कोरोना व्हायरसमुळे लागू झालेल्या क्वारंटाईनच्या काळात आम्ही आमच्या निसर्गरम्य हिरण्य रिसॉर्टमधेच वास्तव्य करुन आहोत. प्राचीन तलाव, डोंगररांगांमध्ये हिरण्य वसलंय. आता आमच्या वीसवर्षाच्या वास्तव्यामुळे हा डोंगराळ भाग बराच माणसाळलाय आणि हिरवा झालाय.
वीस वर्षांपूर्वी इथे भरपूर जंगली प्राणी-पक्षी-साप होते. पण आमच्या व्यावसायिक चहलपहलीमुळे ही सगळी वनचरे अंतर्गत डोंगरात ढकलली गेली होती.
पण आता या क्वारंटाईनच्या काळात रिसॉर्ट बंद आहे. मोजकीच दहा-बारा माणसं आहेत. त्यात ऊन्हाळा पेटलाय. म्हणजे उपस्थित माणसांच्या हालचाली देखील ठराविकच झालेल्या आहेत. आल्या दिवसापासून बघत आहे, हद्दपार झालेले वनचरे हळूहळू परत आमच्या हिरवळलेल्या, गारवलेल्या जागेत थोडं थोडं करत परतू लागले आहेत.
सध्या आमचं हिरण्य रिसॉर्ट ही निवांत आणि सुखाची गारवलेली बिनधोक जागा झालेली आहे.
माकडं, मोर, मुंगुस, धामणी, नाग, अनेकानेक अनोखे पक्षी हळूहळू हिरण्यमधे डेरा वसवू लागले आहेत.
म्हणजे या महिन्याभरात सततच कानोसे घेत दबे पाव चालायची सवयंच आम्हाला लागली आहे.
टॉवेल वाळत घालायला गॅलरीत आलं की खाली सुस्तावलेली धामण दिसते. फोनवर बोलत असताना मुंगूस दिसतं, योगासनं करताना बर्ड ऑफ पॅरॅडाईज शिळ घालत दर्शन देऊन जातो, मोर सकाळीच हाका देत उठवून जातात. थोडक्यात या वनचरांच अतिक्रमण (?) बिनबोभाट सुरु आहे. खरंतर हे त्यांचच अंगण आहे, आम्ही ते हिरवं करत सो कॉल्ड सुसह्य केलंय.
तर ते असो. सांगायचा म्हणजे लिहायचा खरा मुद्दा वेगळाच आहे.
आमच्या कडे रेस्टॉरंटला लगत अशी मोठी लॉन आहे. सकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण आम्ही या लॉनवरच घेतो. तिथे जवळच एक अजून चारसहा पाय-या चढून जाता येईल अशी कव्हर्ड जागा आहे. सकाळचं जेवण तिथे घेतो.
कुत्रे, कबुतरं, सश्यांबरोबर आमच्याकडे तिन चार बदकंही आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून.
तर त्यातल्या एकूलत्या एक बदकीणीने या पाय-यांखाली अंडी दिली.
दिवसभर ती बदकीण सतत आपली अंड्यांवर बसलेली आणि तिच्यावर नजर ठेवत आसपासच फिरणारे नर बदक.
बदक हा प्राणी कधीच माणसांना जीव लावत नाही, ओळख ठेवत नाही. मतलबापुरतं मागे पुढे घुटमळणं नंतर कायम संशयी नजरेनी बघत विचित्र आवाज करत हल्ल्याच्या आवेशात रहाणं.
पण हो अंडी फुटपर्यंत ते पिल्लू जगायला समर्थ होईपर्यंत पितृत्वाची वा मातृत्वाची जबाबदारी मात्र इमानेइतबारे पार पाडतात हं.
तर अचानक दोन आठवड्यांपूर्वी या लॉन मधे भयानक घाण वास यायला लागला. काहीच कळेना. एक दिवस तर डिनर अक्षरशः नाक दाबून करायची वेळ आली. आणि हा वास शक्यतो संध्याकाळीच यायचा. शोध घेतला तर कळलं बदकिणीची अंडी फुटली आहेत म्हणून. फारचं सडका-नासका वास. आता अंडी उबवायच्या काळात कशाला बदकीणीची हलवाहलवी करायची म्हणून आम्हीच दूरच्या लॉनवर जेवायला लागलो. पण ते अंतर रेस्टॉरंट पासून दूर आहे. आसपास ऊंचीपुरी झाडंझुडंही खूप आहेत. छंद लागलेलं चांदणं, शुटिंग स्टार्स, सॅटेलाईटस दिसेनात. तरीही वासाच्या धाकाने तिथेच बसायचो.
मग अजून दोन-चार दिवसांनंतर तर फारच असह्य वास यायला लागला. आमच्या माणसांना जरा तिच्या अंडी उबवायच्या जागेत बघायला सांगितलं.
ते काय आहे की आमची कुत्री, बाहेरच्या मांजरी, साप, मुंगुस कुणीही या अंड्यांवर नजर चुकवून डल्ला मारु शकतो. बघा म्हटलं जरा.
