At last FRAMED !
काल कलत्या दुपारी असाच एक हिमालयीन एॅडव्हेंचर ओरियंटेड लाईव्ह कार्यक्रम बघत रुमसमोरच्या गॅलरीत बसले होते. सहजपणे वरुन खाली पाहिलं तर दबे पांव एक चमकदार धामण जात होती. बहुदा पाणी दिलेल्या हिरवळीवरचे बेडूक टिपायला आणि अंगाची लाही कमी करायला. तिला बघून स्तब्धच झाले. ती खाली खड्यात, मी वरच्या मजल्यावर. सळसळत एखाद्या सापाला नाहिसं व्हायला क्षणही पुरतो. पण ही येतच होती मुळी दबे पांव. हातात मोबाईल होताच. पटकन कॅमेरा ऑन करेस्तवर तिला चाहूल लागली. जागच्याजागी स्तब्ध झाली. त्या स्तब्धतेचाच एक व्हिडिओ आणि फोटो काढला आणि तिच्यावर नजर ठेवत मुलीला उठवायला गेले. हे सगळं आवाज न करता आणि आपल्या शरीराच्या जाणवतील अशा हालचाली न करता.
बोले तो दबे पांवहीच.
पण हाय कन्या झोपलेली होती. तरीपण मी नजर ठेवून होते. आता त्या धामणीला आवाजाचा आणि हालचालींचा पक्का सुगावा लागला होता. तिने सर्रकन झाडीत लपायला पलटी मारली आणि सळसळत सुरक्षित पण पालापाचोळ्यांच्या गचपणी जागेत गुप्त झाली.
परवा माझ्या मुलीला इथेच ती दिसली होती. हिच ती पार्किंगमधली धामण. भर दुपारची क्षुधाशांतीसाठी बाहेर पडली होती.
आज अगदी ध्यानीमनी नसताना सामोरी आली. माझ्या कुतुहलाने, फोटो काढण्याने तिला घाबरुन पळावं लागलं याचं फार वाईट वाटलं, तरीसुद्धा मी अजून जरा चांगली जागा हेरुन तिच्या वाटेवर नजर बिछाके बैठहीच गयी.
वरुन टेहळणी करणारी मी, आमच्या माणसांच्या दूरवरच्या हालचाली, बोलण्याचे आवाज, तिच्या वाटेवरच्या गचपणात, झाडो-यात पाखरांच्या भुर्र, भुर्र भरा-या..छे, आता कशाला ती येतेय ?
कितीही धोका दिसला तरी प्राण्यांची अनावर तहान भुक त्यांना स्वस्थ बसू देत नाही याची मला कल्पना होती. तस्सच झालं, पंधरा मिनिटांत ती परत अवतिर्ण झाली. पण हाय, तोपर्यंत आमची मंडळी उठली होती, कुणाचे फोन वाजले..आणि मग काय लगेच तिने पोबारा केला. आता तिच्या नादी लागण्यात अर्थ नव्हता. आम्हालाही फेरफटकारुपी तलावाची प्रदक्षिणा करायला निघायचं होतंच.
मनोमन फार खंतावले. धामण परत निट दिसली नाही म्हणून नाही तर एका मुक्या प्राण्याच्या जीवनावश्यक वर्तनाला आपल्यामुळे खोडा बसला म्हणून. माझ्यामुळे एक धामणीची अंगाची लाहीलाही होणार आणि पोटातली आग भडकलेलीच रहाणार म्हणून. मला कुणी असं भितीदायकपणे, दडपशाहीने वागवलं तर चालेल का ?
खूप अस्वस्थ झाले.
माझ्यामुळेच भुकेल्या रहात असलेल्या एका धामणीने एन्लायमेंटचा प्रसाद माझ्या हातात ठेवत मलाच उपकृत केले.
आधी धामणीसाठी वाईट वाटलं, मग स्वत:चीच लाज वाटली.
बघायला गेलं तर एक अनोख्या रुपाचा निरुपद्रवी प्राणी. साप म्हणा, धामण म्हणा, नाग म्हणा. Just because we are very curious and hypnotized about them, doesn't mean that we should terrorize them with our any kind of presence.
एक साधी धामण.
रणरणत्या उन्हामुळे अस्वस्थ झालेली, भुकेनी कासावीस झालेली. काहिली उन्हात हिरवळीचा गारवा अंगभर लपेटून घ्यावा आणि लगे पांव दोन-चार बेडकंही गट्टम करुन पोटातलीही आग शमवून घ्यावी या हिशेबाने सळसळत पण अतिसावधपणे निघालेली. पण माझ्यासारख्या अगोचरी उत्साही, बुध्दीवान व्यक्तीने तिच्या प्रवासात एक दहशती खोडा घालत तिला तडपवत ठेवलं.
आपल्याला पंखे-एसीने गारवलेल्या खोल्या आहेत. म्हणेल ते म्हणेल तेंव्हा खायला मिळतंय. जगण्याला आवश्यक असलेल्या गोष्टी मिळवताना, कंझ्युम करताना आपल्याला असं दिवाभितासारखं, सर्वांगाला डोळे-कान असल्यासारखं जगावं लागतं नाहीये याचं घसघशीत श्रेय माणसाच्या बुध्दीला द्यायला पाहिजे नाही ?
पण त्याच बुध्दीचा वापर करुन या भुतलावरच्या तमाम प्राणीजगताला असं दिवसा ढवळ्या काही आत्यंतिक गरजेच्या गोष्टींपासून वंचित ठेवणं योग्य आहे का ?
ज्या धामणीचे नुसते फोटो बघून वाचक अरे बापरे असे भयदर्शक उद्गार काढतात ती धामण माझी अगदी कणभर चाहूल लागली तरी धोक्याच्या भयाने काट्याकुट्यांची पर्वा न करता गचपणात लपते. माझं सातत्याने नजर ठेवून असल्यामुळे उपाशी रहाते.
NO !
This is not at all acceptable. I have no right to terrorise anyone and keep them away from their comfort.
यापुढे मी याची काळजी नक्की घेईल...👍
No comments:
Post a Comment