Thursday, 21 May 2020

शुकरान इजिप्त...२-अ

*शुकरान इजिप्त*
२...अ

दुसऱ्या दिवशी पहाटेच उठले. हॉस्टेलमधे आम्ही दोघी, अजून काही महिन्यांपासून रहात असलेली एक जॅपनीज मुलगी आणि सौदी अरेबियातलं एक चौकोनी कुटुंब एवढेच लोकं होते. हॉस्टेल मालक रोज तिथे रात्री झोपायला यायचा. दिवसा बहिणी सतत त्याच्या संपर्कात राहून हॉस्टेल सांभाळायच्या. 

मी उठले तर कुणीच उठलं नव्हतं. किचनही शांत होतं. अगदी रेडी टू ड्रिंक कॉफी घ्यायची म्हटलं तरी किचन नवखं होतं. एवढ्यात त्या बुरखाधारी सौदीबाईंची खोली उघडी दिसली. तिलाही गरम पाणी हवंच होतं. आई आणि मुलगी एका खोलीत होते आणि वडील आणि लहान मुलगा एका खोलीत होता. या मायलेकी लवकर उठल्या होत्या. त्यांना जरा निघायचीही घाई होती. भाषेचा प्रश्न होताच तरी हाय, गुड मॉर्निंग करत संवादसेतू बांधलाच. त्याही तशा मोकळ्या होत्या. लगेच त्यांच्याच खोलीत चहाला बोलावलं, पाव दिले. मीही चकल्या पुढे केल्या. बरचसं धार्मिक आणि माफक निसर्गरम्य पर्यटनाला निघालं होतं हे कुटुंब. बहुतेक धार्मिक स्थळी जाण्याची त्यांना सवय असावी. एकूणच रेडी टू युज चहा-कॉफी, पाव, किटली असा सगळा जामानिमा घेऊनच ते प्रवास करत होते. मुलीला थोडंफार इंग्रजी येत होतं. डॉक्टर व्हायचं होतं तिला. आम्ही तिघीच असेपर्यंत आमच्यात मोकळेपणा होता. पण नंतर त्या मुलीचे वडील आणि भाऊ उठले. मग त्यांची सरबराई करायच्या निमित्ताने रितसर बुरखा घालत आमचा संवाद त्या दोघींनीही आटोपता घेतला. 

आपल्या घरातल्या सारखी एक काम करणारी एक मध्यमवयीन, गोरीपान, सुंदर स्त्री सकाळीसच आली. पॅन्ट आणि टी-शर्ट घातलेला. डोक्यावर हिजाब. आल्या आल्या हिजाब काढला. किचनमधे जाऊन ब्रेकफास्टची तयारी केली. जरा भांडी आवरली, ओट्याची साफसफाई केली. काम करता करताच भाषेच्या अडचणीतून अपरिहार्यपणे निर्माण होणारं लोभंस हसू मला दिलं.
सुंदर सोनेरी लटा वाले दाट तपकिरी केस. न विचंरलेले. कसंतरीच पोनीटेल बांधलेलं. आत्ता सो कॉल्ड घरात आहे, आणि बघायलाही कोणी पुरुष नाहीये म्हणून ही मुभा. नसता दिवसाच रहाटगाडगे सुरु झाले की डोक्यावर हिजाब आलाच समजा. मग काय केसांची लहानशी बट देखील नजरेला पडणार नाही. या पुरुष लोकांना महिलांच्या केसांच इतकं काय वैर आहे कळत नाही ? त्या हॉस्टेल मालकाच्या दोघी तरुण बहिणी तशाच. स्किन टाईट जीन्स-टॉप घातलेला पण केस कडेकोट झाकलेले. आपण भारतीय लोक टाईट कपड्यांविषयी किती जागरुक असतो नाही.

तर मग छान पहाट झाली. कैरोच्या गारठी नभातली पहाटेची चंद्रकोर, समोरच झगमगत कैरो म्युझियम. जगातलं एक ऐतिहासिक आणि अनोखं म्युझियम बघायची अपार उत्सुकता आहेच.

मग जरा झटपट आवरलं, तब्येतीतला ब्रेकफास्ट घेतला आणि पुढच्या कैरोतल्याच ट्रिपच्या नियोजनासाठी एजंट गाठायला म्हणून बाहेर पडलो. तिथूनच पुढे कैरो म्युझियमला भेट देणार होतो. 

हा सगळा चहलपहलवाला प्रिमियम पण विस्तिर्ण चौक आहे. इकडून तिकडे जाणारे फ्लाय ओव्हर्स, दहा दिशांनी येणारे रस्ते, दुतर्फा ऑफिसेस, बॅंका, टोलेजंग हॉटेल्स, चौका चौकात चिप्स, चॉकलेट, सिगारेटस सेल्स, पेन्स अशी दैनंदिन गरजेची फुटकळ दुकानं. सकाळच्या गारठ्यात कामाला बाहेर पडलेला नौकरदार वर्ग. झाडून सगळे गडद रंगाच्या सुटाबुटात, लांबसर ओव्हरकोट्समधे. देखणं, उंचपुरं रुप, शहरी चटपटीतपणा, शिक्षणाचा आर्थिक सुबत्तेचा ग्लो शरीरभर. इथे बरेच जणं ओमर शरीफसारखे दिसणारे माणसं दिसली. त्यांना पाहता क्षणी ओमर शरीफचीच आठवण यावी इतका त्या रेसचा युनिकनेस आहे. भव्य कपाळ, माफक कुरळे पण मागे गेलेले दाट केस, दणकट बांधा आणि प्रसन्न चेहरा. 
असो, जरा विषयांतर होतंय का ?😬