संध्याकाळी मग त्या माणसाने सांगितलं, म्याडम नऊ अंडी होती. सगळीच्या सगळी सडली होती. अगदी फटाक्यांसारखी फट फट करत फुटत होती. घाणेरडा ग्यास बाहेर पडत होता.
अरे मग फेकली का ? कावळ्या-मांजरानी खाल्ली असती ना ?
कशाचं खानं म्याडम ? लई घान वास मारत व्हती. आमी तं लगी तिकडं दूरवर मातीत पुरली.
बरं, मग आता ती जागाही साफ करा, जरा फिनेल वगैरे मारा म्हणजे वास जाईल आणि आम्हाला इकडे पुन्हा बसता येईल.
तास दिड तास लागला ती भरपूर गचपणीची, भपकारा मारु बाळांतीणीची खोली साफ करायला. नंतरही दोन दिवस वास येतच होता.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी रेस्टॉरंट कडे गेले तर बदकीण बाई निर्धोकपणे इतर बदक नरांबरोबर फिरत होत्या. पण परत परत त्या पाय-या जवळ येऊन स्तब्धपणे उभी रहात होती. तिचं ते पाय-यांजवळ जड पावलांनी घुटमळणं पाहिलं की काळजात कालवाकालव झाली. खरेतर अनुभवाने तिलाही कळलं असावं की या विणीत एकही पिल्लू हाती लागणार नाहीये, तरी गेले काही आठवडे मातृत्वाच्या आशेने तिने शोधलेली बिनधोक जागा, बनवलेली सुखकर बैठक, तिथल्या अंडी देतानाच्या वेणा, नंतर उपाशीपोटी अंड्यांना दिलेली ऊब, जीवापाड सांभाळणं आणि जन्माला येऊ घातलेल्या चार-सहा-आठ बाळ जीवांमधे गुंतलेला मातृत्वी जीव या सगळ्या भावनांचा कल्लोळ त्या अंधाऱ्या, कोंदट जागी घुटमळत होता. रिकाम्या झोळीतलं मातृत्वाच दान या बदकीणीला बैचेन करुन गेलं.
आसपास गुर गुर करत चरणारे नर बदक, थोडंफार पोटासाठी खात चरणारी आणि मधूनच सवयीच्या पण वांझोट्या रिकाम्या घरट्या जवळ थबकणारी, गतकालाचे काही तरी आठवून एकाकीच निश्चल होणारी बदकीण खरंच जीवाला चुटपुट लावून गेली.
गेल्या महिन्यांपासून बघतोय इथली प्राणीमात्रांमधली जीवन-अन्न साखळी. कुणीतरी कुणाला तरी खातोय आणि जगण्याची उर्जा मिळवतोय. प्राणीमात्रांमधला जीवनसंघर्ष डोळे उघडवणारा असतो आणि आपलीच ओळख आपल्याला करुन देणाराही असतो.
काही प्राणी-पक्षी आपल्याला प्रिय असतात. मग त्यांचे गुन्हे मनोमन माफ केले जातात. आणि काही प्राण्यांविषयी आपल्याच मनात इतका आकस असतो की त्या प्राण्यालाही भूक आहे हे आपण विसरुनच जातो.
आता कावळ्याने बुबुलल-साळुंक्यांची अंडी शिताफिने पळवली की कावळ्यांचा राग येतो. पण त्याच साळुंकीने उडत्या रंगबिरंगी फुलपाखराला टिपलं की तिचाही राग येतो. आमच्या राजेशाही धामण्या-नाग अनेक बेडकं-उंदीर टिपताहेत तर फारसं काही वाटत नाही. पण तोच नाग स्वरक्षणासाठी फुत्कारतांना किचनमधे दिसला तर आधी काठी हातात येते.
मोराने सापाला मारलं तर छान वाटतं, पण तरसाने मोराला छिन्नविछिन्न केलं की तरसाच्या नावाने बोटं मोडली जातात.
एखाद्या वाघाने रानम्हशीला मारलं तर काही वाईट वाटत नाही पण एखादा देखणा, खेळकर चिंकारा त्याने टिपला तर जीव हळहळतोच. मॅन इटर कावेबाज बिबट्या माणसांकडून मारला गेला की मानवाचा विजय वाटतो. पण त्याच बिबट्याला धुर्तपणे टिपून, मारुन त्याच्या कातडीचा वापर हौशेने करणारी माणसं पाहिली की माणसांची घृणा वाटते.
तर असं हे सगळं जीवनचक्र सब्जेक्टिव्ह आहे. यात अपरिहार्य अशी पोटाची भुक, जीवनाची भिती आणि मानवी उन्नततेचा भावनिक गुंतवणूकीचा अविष्कार याची फार गमतीशीर सरमिसळ आहे.
का, कुठे, कधी, कोणाला, कशाला, कशा पध्दतीने अशा अनेक काकावल्यांची उत्तर शोधायला गेलो तर आपली संस्कृती एका वेगळ्याच जीवनसंघर्षाच्या मुळाशी येऊन थांबते आणि आपल्याला अचंबित करते.
No comments:
Post a Comment