच पुस्तक घ्या का चाळीस रुपयाचं झटपट सुप्स-सलाड्सच पुस्तक घ्या का एखादं आत्मचरित्र घ्या.
नो इश्युज.
हं तर लगे हाथ त्या ऑफिसमधून तीन पुस्तकं विकत घेतली आणि हिरण्यला आले.
डासांनी जबरदस्तीने थोपवलेल्या संध्याकाळच्या बंदिवासावरचा अक्सिर रामबाण म्हणून ही पुस्तकं वाचायला घेतली.
ही पोस्ट या पुस्तकांविषयीच लिहायची आहे. पण नमनालाच दोन-चार घडे पाणी गेलं.
पण वाचकांची हरकत नसावी.
असो.
तर पहिलं पुस्तक वाचलं पुरुषोत्तम बेर्डे लिखित 'क्लोज एनकाऊंटर्स' हे. बेर्डेंच बालपण आणि बरचसं तरुणपण कामाठीपुरा या मुंबईतल्या भागात गेलंय. कामाठीपुरा आणि जवळपासच्या परिसरातल्या, त्याकाळातल्या व्यक्तीरेखा आणि त्या संस्कृतीला, समाजाला टिपणारं हे जबरी पुस्तक आहे. वयाच्या पन्नाशीनंतरही हा कामाठीपुरा, फोरास रोड एकदा तरी बघायची, तिथलं दिनरहाटी, संस्कृती जाणून घ्यायची मला अनिवार इच्छा आहे. त्यामुळे दिसता क्षणी हे पुस्तक उचललं आणि सर्वप्रथम वाचायला घेतलं.
जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातला रेड लाईट एरिया आणि त्याच्या आसपासच्या कोळ्याच्या जाळ्यासारख्या विणलेल्या मानवी वसाहतीतील अस्सल पण उघड्या नागड्या कथा, माणसं, त्यांचे व्यवहार पहाणं, जाणून घेणं फार चकीत करणारं असतं. हा तर आपल्याच संस्कृतीचा, इतिहासाचा भाग असणारा आपलाच कामाठीपुरा. इथली माणसं, त्यांच आयुष्याला थेट भिडणं, कधी गळा कापत, तर कधी जीवाला जीव देत. बेर्डेंसारख्या संवेदनशील कलाकाराने टिपलेला हा १२-१५ वर्षांचा कालावधी फार ह्रद्य आहे. नुसती रंगारंग माणसंच नाही तर तिथल्या आयकॉनीक ऐतिहासिक इमारती आणि गल्ल्या देखील आपली उत्सुकता फार चाळवतात. इथल्या काही व्यक्ती तर इतक्या दिलचस्प आहेत की त्यांच्यातला कहरी विखार किंवा तळहातावरच्या थेंबासारखा माणुसकीचा मोती बघून आपण थक्क होऊन जातो. उत्तर आयुष्यात बेर्डेंनी या व्यक्तीविषेशांना त्यांच्या नाट्यकृतींमधे सकसपणे आणलंय यातच या परिसराची सांस्कृतिक आणि सामाजिक समृध्दी कळते.
बहिष्कृत असा हा कामाठीपुरा आपल्यासारख्या शुचिर्भूत मध्यमवर्गियांच्या जवळ आणवण्यातच बेर्डेंच आणि ओघानेच या खदखदणा-या परिसराच यश आहे.
दुसरं पुस्तक आहे सरिता आवाडांच 'हमरस्ता नाकारताना' हे.
एका सुशिक्षित ब्राह्मण घरातील सुशिक्षित मुलीने एका दलित पण सुशिक्षित मुलाशी लग्न करायच्या आधीचा आणि नंतरचा हा पट आहे. मला हे पुस्तक विकत घेईपर्यंत या सुप्रसिद्ध पुस्तकाविषयी माहित नव्हतं. पण वाचायला घेतलं आणि अक्षरशः हातातून ठेववेना.
अतिशय निर्ममपणे आपलं बालपण, लेखिका आई-वडील, लेखिका आणि भाऊ अशा चौकोनी कुटुंबातले बाणे आणि असंख्य ताणे लेखिकेने यथायोग्य उकल करुन मांडलेत. ( मी फेसबुकवर या पुस्तकाविषयीचे काही वादही वाचले नंतर. आत्मचरित्रात्मक लिखाण म्हटलं की उलट-सुलट गोष्टींची वाच्यता होतेच)
मला या पुस्तकातलं सर्वात जास्त काय भावलं असेल तर एका ब्राह्मण, सुशिक्षित, सुसंस्कृत घरातली सामाजिक पुरुषप्रधानता, त्या वर्चस्वाचा घरातल्याच पुढारलेल्या, आत्मभान असलेल्या स्वतंत्र मतवादी महिलांवरचा पगडा, मग त्या समाजमान्य चौकटीत आपलं कुटुंब बसवायची त्या महिलांची धडपड लेखिकेने छान टिपली आहे. तसेच नंतर तिचं एका होतकरू दलित मुलाच्या प्रेमात पडणं, त्याच्या आयुष्यात डोकावताना जातीच्या उतरंडीचे खोलवरचे व्रण जाणवणं, कुटुंबियांच्या मनाविरुद्ध जाऊन त्याच तरुणाशी विवाहबद्ध होत त्याच्या कुटुंबियांशी समरस होण्याचा प्रयत्न करणं हे एक विचार करायला लावणारं पाऊल आहे. पण तदनंतरची त्याही घरातली पुरुषप्रधानता, नवरेशाही, महिलांची कुचंबणा अशा अनेक गोष्टींची जाणीव होणं हेही फार स्पष्टपणे आणि विश्लेषणात्मक लिहिलंय. कदाचित इथे उहापोह होऊ शकतो. पण मला काय भावलं ते म्हणजे कुठल्याही जातीत, समाजात असलेली, घट्टमुट्ट स्थिरावलेली अशी सर्वांगिण पुरुषप्रधानता, त्या प्रधानतेला स्वाभाविकपणे मान्य केलेल्या महिलांची मानसिकता, त्याविरुद्ध आवाज उठवणा-या महिलांची घुसमट आणि त्यामधे कायम बळी गेलेला, जात असलेला स्त्री पुरुषांमधला सुसंवाद आणि अमुल्य असं कौटुंबिक आणि सामाजिक सहजीवनसुध्दा. यामुळे जातीभेदाचा पाया अजूनच भक्कम होत जातो ते वेगळंच.
