Friday, 3 July 2020

20#कोरोनाकेसाईडइफेक्टसऍंडडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह



सकाळ झाली की तो कोरोना बिरोना चुलीत घालायचा आणि आयुष्याला सकारात्मकतेने भिडायचं असतं हेच ही वनचरे शिकवून जातात.

तिकडे काही मिटरवरच्या डोंगरात धुकं अजून रेंगाळतय, चराचरही सुशेगात आहे पण ही वनचरे लागलीयेत बघा धुडगूस घालायला. कुठून एवढी एनर्जी येते कळत नाही. पत्र्यांवर दणादण उड्या, झाडं खंगाळून टाकायची, फांद्या तोडायच्या, फुलोरे-फळं खायची. थोडक्यात सकाळचे सहा नाही वाजत की दिवस अगदी डोक्यावर घ्यायचा.

मस्ती आणि खादाडीच्या नादात चारेक माकडं खालच्या फांद्यांवर रेंगाळतात. मग आमच्या श्वानांना भुंकून भुंकून अख्खी व्हॅली दणाणून सोडायला निमित्तच मिळतं. 
एक पाच दहा मिनिटं वातावरण तंग होतं. 
इरेला पडलेली श्वानं आणि जरा दचकलेली वानंर. सुरक्षित ठिकाणी बसलेले वानर आया-बाप्ये धोक्याचे जबरी इशारे देतात. खालच्या धोकादायक फांदीवरची अजाण वानरसेना  संभाव्य संकटाने मग अजूनच कावरीबावरी होते. कच खाल्लेला बाल शत्रू बघून श्वानांना अजूनच चेव येतो. पण त्यांना झाडावर चढता येत नाही या एका वैगुण्यामुळे आणि माकडांना कशाही उड्या मारता येतात या गुणामुळे पुढचा समरप्रसंग टळतो. 

भुंकून भुंकून श्वानं दमतात पण वानरसेना हाती लागायचा चान्स गेलेला असतो. एक दहाच मिनिटांच घमासान असतं पण अख्खा परिसर तणावग्रस्त होतो. बुजुर्ग माकडांच्या सहाय्याने सगळी टोळी सुरक्षित ठिकाणी जाते आणि इकडे श्वानं पाणी प्यायला वळतात.

या सगळ्या समरप्रसंगाला दुरुनच साक्षी असलेली लेकूरवाळी माकडीण एका टेंटच्या छपरावर लेकरासह भेदरुन बसलेली असते. जमिनीलगतचं नाट्य संपलं की ती भेदरलेली माय सरसरुन मुतते आणि पोटाला घट्ट चिपकून बसलेल्या लेकरासह दुस-या सुरक्षित झाडावर झेपावते.

आपला तर अजून पहिला पण चहा झालेला नसतो. पण या धुमश्चक्रीमुळे आपणही खडखडीतपणे ताजेतवाने होऊन जातो आणि पुनश्च एका नव्या दिवसाला भिडतो.

No comments:

Post a Comment