Friday, 22 May 2020

B #Coronadiaries@hiranyaresorts

मोगरा फुलला...

हिरण्यच्या परिसरात मोग-याचे दहा बारा वेल आहेत. उन्हाळा जसा जसा तापतोय, तसा या फुलांना बेसुमार बहर येतोय. अक्षरशः सगळ्या वेलींची फुलं-कळ्या खुडायला गेले तर माझा दिडेक तास तरी जाईल. त्यामुळे मी काल सिक्युरिटीला फुलं खुडायला सांगितली. त्यांनी मोठ्ठं टोपलंभर फूलं आणून दिली. तुकड्यां तुकड्यांमध्ये चार पाच फूट लांब सुगंधी, मोतीया रंगाचे सुरेख गजरे झाले. सगळी खोली सुगंधानी दरवळून निघाली. 
लगे हात सगळ्या पुरुष कर्मचा-यांच्या हातावर गजरे ठेवले. न्या तुमच्या महिला कुटुंबियांसाठी, नातलगांसाठी गजरे.

मोगरा.
जेमतेम मध्यम बोराच्या आकारातील मोग-याची हल्की फुल्की फूलं. एवढुसा जीव पण साधारणपणे पंचविस तिस पाकळ्या दाटीवाटीने उमलणा-या. आणि देठ तर इतकं पिटुकलं असतं की या मगजदार तीस पाकळ्यांचा भार या देठाला पेलतोच कसा याचं आपल्याला आश्चर्य वाटत रहातं. काही फुलं तर फुलांत फुल अशी फुलतात. एकेक फुल असं निरखत-पारखत हाताळत बसले तर गजरे कधी होणार ? 

हे पुर्ण उमललेले मोगरे हाताळताना तळहाताला अगदी गुदगुल्या होतात. आणि गजरे हातावेगळे केले तरी तळहात कितीतरी प्रहर दरवळत रहातात.

No comments:

Post a Comment