Tuesday, 12 May 2020

17#क्वारंटाईनकेसाईडइफेक्ट्सऍन्डडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह

क्वारंटाईनमुळे हिरण्य रिसॉर्टमध्ये रहायला येऊन जवळपास आठ आठवडे होत आले. आम्हीच उभं केलेल्या, हिरवंगार केलेल्या, संपूर्ण सोयीयुक्त आणि हल्लीच्या इतक्या सुशेगात स्वत:च्याच रिसॉर्टमधे पहिल्यांदाच इतकं निवांत आणि स्वत:तच रममाण होत रहाणं, तेही इतक्या दिर्घ काळासाठी पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे एका वेगळ्याच नजरेनी सगळ्या प्रहरातला निसर्ग, प्राणीमात्र बघणं, टिपणं चाललंय. जे प्राणीपाखरं सातत्याने आणि भरपूर संख्येने दिसतात त्या प्राणी-पक्ष्यांच एवढं कौतुक रहात नाही, पण जे अपुर्वाईचे असतात त्यांना बघायला, टिपायला असोशीने प्रयत्न होतोय. 
त्यात पहिला क्रमांक सापांचा आहे.
वाढलेला कहरी ऊन्हाळा, अति निवांत रमणीय हिरण्य, आणि आल्टुन पाल्टुन हिरवळींना, झाडांना पाणी दिल्यामुळे जमिनीला आलेला गारवा. सर्व प्रकारचे साप निर्धास्तपणे बाहेर पडताहेत, हिरवळीवर, गार वळचणींजवळ पहुडताहेत. त्यामुळे कुठे साप, धामण, नाग अवचितपणे दिसेल याचा भरवसाच राहिला नाहीये. दिसला सुशेगात साप की हलक्या आवाजात दुसऱ्यांना बोलवायचं, कॅमे-यात त्यांना टिपायचं असं गेले चार आठवडे चाललं. मग जरा अप्रुपाची नवलाई निवळली तसं आपल्या या कुतुहली उत्साहामुळे सापांना त्रासच होतोय हे लक्षात आलं. विशेष म्हणजे अशी टेहळणी कुणी आपल्यावर ठेवली तर चालेल का असे प्रश्न मनाला पडू लागले. 
या फटाफट फोटो काढणे, याला-त्याला बोलावून तो प्राणी दाखवणे याचा तिटकारा कधी आला असेल तर जेव्हा कोवळ्या उन्हातलं धामणींचं मेटिंग आम्हाला टिपता आलं तेव्हा. 
मानवी साम्राज्यात इतकंही निर्धास्त खाजगीपण प्राणीमात्रांना नसावे का ?
अक्षरशः जीवावर उदार होत त्या धामणींना त्यांचा कर्मयोगी संयोग साधावा लागला.

एकुणातच आता कितीही मोठा साप, अजगर दिसला तरी दबे पांव धावा धाव करुन, फोन करुन कुणालाही बोलवायचं नाही. शक्यतोवर शांतपणे आपणच निरिक्षण करायचं फार तर आपणच चाहूल न देता फोटो काढायचे. कुठलाही दर्शनाचा सार्वजनिक कुतुहली उत्सव करायचा नाही.

आज असंच झालं. कॉफी घेत गॅलरीत आले तर खालच्या चरात एक साप अक्षरशः निवांत पडला होता. सकाळचं झाडो-यातून डोकावणारं कोवळं ऊन अंगावर घेत स्वारी मस्त पहुडली होती. एक पंधरा मिनिटं दर्शन झालं. उगाचच इकडे, तिकडे करत बागेत फिरावी तशी अगदी रमत गमत स्वारी फिरली आणि घडीव दगडांच्या चळतीत नाहीशी झाली. खरंतर ठरवलं होतं कुणाला सांगायचं नाही, बघायला बोलवायचं नाही. तरी एका दारावर टकटक केलीच. पण नो रिस्पॉन्स. 
हुश्य ! बरं झालं कुणी आलं नाही ते. 
दोन-तीन व्हिडियोज-फोटो घेतले फक्त. 
इकडे मी आंघोळीनंतरची गरम कॉफी घेत तिला वरुन निशब्दपणे न्याहाळत बसले, तिकडे ती सुप्रभातीचा फेरफटका निश्चिंतपणे मारत होती. This is live and let live.

आमच्याकडे रहाणारे काही कर्मचारी जन्मजात शेतातच काम करणारे आहेत. ते इथेच हिरण्यला रहातात. त्यामुळे आमच्या या वास्तव्यात आम्हाला या वनचरांचे जे काही बरेवाईट अनुभव येताहेत त्याला ते साक्षी असतातच. फणा काढून फुत्कारणारा नाग असो वा कुत्र्याने मारलेलं माकड असो, वा मेटिंग करणा-या धामणी असोत, वा बुलबुलांची, साळुंक्यांची अंडी पळवणारे कावळे वा मांजरं असोत. या सगळ्या निसर्ग साखळीतल्या घटनांकडे बघायचा या व्यक्तींचा दृष्टिकोन अगदी तटस्थ वा सहज असतो. ज्या गोष्टींना आम्ही अरे बापरे, अरेच्चा, अरेरे, वॉव करत हळहळतो, खूश होतो त्या गोष्टींकडे ही माणसं फार सहजतेने बघतात. सुरवातीला मला फार आश्चर्य वाटायचं. यांना साप दिसला तरी काही अद्भुत पाहिल्यासारखं वाटत नाही का कुत्र्यांनी कबुतर खाल्लं तरी फार खेद होत नाही.
But believe me, over a period I am also getting in to that mode.

दिसला साप, असला वेळ तर बघा नसता काळजी घेत आपापली कामं करा. माकड मेलं, पुरुन टाका, दगड-काटे लावा आणि चालू लागा. कदाचित यात त्या प्राण्यांना अभ्यासायचं, आटापिटा करत फोटोतून टिपायचं औत्सुक्य-प्रेरणा नसेल, पण त्यामुळच ही वनचरे तुमच्या आमच्या सारखी सुखनैव जगू शकताहेत.
नसता आमच्यासारखे शहरी आणि अगोचरी कुतुहली माणसं या प्राण्यांच जगणंच मुश्कील करताहेत.

सापांना स्वत:च बॉडी टेंपरेचर मेंटेन करायला बाहेरच्या गारव्याची, उष्णतेची मदत घ्यावीच लागते. त्यामुळे दिन तापमानाप्रमाणे ते बाहेर पडतात आणि त्यांना हवा तसा गारवा-उष्णता घेत सुरक्षित ठिकाणी पहुडतात, फिरतात. आता अशा त्यांच्या गरजेच्या अवस्थेत तुम्ही त्यांना कुतुहलाने का होईना पण डिस्टर्ब करणं योग्य आहे का ? उद्या मी मॉर्निंक वॉकला गेले आणि माझ्या मागे लागत एखाद्या कारवाल्याने जीवाच्या भितीने मला दडादडा इस्तत: पळवलं तर मी ते चालवून घेईल का ?

मला वाटतं वसुधैव कुटुंबकम आणि live and let live या उक्तीचा दाखलाच आम्हाला इथला निसर्ग आणि निसर्गातीलाच एक घटक म्हणून जगणारी काही माणसं अबोलपणे देत आहे.

This self realisation is a blissful HAPPINESS !

No comments:

Post a Comment