Tuesday, 12 May 2020

12 #क्वारंटाईनकेसाईडइफेक्ट्सऍन्डडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह

डर के आगे.....डर ही है !

अरे आज दिसली का कुणाला धामण ?
नाई मॅडम. आता आपन सगळेच तिला पाहू पाहू -हायलोत ना. आज दिसलीच नाही कुणीकडं.
मॅडम, धामण नाही पण आज मला त्या किचनकडे जाताना एक मोठ्ठ जनावर (साप-नाग) दिसलं. एकदम पिव्वर. काळेभोर. मी आपला आपल्याच नादात चाल्लो होतो, तर एकदम समोर आलं ते. मला पाहिलं आणि ते पन थांबलं. मला ते पाहू लागलं आनी मी त्याला पाहू लागलो. मला तो लगी सुधरलंच नाही. ते जवा झाडीत सुळ्ळकन गेलं तवाच मला सुधरलं.

हिरण्यच्या विस्तिर्ण, निसर्गरम्य परिसरात भरपूर तुटक्या, मोडक्या वळणदार काटक्या, वेली, फांद्या, नारळ-पामच्या झावळ्या पडलेल्या असतात. सध्यातर फारंच. तसंच पाण्याच्या पाईप्सचे छोटे-मोठे लयदार तुकडे, इलेक्ट्रिकच्या वळणदार केबल्स, कुठेही आडबाजूला पडलेले जाड-बारीक सुतळ्या-दोरखंड, मंडपवाल्यांचे नायलॉनचे-सुती फडके...वगैरे.
दिवसा या गोष्टी बघताना काही वाटत नाही, पण रात्रीमात्र हिरवळीवर, पाण्यात, पायवाटेवर, गचपणी झाडो-यात पडलेल्या या साप सदृश वळणदार गोष्टी पाहिल्याकी हल्ली जाम धडकायला होतं. 
खरंतर याच परिसरात पाच पन्नास साप आजपर्यंत प्रत्यक्ष पाहिलेत. पण हल्लीचा हिरण्यवरचा क्वारंटाईनमधला अधिवास, परिसरातच दोन-चार कंपल्सरी चकरा रोज होताहेत. हे प्राणी पण उन्हाच्या धगीने आणि परिसरातील निवांतपणा मुळे आक्रमकपणे फिरताहेत. एवढ्यातच झालेलं धामणीचं दर्शन आणि इथल्याच कुणा कुणाच्या या साप-नाग दर्शनाच्या चित्तवेधक कथा. अक्षरशः पावलांनाही डोळे फुटलेत म्हटलं तरी चालेल. विषेशकरुन दिवेलागणीला तर फारच कॉन्शस व्हायला होतयं. 
इकडे तिकडे दक्षपणे बघत अतिशय सावधपणे पावलं टाकत आहे. न जाणो कुठून तरी एखादं सळसळतं पिव्वर जनावर रस्त्यात यायचं. 
वाटेवर पडलेल्या लयदार फांद्या, काटक्या, नळ्या दुरुन एकदम सापासारख्याच वाटायला लागून काळजात धस्स होतंय. कधी नव्हे ते जवळपास सिक्युरिटी आहे याचा दिलासा मिळत आहे.

धामण म्हणा, पिव्वर म्हणा..या स्पेशीजने जीव आध्धर केलाय एवढं मात्र खरं.

No comments:

Post a Comment