Friday, 22 May 2020

8 #कोरोनाकेसाईडइफेक्ट्सऍंडडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह

सोयरी वनचरे...

आमचं हिरण्य गेल्या विसवर्षांपासून आम्ही दौलताबाद तलावात लगतच्या डोंगराळ, खडकाळ भागात थाटलंय.  चिंचोळ्या होत जाणा-या दोन डोंगररांगांच्या ओंजळीत हिरवं गार हिरण्य रिसॉर्ट आहे. रिसॉर्टच्या दोन्हीबाजूंनी डोंगराळ निसर्गच आहे, तर एका बाजूला पंचवीस-तीस फुटी धरणासारखी प्राचीन अशी चि-यांनी बांधलेली भिंत म्हणजे ब-यापैकी मोठ्या तलावाची भिंत आहे आहे. थोडक्यात जूना अडगळीतला पण ऐतिहासिक परिसर होता-आहे हा. 

आम्ही इथे आलो तेव्हा या परिसरात भरपूर स्थानिक प्राणी दिसायचे. सापांचे सगळे प्रकार, रानससे, तरस, मोर, सायाळ, उदमांजरं वगैरे. पण हळूहळू आमचा राबता वाढला, शहर वाढलं, या रस्त्यावर भरपूर डेव्हलपमेंट झाली तसा लोकांचाही अधिवास वाढला. नाही म्हटलं तरी निसर्ग म्हणजे झाडंझुडं-पाखरं नाही पण निर्मनुष्य रानात सुखनैव राहणारी काही वनचरे हळूहळू हद्दपार होत गेली. 
साप आणि त्यांचे अनेक लहान मोठे प्रकार दिसणं कमी झालं. सायाळही गायब झाली. तरसाचही दर्शन नाहीच झालं. मोरांचेही आवाज दूरुनच यायला लागले. घारी वरच्यावर उडायला लागल्या.

तसं पाहिलं तर या ओसाड भुमीत आम्ही निसर्ग म्हणजे हिरवाई खूप वाढवली आहे. त्यामुळे रंगबिरंगी पाखरं, किटक, फुलपाखरं नव्यानेच इथे येऊ लागली. 
पण मोर, साप, तरसासारखे प्राणी दिसणं दुरापास्तच झालं.

पण सध्या कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे शहरी काय ग्राम्य जीवनही ब-यापैकी थांबलय. आमचं रिसॉर्ट बंद आहे. आसपासच्या विटभट्ट्यांवर अहोरात्र चालणारे ट्रॅक्टर्स थंडावलेत. एकुणातच माणसांची, वाहनांची आवाजी चहलपहल थांबलीये तर दरदोन दिवसांनी हे हद्दपार झालेले प्राणी मायभुमीकडे परतताहेत असं वाटतंय. 
आत्तापर्यंत दूरवरुन येणा-या एखाद्या मोराच्या आवाजा ऐवजी हल्ली चार-पाच मोर आमच्या हिरवळीवर बागडून जाताहेत असं सकाळीसच त्यांच्या आवाजामुळे जाणवतंय. परवा रोजच्या पायवाटेवरून भला थोरला सापही आडवा गेला. माकडांनी तर आम्हालाच विस्थापित करायचा चंग बांधलाय. हल्ली रोज संध्याकाळी एका ठराविक झाडावरच ग्रे हॉर्नबिल टेकून जातोय. काल रात्री जेवणानंतरच्या शांत-निवांत वेळी दूरवरून लांडग्याची हूलही ऐकायला आली. 
रंगबिरंगी पाखरं तर इतकी नव्यानेच दिसायला लागलीहेत की दिसला पक्षी की गुगल वरुन त्याची पत्रिका बघणं चालू आहे.

या वास्तव्यात आम्हाला आता पाखरांच्या वैविध्यपूर्ण शिळा, माकडांचे हुक्केरी संदेश परिचित झालेत. इतका दिर्घ निवांत वेळ आणि शांत हिरण्य आम्हीही पहिल्यांदाच अनुभवतो आहोत. कुठल्याही कामाचा उताडा नाहिये की माणसांचा उत्सवी गोतावळा नाहीये. त्यामुळे शांतपणे इथली स्पंदन टिपणं, प्रहरागणिक बदलणारी निसर्गाची रुपं निरखणं, पाखरांना जोखणं, माकडांना जाणून घेणं, सापांना समजून घेणं आणि मोरांना चार दाणे टाकून आश्वस्त करणं अशी कामं म्हणा, कार्य म्हणा ना कर्म म्हणा, करणं मनापासून सुरु आहेत. इथल्या नैसर्गिक बेशिस्तीतही एक जबरदस्त शिस्त आहे.

आमच्या वा इतरांच्याही अतिक्रमणामुळे हद्दपार झालेल्या वनचरांची ही घरवापसी बोले तो आपुनके मजहब को ही ललकार रही है.

हि वसुंधरा सगळ्यांची आणि हक्काची आहे हेच आपण विसरुन गेलो होतो. आपल्या बुध्दीचातुर्याने आपण आजपर्यंत इतर प्राणी-पक्ष्यांना अक्षरशः दे माय, धरणी ठाय करुन सोडलं होतं. आपण आपल्याच गुर्मीत होतो आणि आज काय तो अणुबॉम्ब सारखा एक जिवाणू आपल्या जगण्यावर अशी चाल करुन आला आहे म्हणता, की भल्या भल्यांची पळता भुई थोडी झाली आहे. 
बोले तो अब एक जंग ही शुरु हुवी है.

ती इंग्रजीत एक म्हण आहे ना, 
To win the war, it's ok to lose few battles. आजची परिस्थिती खरंच तशी आहे. 

च्यामारी, जे होईल ते भोगू, सोसू, 
but once and for all या जंगमधून शहाणे, जाणते होऊनच निघू.

लडेंगे..मरेंगे... 
बचेंगे तो और भी लडेंगे, 
लेकिन मां कसम, अब सयाने हो के ही रहेंगे.

No comments:

Post a Comment