Tuesday, 12 May 2020

15#क्वारंटाईनकेसाईडइफेक्ट्सऍन्डडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह...

तर नेटवर shrijani नावाचं पेज, माहिती शोधत बसले.

गेल्यावर्षी पुण्यात भरलेल्या नेचर बझारमधून एक ओरिजनल हॅन्डलूम सिल्क साडी घेतली होती. 
Out n out handloom piece. 
ब-यापैकी प्लेन आणि लांबरुंद, टोमॅटो रेड कलर आणि पिवळे काठ अशी. 
साडी विणतांनाच विणलेले एका विशिष्ट बिहारी विणाईचे कमळांचे बुट्टे साडीभर, साडीच्या कॉन्ट्रास्ट काठावर धावदो-याने भरलेल्या रेषा असं साधारण स्वरुप.
माझं ब्लाऊज वगैरे शिवून तयार होतं पण भरतकाम राहिलं होतं.
सुदैवाने लॉक डाऊन लागायच्या आधीच कार्बन-ट्रेसिंग पेपर आणि रेशीम आणून ठेवले होते. हिरण्यला येताना तोही बाडबिस्तारा घेऊन आले. काय आणि कसं भरतकाम करायचं डोक्यात होतंच. सरसर कामाला लागले आणि काल ते ब्लाऊजवरचं भरतकाम संपवलं.

कुतुहल म्हणून ही साडी कुठे, कधी, कशी बनली हे पुन्हा शोधायला गेले तर बिहारची श्रीजनी नावाची विणकरांची सोसायटी वा फाऊंडेशन आहे. फेसबुकवर त्यांच पेज पाहिलं तर एकेक पोस्ट भारतीय विणाईची महत्ता सांगणारी, दाखवणारी. एकेका विणाईचं नाव, महत्त्व, सौंदर्य, ते निगुतीने करणारा विणकर..एकेक फोटो, एकेक पोस्ट काळजाला हूरहूर लावत गेली. 

कधी आपण नॉर्मल जगणार आणि कधी आपण या विणकरांना, छपा-यांना दाद म्हणून अशी अनोखी वस्त्र खरीदणार ? 
कोरोना क्वारंटाईनमुळे या कलाकारांच जगणं तर अजूनच कठीण झालंय. रोजगार थांबलाय, परत ही गाडी रुळावर कधी येईल याचीही शाश्वती नाही. 
जगवग्याळ हुनर असलेली ही आपली माणसं, आपली कला या तडाख्यात अस्तगत होऊ नये म्हणजे झालं. 
वेळ पडली तर आपल्याच आता पसारा वाढवायचा नाहीच्या इच्छेला मुरड घालायची, पण ही आणि अशा अनेक कला जगल्या पाहिजेत या सदहेतूने थोडीफार खरेदी करत मदत करायची. 
अन्यथा या कोरोना व्हायरसच्या आफ्टरमाथमधे या आर्ट एॅन्ड क्राफ्टवाल्यांची संस्कृतीच लयाला जाईल की काय अशी भिती वाटत आहे.

मला कुडत्यांसाठी कापड घेताना, रेडिमेड कुडते घेताना आधी भरत काम सुचतं आणि मग मी त्या अनुषंगाने कपडे घेते. भरतकाम सुध्दा कुडता शिवल्यावर करते. तेही रिंग न वापरता. खूप जणांना म्हणजे भरतकामाची जाण असणा-यांना याचं आश्चर्य वाटतं, पण माझं डोकं आणि हात तसेच चालतात.

या वेळेस नेचर बझारच्या प्रदर्शनात त्या अशिक्षित, ग्रामीण विणकर महिलेने ही साडी समोर टाकली, तिचं वैशिष्ट्य दाखवलं, त्या मागची मेहनत सांगितली. अस्मादिकांच्या डोळ्यापुढे ब्लाऊजवर भरतकाम करायची आयडिया सर्रकन आली आणि लगेच साडी उचलली.

तर खूप साधं सोप्प भरतकाम आहे. छान तर दिसतंच आहे. पण त्याही पलिकडे भरतकाम करण्याचा सृजनशील आनंद वर्णनातीत आहे आणि असतोही.

खूप दिवसांनी सुई दोरा हातात घेतला की, अथ पासून इति पर्यंत मनासारखं काम झालं की, हुनर अजूनही सिध्दहस्त आहे हे पाहिलं की स्वत:चच कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही हो. 
सच्ची में दिल को सुकून और तसल्ली मिलती है.

मानो या ना मानो, 
Life is Beautifully colourful !!

No comments:

Post a Comment