Friday, 3 July 2020

19 #कोरोनाकेसाईडइफेक्टसऍंडडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह


२२-२३ मार्चला जो लॉक डाऊन लागलाय तसे आम्ही कुटुंबिय दौलताबाद जवळच्या आमच्या हिरण्य रिसॉर्टमध्ये रहायला आलो आहोत. लॉक डाऊन किधी उठेल हे माहित नव्हतं तरी बरंच गरजेचं सामान घेऊन डेरे दाखल झालो. 
दुर्दैवाने लॉक डाऊन टप्प्या टप्प्याने वाढतच गेलं आणि आम्हीही इथे रमतच गेलो. 

इथे येताना वैयक्तिक गरजेच्या गोष्टी प्रत्येकाने आठवणीने आणलेल्या आहेत. पण नेलकटर मात्र फक्त एकच तेही अस्मादिकांच्या सटीकपणामुळे इथे आणलं गेलंय. 

आता जवळपास तीन महिने इथे राहून होताहेत. या नेलकटरची इतकी पळवा पळवी होत आहे की विचारायची सोय नाही. एवढ्या दिर्घ लॉक डाऊनच्या काळात एखाद्या स्पेसिफिक गोष्टी वरुन आमच्यात हमरी तुमरी होणारी गोष्ट म्हणजे नेलकटर झाली आहे. जो घेतोय तो आपल्याच खोलीत नेलकटर ठेवतोय. मागून नेलेलं नेलकटर आठवणीने परत जागेवर आणून ठेवायचं नाव नाही.

बरं नखं कापायचीही एक अनिवार उर्मी असते. तत्क्षणी नेलकटर नाही मिळालं तर प्रचंड मनस्ताप होऊन नखं अजून सरसर वाढतात. खूप बैचेनी येते. कुठलंही काम करताना त्या सूतभर वाढलेल्या नखांचा त्रास व्हायला लागतो. येता जाता, काम करताना ती नखं डोळ्यात कुसळा सारखी खुपायला लागतात एवढंच नाही तर आता आपल्या शरीरात कोरोनाचा शिरायचा राजमार्ग म्हणजे आता ही आपलीच नखं आहेत असं प्रकर्षाने वाटायला लागतं. 
झोप उडते. चित्त हरपतं. आणि झोपेतून उठलं की ही नखाग्र सकाळपासूनच डोक्याच्या 
कुरु-कुरु भुगा करायला लागतात हो.

खरंतर हिरण्यमधे एक से एक धारदार हत्यारं आहेत. इलेक्ट्रिक कटर्स, फरशी-कु-हाडी, विळे-कोयते, कत्ते-चाकू आहेत. 
पण हाय ! 
या ठिकाणी त्यांचा काय उपयोग ?

आज सकाळी उठून नखं कापायचा अस्मादिकांचा बेत या पोटच्या पोरांनी धुळीस मिळवलाय. नेलकटर कुणाच्या तरी खोलीत आहे आणि सगळे डाराडूर झोपलेत. 
आणि अस्मादिक बसलेत नखं घासतं, I mean पोस्टी टाकत.

तर आपणच केलेले (अर्धवट) संस्कार असे बुमरॅंग होतात बरं.

No comments:

Post a Comment