कावळ्याचं घर होतं...
प्रत्येकानेच बालपणी ऐकलेली ही चिमणी-कावळ्याची गोष्ट आहे. आता या गोष्टीतल्या प्रमाणे चिमणी घरं मेणाचं, आणि कावळ्याचं घर शेणाचं हा शोध कुणी आणि का लावला माहित नाही. कदाचित मौखिक प्रवाहात अपभ्रंश झाला असेल.
कावळा आणि चिमणी या दोघांचीही घरटी तशी आवर्जून नोंद घ्यावी अशी नसतात. चिमणाबाई माणसांच्या वसाहतीत वळचणीच्या खबदाडीत, ट्युब लाईटच्या फटीत वा पंख्याजवळच्या अडचणीत, जुन्या-पडक्या कौलारु इमारतीत घरं बांधण्यात माहीर असतात. झाडावरचं चिमणीचं घरटं मी आजतागायत बघीतलं नाही. हां पण कावळ्यांची घरं मात्र नेहमीच हमरस्त्यांवरच्या रामकाठी बाभळीवर, कडूलिंबावर दिसतात. आता तसा कावळ्यांचा विणीचा हंगाम माहित नाही, पण आपले शेतकरी कावळा कुठल्या झाडावर घर बांधतो, किती उंचीवर बांधतो आणि कधी बांधायला सुरुवात करतो यावर पावसाचे अंदाज बांधतात. पण म्हणून कावळे शेतात फिरकतील, बांधावर घर बांधतील असं मुळीच नाही. ते आपला हमरस्ताच पकडतात. आणि हमरस्त्यांवरच्या चहा-पावाच्या टप-यांच्या आश्रयाने उदरनिर्वाह करतात असं माझं मत औरंगाबाद-पुणे दरम्यानच्या अनेक प्रवासांमुळे झालेलं आहे.
तर सध्या हिरण्यलाही दोन का चार कावळे आले आहेत.
लॉक डाऊनच्या सुरवातीच्या काळात त्यांनी बुलबुल, साळुंक्यांची अंडी पळवून त्यांना हैराण केलं होतं. आता तेच कावळे घर बांधताहेत तर माकडं त्यांना हैराण करत आहे.
घरटं करायला या कावळ्यांनी आमच्या इथलं झाडही कुठलं निवडलं तर ते महारुखचं. या झाडाला कडुनिंबासारखंच पण त्यापेक्षा मोठं म्हणून महानिंब देखील म्हणतात. पण कुठल्याच अर्थाने हे झाड कडुनिंबाच्या पासंगालाही पुरणारं नाहीये. एकतर हे महारुखाचं झाड खूप लंबंचौडं वाढतं, पानगळही खूप होते आणि लाकूडही अतिशय ठिसुळ असतं. या झाडात इतका ठिसुळपणा असतो की थोडाजरी जोरात वारा आला तर छोटेखानी फांद्या कटाकट मोडून पडतात. आमच्याकडे ही झाडं आपसूकच उगवलेली आहेत. आता आलीच आहेत खडक फोडून म्हणून आणि होईल जरा सावली इतर झाडांना म्हणून ही झाडं सांभाळली आहेत. अर्थात गुणांनी उणं असणारं हे उंचपुरं झाडं निळ्या नभाच्या पार्श्वभुमीवर फार छान दिसतं. त्याच्या त्या पांढुरक्या एकसारख्या रेखीव फांद्या, त्यावरची मोठाली हिरवीगार कतरा पानं..एकदमचं देखणी दिसतात. हिवाळ्यात तर या झाडांच्या रुपाला विषेश निखार चढतो.