फार छान पध्दतीने या तिढ्याचा उकल करायचा प्रयत्न या लेखिकेने केला आहे. सहजीवनाची अनिवार ओढ असलेली आणि तथाकथित वेगळ्या वाटेवरची ही लेखिका ब-याच परंपरागत गाठी तिच्यापरीने उकलायचा प्रयत्न करते आणि अतिशय तरलपणे त्याचं विश्लेषण करते ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे.
तिसरं पुस्तक म्हणजे सुप्रसिद्ध कानडी लेखक एस एल भैरप्पांच ' मी भैरप्पा' हे आत्मचरित्र.
भैरप्पाचा नावलौकिक मला दूरुनच तोही माफकपणेच माहित होता. त्यांचं एकही पुस्तक मी वाचलं नाहिये. पण वाचायचा मानस नक्कीच आहे. म्हणूनच पटकन हे आत्मचरित्र उचलंल.
मध्य-दक्षिण कर्नाटकातलं हलाखीचं बालपण, बेजबाबदार आणि ऐतखाउ वडिल तर सोशिक आणि कर्तबगार आई असं विसंवादी आणि अत्यंत गरीबीतलं बालपण, शिक्षणाची परवड, तरीही एका दुर्दम्य इच्छेने लेखक उच्च शिक्षण घेतात. पण त्या मार्गातले अनेक अडचणी, जातीचं राजकारण, मनुष्य स्वभावाचे अनेक कंगोरे लेखक टिपत जातात. लेखकाला जितकी ही माणसं समजत जातात तसा तसा त्यांच्या लेखणीला नवनवे अंकूर फुटत जातात.
प्रंचड आर्थिक ओढाताण, मानहानी सहन करुन जेव्हा स्वबळावर आर्थिक स्थैर्य येते तेव्हा देखील लेखकाने आर्थिक स्थैर्यापेक्षा लेखनाला दिलेलं महत्त्व त्यांच्यातली लेखनाची आच अधोरेखित करते. तसेच अभिजात संगीतात हरवून जायची गायकांची वृत्ती आणि जगण्याच्या निरनिराळ्या अनुभवात खोलवर डुबी मारुन काही वैविध्यपूर्ण शब्दरत्नानुभव हस्तगत करायची लेखकाची उर्मी याची छान सांगड भैरप्पांनी त्यांच्या आयुष्यात घातली आहे. एखाद्या टीप कागदासारखं रहात समाजातल्या सगळ्या स्तरात, सगळ्या कानाकोपऱ्यात भटकण्याची लेखकाची असोशी खरोखर कौतुकास्पद आहे.
अत्यंत खडतरतेतून आणि अतिशय एकाकीपणे आत्मसात केलेलं आयुष्याच्या या टप्प्यावरच भैरप्पांच प्रथित यश आणि आत्मिक समाधान पहायला प्लेगने अकाली गेलेली त्यांची सत्शील आणि सद्गुणी आई नसावी याचं मला फार वाईट वाटलं. ग्रामीण कर्नाटकाच्या पार्श्वभूमीवरच्या भैरप्पांच्या इतर कादंब-या कधी वाचेन असं मला झालंय.
~~छान पाऊस पडतोय. अनेकांगानी आपल्याला रिझवलेल्या, आत्म परिक्षणाला उद्युक्त केलेल्या, कुतुहल चाळवेल्या या तीन पुस्तकांविषयी लिहितांना खूप छान वाटतंय.
कुठल्याही कलाकृतीचा आनंद, रसास्वाद वाचणा-याच्या, बघणा-याच्या, ऐकणा-याच्या मनस्थितीवर बहुतांशी अबलंबून असतो. मी काही साहित्याची अभ्यासक वा समिक्षक नाही. मला जे भावलंय आणि मांडता आलंय ते लिहिलंय.
ही पोस्ट वाचून दहा जणांनी जरी ही पुस्तकं वाचली तरी मला आनंद वाटेल.
No comments:
Post a Comment