एक घमासान सकाळ.
सकाळचे सहा वाजायच्या आधीच उठले, खोलीचं दार उघडलं, खालच्या चारीत धामण आणि समोरच्या झाडांवर माकडं आहेत का पाहिलं. दोघंही नव्हते. बाथरूममध्ये गेले. दोनच मिनिटात दहा-बारा माकडांचा आणि आमच्या श्वानांचा डिस्ट्रेस्ड कोलाहल ऐकू आला. धावत बाहेर आले. बघीतलं तर कोपऱ्यातली झाडं गदगदत होती, माकडं आकांतानी चिरकत होती, श्वानं अग्रेसिव्ह झाली होती. किंचाळतच हाड-हूड केलं तर आमची एवढ्यातच दत्तक घेतलेली एक गावरान कुत्री 'ती' तोंडांत माकडाच पिल्लू घेऊन धूम पळताना दिसली. इकडे माकडांचा कोलाहल सुरु. एक टोणगं माकड ती'च्यामागे जीवखाऊन पळालं. समर प्रसंग होता. कुठलीही वनचरं गुण्यागोविंदाने रहात असली तरच बरं वाटतं. हे असले कुणीही एकमेकांना मारायचे, खायचे प्रसंग फार त्रासदायक असतात.
भली शांत पहाट पण मी जोरजोरात ओरडायला लागले. नवरा जागा झाला, परिस्थिती बघून तो खाली ती' जिकडे गेली तिकडे पळाला. आमच्या कडे एक काम करणारे वयस्क गृहस्थ आहेत. ते नुकतेच उठले होते. त्यांना ती'कडे काठी घेऊन जा म्हटलं. हे सगळं होईपर्यंत माकडांच अगतिक चिरकण चालूच होतं. मग या सगळ्या घमासानी ओरड्याने मुलगीही उठली. ती पण ती'च्या कडे धावली. ती'ने परिस्थिती बघून ते पिल्लू तिथेच लॉनवर टाकून गुरगुरत बाजूलाच पोबारा केलेला. एवढं होईस्तोवर त्या माकडाच्या पिल्लाने प्राण सोडला होता. जेमतेम दहा मिनिटांच घमासान पण सगळेच चुकचुकत हतबध्द झाले. ती' तर दूरवर गेली पण माकडांच्या झुंडीने पिल्लाभोवती निशब्दपणे गराडा घातला. आता आम्हाला कळेना की काय करावे. पिल्लाचं कलेवरही हलवलं पाहिजे. ती' आता कशी वागेल माहित नाही. माकडं ती'वर खुन्नस ठेवून तिचा पाठलाग करतील का ? का कलेवराला उचलून नेतील ?
शेवटी आम्ही दोघं नवरा-बायको त्या कलेवराच्या रक्षणार्थ दूरुन टेहळणी करत बसलो. अर्थात हातात काठी घेऊनच.
कलेवरच्या आसपास झाडांवर, दगडांवर बसून साकडं शोकमग्न झाली होती. दूरवर ती' धुमसतच होती.
तिने उसळत्या त्राग्याने समोरच्या खबदाडत चरणा-या मोरांना हुसकून लावलं. ते बेटे भिर्रकिनी गुमाने उडाले. मग ती'ने टिटव्यांना छेडलं. मग टिटव्यांनी ती'वर झेपा घेत चिरकत चिरकत तिला चालणं नकोसं करत पळवलं. शेजारच्या भट्टीतून एक परकं कुत्र आलं, ती'ने त्याला देखील खुंखार दडपशाहीने पळवलं.
या सगळ्या दहशती खेळात ती'ची एक नजर त्या कलेवराकडे होतीच.
She was in her best wild and hunters element. जांबाजपणे केलेली शिकार, आमच्या धाकाने तिला सोडावी लागली होती. तरी तिच्यातली धुम्मस तशीच वखवखलेली होती.
इकडे माकडांचाही शोक चालू होता. नर-माद्या, लेकरं-बाळं सगळे भयचकित होत स्तब्ध झालेले. कुठलाही हुंकार नाही का आवाज नाही. निःसंशय सगळे दु:खात चुर होत कलेवराच्या आसपास घुटमळत होते. आम्हाला वाटलं ते बहुधा कलेवर उचलतील, पण तसं काही लक्षण दिसेना. शेवटी धुमसणा-या ती'ला धाकानेच पुढे घालत आम्ही रेस्टॉरंट कडे आलो. तोपर्यंत उठलेल्या कर्मचा-यांना ते कलेवर पुरुन टाकायला सांगितलं. पण एकुणच ती'चा आणि इतर श्वानांचा आवेश बघता ते कलेवर उकरुन काढायलाही कमी करणार नाहीत असं आम्हाला वाटलं.
सुनित म्हणाला अरे त्याला पुरा आणि त्यावर दगड ठेवा.
तत्क्षणी ट्युब पेटली. अरेच्या, खरंच की. कुणाच्याही कलेवरांना हे उकरुन विटंबना व्हायचे धोके असतातच की. म्हणूनच माणसं पुरली की त्यावर घडीव जडशीळ चिरे ठेवतात. आमच्या आसपासच्या अशा कबरींच्या चि-यांकडे पहायला एक वेगळाच नजरीया मिळाला.
अरेच्या! मग आपल्या हिंदू धर्मातली दहन क्रिया जास्त संयुक्तिक आहे की. झटपट दहन केलं, अस्थि विसर्जन केलं की संपली निगराणी.