तर या रस्त्यावर काही सोवेनियर शॉप्स पण आहेत. इजिप्तचा अतिप्राचीन आणि झगमगीत राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास. प्रत्येक धर्माचं, कालखंडाच वैशिष्ट्य असणारी रंगारंग सोवेनियर्स. काय पाहू आणि काय नाही असं वाटायला लावणारी. पण दुर्दैवाने एजंट्सची दुकानं बंद होती, पण एक अत्तराचं, पर्फ्युम्सचं मोठं दुकान नुकतंच उघडलं होतं. 
मालकच फडके मारत वेलकम, वेलकम म्हणत सामोरा आला. इंदिया इंदिया म्हणत हसतमुखाने आत बोलावलं. एकदम बोलबच्चन. बघा तरी, घेऊ नका हा यशस्वी फॉर्म्युला इथेही होता. तळमजल्यावर लोकप्रिय सोवेनियर्स, वरच्या मजल्यावर पर्फ्युम्स आणि अजून किमती गोष्टी. पहिलंच गि-हाईक. त्यामुळे भलत्याच उत्साहाने गडी एकेक वस्तू, अत्तर दाखवत होता. एकीकडे हातातल्या वस्तूंच नजाकती वैशिष्ट्य सांगत होता, एकीकडे आमचा पुढचा प्रोग्राम विचारत होता. 
या क्षणी खरंतर आम्हाला काहीच घ्यायचं नव्हतं. कारण आम्ही आस्वान, लुक्सार, हरघडा असं फिरुन परत याच हॉस्टेलमधे येणार होतो आणि तेव्हा हातात वेळ आणि उरलेला पैसाही रहाणार होता. त्यामुळे आज फक्त वस्तू आणि किमती हेरुन ठेवायच्या होत्या. आम्ही देखील जगप्रसिद्ध टुरिस्ट सिटीचे रहिवासी होतो म्हटलं. त्यामुळे गि-हाईकं पटवायचे तौर तरिके हम भी जानते है.

वरचा मजला अत्तरांच्या काचेच्या बाटल्यांनी नखशिखांत लखलखलेला. एकसे एक सुंदर लहान मोठ्या बाटल्या, बुधले. त्यांचे नजाकती आकार, बिलोरी कटस्, त्यातल्या उबदार रंगसंगतीतली अत्तरं, त्यांचे मादक सुवास. लेक तर प्रेमातच पडली तर या सुवासांच्या. अस्मादिक अशा पर्फ्युम्स् वगैरेंवर विश्वास न ठेवणारे आहेत. उटणी- साबणयुक्त एक नाही दोन वेळच्या शुर्चिर्भुत आंघोळी, अभ्यंगावरच आपला अतुट विश्वास आहे. तर हे महाशय किंग ऑफ इजिप्त, क्विन ऑफ इजिप्त, इजिप्तशियन लोटस, क्विन नेफरतिती, किंग रॅमेसिस, क्लियोपात्रा, डेझर्ट नाईट अशी एकेक रोम्यांटिक नाव असलेली अत्तर काढताहेत, आम्हाला त्याची महत्ता पटवून देताहेत. 
पुरुषांना म्हणजे (हजबंडला हो) खूश करायला क्लियोपात्रा, नेफरतिती या नावाची महिलांनी वापरायची अत्तरं. च्यामारी, मत्स्यगंधेचा अवतार इथेही आहे वाटतं ? 
नजाकती शृंगारात चारचांद लावणारे 'तुम्हारी जुल्फे' तुम्ही जबरदस्तीने कडेकोट बंदोबस्तात ठेवणार आणि वर परत हजबंडला-साथीदाराला मादक सुवासाने खुश करायची ही क्लुप्ती आम्हाला सांगणार. जरा महिलांनाही खुश करणारी काही अत्तरं पुरुषांसाठी असतील तर सांगा की.
असो, भलतंच विषयांतर होत चाललंय. तेही परकीय भुमीत. घेणं न देणं आन् फुक्कटच ज्ञान पाजळून जाणं. तर ते असो.

एकूणच ही व्हिजीट आणि संवाद महत्त्वाचा ठरला. आमचा इतर खरेदीतला चोखंदळपणा बघून या इसमाने (मी नाव विचारलं होतं, पण आता विसरले) आम्हाला पुढच्या प्रवासात कुठे काय मिळू शकतं हे खुल्यादिलाने सांगितलं. पुढे आस्वानला सुहेल नावाच्या एका शोकेसी आर्टी-क्राफ्टी व्हिलेजला याच्याच शिफारसीने आम्ही भेट दिली. इजिप्तमधली वैशिष्ट्ये असलेली इतरही सोवेनियर्स या भल्या गृहस्थाने त्यातल्या बारकाव्यानिशी दाखवली. खरंखोटं कसं ओळखायचं ते सांगितलं. हाताने बनवलेल्या उत्तम वस्तू, फ्रेम्स, चिजा दाखवून त्यानी आम्हाला उपकृतच केलं. परतताना या दुकानात नक्की यायचा वादा मनापासून करत बाहेर पडलो आणि दुस-या कोपऱ्यातलं कैरो म्युझियम तडक गाठलं.

No comments:

Post a Comment