हं, तर आमच्या कावळे जोडीने गेल्या आठवड्यापासून याच झाडाच्या शेवटच्या शेंड्यावर घरटं बांधायचा निर्णय केलाय. उजाडत नाही की जोडी काड्या जमवायला बाहेर पडते. तसा कावळा मोठा पक्षी आहे पण त्याला काही जराशा मोठ्या काड्या उचलून झपकीनी शेंड्यावर जाता येत नाही. तो आपला इकडून तिकडून
वेड्या-वाकड्या लांब काड्या जमा करतो. महारुखवरतीच फांद्यांची मजल दर मजल करत शेंड्यावर जातो. रोज बिचारे ते नवरा-बायको अथकपणे काड्या जमा करतात. पण या झाडाच्या फांद्यांच स्वरुप इतकं विस्कळीत आहे की निदान तीन पक्क्या फांद्यांची खोबणी तर मिळायला पाहिजे ना थोडयाफार गोलाईतलं घरटं बनवायला. विस्कळीतपणे आठ दहा काड्या जमल्या आणि आली वा-याची झुळूक की त्या काड्या जातात पडून. मग बसतात आपले नवरा बायको काव काव करत.
बरं हे झाड माकडांचही आवडीचं आहे. रोज संध्याकाळी त्यांच्या घर कम् निवासी झाडाकडे परतताना ही माकडं याच झाडांवर बसतात, उड्या मारतात, कोवळा पाला खातात. या वानर उड्यांनी परत या कावळ्यांच्या सो कॉल्ड खिळखिळ्या घराचे तिनतेरा वाजतात. घराकडे परतणारी ही झुंड अक्षरशः हे झाड गदगदून टाकतात. मग जरा दूर गेलेलं काक दांपत्य क्रा..क्रा..क्रा चिरकत माकडांवर झेपावतात. एवढं मोठं माकड पण दोन कावळ्याच्या झेपांनी कावून जातं आणि दुसरं झाड गाठतं. पण दरम्यान काडी रुपी घरटं धारातीर्थी पडलेलं असतं. हा असा गोंधळ चारेक दिवस झाले चालू आहे.
या महारुखवरचा माकडांचा परवाचा शेवटचा हल्लाबोल पाहिल्यावर मनात म्हटलं आता कधी हे कावळे शहाणे होणार, कधी झाड बदलणार आणि कधी ती कावळीण बाळंत होणार ?
आपल्या महिलांच्या बस-रेल्वेतील इमर्जंसी डिलेव्हरीजच्या बातम्या आठवून या कावळीणीचं कसं होणार याची एक काळजीच वाटली.
एकतर कुठलं झाडं निवडावं याचं नियोजन नाही, घरटं बांधण्यातही हातोटी नाही का काड्या निवडण्यातही हुशारी नाही. सगळाच उठवळ आणि राम भरोसे कारभार आहे या कावळ्यांचा.
कसं काय या कावळ्यांना आपण चाणाक्ष आणि कावेबाज म्हणतो कळत नाही ?
आज सकाळी पाहिलं तर परत मोजून चार काड्या रचलेल्या. म्हणजे काड्या जमवायचा आणि घरटं तयार व्हायचा सक्सेस रेट पाहिला तर दिवसभरातून जेवढ्या काड्या आणल्या जातात त्यातल्या पाच टक्के काड्या देखील दुसऱ्या दिवशी दिसत नाहीत.
कसं होणार या कावळीणीचं ? अरे हा संसार आहे का खेळ आहे ?
माझ्या सकाळच्या चहात हल्ली हीच चिंता मी बुडवत असते.
मेहनती परी मेहनत होतीये, दिवस जाताहेत पण रहाणेबल घरटं काही बननेना. त्यात सध्या वारंही भन्नाट सुटलयं. महारुखच्या कटाकट काड्या पडताहेत. पांढरे-करडे ढगं सकाळीसच आसमंताला घेरताहेत. बहुतेक यावर्षीची पावसाळ्याची गाडी बिफोर टाईम ठेसनात पोहोचणार आहे. जे मला कळतंय, दिसतंय ते या दांपत्याला जाणवत नाहिये का ?
हे कावळे खरेचच यडछाप आहेत का उनका सिक्स्थ सेंस मेरे से ज्यादा तरबेज है ?
येता काळच याचं उत्तर देईल.
बाकी आम्ही आठल्ये दांपत्य चहा घेत, एकमेकांशी न बोलता, सध्या या कावळ्यांना निरखण्यात आमची हिरण्यवरची सुप्रभात सत्कारणी लावत आहोत.😊
No comments:
Post a Comment