होता की नव्हता ? आगे बढो.
मरणानंतर एक इंचभर ओझं पण त्या भुमातेला नको. एकेक संस्कृती कशा उत्क्रांत होत जातात हे बघणं, आभ्यासणं खरोखर माईंड ब्लोईंग असतं नाही.
रेस्टॉरंट मधे चहा घेतला. किचनमधे जाऊन स्वैपाकाच्या सुचना दिल्या, काही कामं उरकली. Mean time मुलीने ती'ची रवानगी पिंजऱ्यात केली होती. आजचा ती'चा शिकारीबाणा आणि बाज बघुन आम्ही थक्क झालो होतो. She was best at her wild and original role.
कुत्र्यांना घरात घेऊन, आयतं आणि काहीही जेवण देवून, एसीत झोपायची सवय लावून आपण त्यांच्या जेनेटिक मुळावरच घाव घालत असतो.
असो....! कुत्रे पाळावेत का नाही आणि पाळले तरी कितपत लाडावून, सोकावून ठेवावेत या विषयावर आमच्याकडे युध्द झालेली आहेत आणि होतीलही. पण आम्ही उत्क्रांत झालेले विचारी मानव आहोत त्यामुळे सुदैवाने शाब्दिक चकमकींवरच थांबतो.
साधारण तासभर गेला. दरम्यान त्या माकडाच्या कलेवराचं दफनही करुन झालं होतं.
म्याडम सगळे कोंडाळं करुन बशिले होते. हातही लावू देत नव्हते. मंग कसंतरी कपड्यात गुंडाळून त्या तिकडच्या कोपऱ्यात त्याला पुरलंय. हां, दगड-काटे दोनीबी लावलेत.
हुश्य करत मी परत रुमकडे निघाले तर लेकीने ती'ला आता पिंजऱ्यातून मोकळं करा, नसता ती वेडी होईल असा भुतदयेने ओतप्रोत असलेला निरोप पाठवला. आज्ञा शिरसावंद्य मानत मी ती'ला मोकळं केलं. आठ-दहा पावलं माझ्यामागे चालत आलेली ती' परत तडक ते कलेवर जिथे पहिल्यांदा तिने ठेवलं होतं तिथेच गेली. आसपास हुंगत बसली. जवळच्याच झाडांवर दु:खी माकडांची झुंड बसलेली होती. सगळेजण अजूनही सुन्न होते. सगळ्यांची देहबोलीच खूप काही सांगून जात होती. अगदी लहान बाळं थोडीफार उड्या मारत होती, फुलोरा खात होती. पण बाकी सगळे समजदार माकडं हात-पाय गाळून फांद्यांना चिपकलेली होती. एक ढाण्या नर मात्र कपालभाती सारखा ह्युं, ह्युं आवाज काढत झुंडीला मार्गदर्शन करत होता. कलेवर जिथे टाकलं होतं त्या ठिकाणी ती' अस्वस्थपणे पण गुर्मीतच घुटमळत आहे हे ही माकडं हरवलेल्या, निस्तेज डोळ्यांनी बघत होती.
कुणीही तिला प्रतिकार करत नव्हतं का हुसकावत नव्हतं. नंतर तर ती'चा बेडरपणा इतका वाढला की हुत्कार काढणा-या त्या नायक नराजवळ चार फुटांवर येऊन ती त्याला ललकारत होती. तसं पाहिलं तर आकाराने आणि वजनाने तो हुप्प्या माकड ती'पेक्षा सरसच होता, पण ती'चा शिकारीतला अर्धवट जय तिला मुजोर करत होता तर कुटुंबातल्या लेकराचा मृत्यु त्या हुप्प्याला अंतर्बाह्यपणे हतबल करत होता.
कुठलीही शारिरीक वा आवाजी प्रतिक्रिया न देता तो शोकमग्न हुप्प्या जवळ येणाऱ्या ती'कडे भकासपणे बघत बसला.
कदाचित जे गेलंय ते आता भांडून, मारामारी करुन परत येणार आहे का असाच सुज्ञ विचार या हुप्प्याने म्हणजेच आपल्या प्राचीन पुर्वजाने केला असेल का ? किंवा survival of the fittest हे निसर्गसाखळीतलं ब्रिदवाक्य त्याने आपल्या काळजावर ख-या अर्थाने कोरुन घेतलं असेल म्हणूनच झाल्या गेल्या घटनेकडे तो स्थितप्रज्ञतेने पहात असेल का ?
तसंही माकडांचे चाळे, हालचाली, वागायची पध्दत, झुंडशाही, नेतृत्व या गोष्टी या क्वारंटाईनच्या काळात ब-याच जवळून आमच्याकडून अभ्यासल्या जात आहेत.
आज त्यावर कळस चढला.
आपल्या धर्मातल्या ऐतिहासिक ग्रंथामधे हनुमानाला म्हणजेच माकडांना-वानरांना मिळालेलं-दिलेलं अनन्यसाधारण महत्त्व, डार्विनचा उत्क्रांतीवाद आणि सद्यस्थितीतील माकडांवरचे वैद्यकीय, वैज्ञानिक प्रयोग.
मानवांचा हा सर्व अभ्यासात्मक, सांस्कृतिक प्रवास थक्क करणारा आहे.
त्या दिवंगत माकडाला मनापासून श्रद्धांजली आणि मर्कटापासून झालेली माणसाची उत्क्रांती हा शोध लावणाऱ्या तमाम मानवांना त्रिवार वंदन.
No comments:
Post a Comment