हिंदी- चिनी भाई भाई...
आज (आता काल हं) अस्मादिकांनी घरच्या चवीचा चिवडा करायचा घाट घातला. पोहे-मुरमु-यांचा लसूण आणि इतरही नेहमीचं साहित्य घालून चिवडा केला. 😋
भरपूर लसूण, कढिपत्ता, धणे, किसलेलं खोबरं, जिरे, हिरव्या मिरच्या आणि काही लाल सुक्या मिरच्या, थोडं मीठ-साखर मिक्सरला वाटून घ्यायचं. मग एकीकडे खोब-याचे काप, तिळ, शेंगदाणे, डाळं, कढिपत्ता, सुक्या मिरच्या, थोड्या हिरव्या मिरच्या अंदाजाने घ्यायच्या. पातळ पोहे कोरडेच परतून घ्यायचे. मग कढईत सढळपणे तेल टाकून मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करणे. मग त्यात एकामागून एक असे शेंगदाणे, तिळ, खोबरं, डाळं, मिरच्या टाकत छान परतून घेणे. शेवटी वाटलेला मसाला आणि कढिपत्ता टाकून ही चुरचुरीत खमंग फोडणी परतलेल्या पोह्यांवर आणि मुरमु-यांवर टाकणे. मग चवीनुसार मीठ, पिठीसाखर आणि सिट्रिक एॅसिड पावडर टाकून हा चिवडा छानपणे घोळून घेतला की फर्मास चिवडा तयार. मला वाटणात ( इडली चटणीच्याही) ताजा आणि भरपूर कढिपत्ता वापरायची फार हौस आहे.
चिवडा नेहमीप्रमाणे खमंगच झाला.
हिरण्यच्या दोन मदतनीस आणि कूक होतेच मदतीला.
हे सगळे जणं आता माझ्या हाताखाली शिकताहेत असं म्हणणं म्हणजे दर्पोक्तीच होईल. पण ही मंडळी मला मदत करताना मी काय पदार्थ टाकतीये, कसे वापरतीये याचं बारकाईने निरीक्षण नक्कीच करत असतात.🤗
काय गं, तुम्ही दोघीही असाच चिवडा करत असाल नं घरी ?
आम्ही साधा चिवडा करतो म्याडम. शेंगदाने, खोब्र आणि तिखट, हळदीची फोडणी. हे तुमच्या सारखं वाटना घाटनाचे कुटाने न्हाई करत आम्ही.
इतक्या साध्या चिवड्याला कुटाना ?🙄
असू देत.
शेवटी खाद्य संस्कृती देखील एकेका स्तराची, समाजाची कळत नकळत मक्तेदारीच झालेली असते. तरी आज तळलेला कांदा, काजू बेदाण्याचं स्तोम नव्हतं.😌
तर ते असो.
बेसिकली मला आमच्या-माझ्या आवडीचा, पध्दतीचाच चिवडा करुन हवा होता म्हणून हा जातीने स्वत:चं लक्ष देत चिवडा करायचा घाट घातला.
क्वारंटाईन मधे देखील अजूनही जीभेचे चोचले, आपली पध्दत, घरच्यासारखंच हवचे कंगोरे शिल्लक आहेत बरं.
जाऊ तिथे आपली संस्कृती नेणं, जपणं आणि त्यात हरवलेली, सोडावी लागलेली उब शोधणं हे मानवच करु जाणे.
मग बसल्या बसल्या जाऊ तिथे घरपण शोधणा-या, घरपण देणा-या आशयाचे क्वोटस शोधले तर मला अपेक्षित असलेले दोन क्वोटस सापडले. हे दोन्ही क्वोट्स थोर चिनी विचारवंत कॉन्फेश्युअसचे आहेत.🙂
दोन दिवसांपूर्वी पंधरा मिनिटांत आठ सॅटेलाईटस एकामागे एक, तेही एकाच दिशेने जाताना दिसले होते.
हल्ली हिरण्यवरच्या क्वारंटाईनच्या वास्तव्यात आम्ही कधी नव्हे ते चौफेरपणे नेटचा, मोबाईलचा वापर २४*७ करत आहोत. रोज काही तरी नवीन झाड, पक्षी, साप, किटक बघीतले की विकिपीडियावर शोधायचं नसता त्या विषयाला वाहिलेले एॅप डाऊन लोड करुन माहिती मिळवायची. डोक्यावरुन जाणारी विमानं-सॅटेलाईटस ओळखायची, ता-यांची नावं शोधून काढायची..वगैरे..वगैरे.
Hiranya has a great potential for such things.
तर सॅटेलाईटसचा अभुतपुर्व पाठलाग बघत शोधलं तर अमेरिकन सॅटेलाईटस चिनी सॅटेलाईटसच्या मागे हात धुवून लागलेत म्हणे.
तरीच बरं एका पाठी एक जॅकी चॅनसारखे पळत होते.😲
तसंही चीनमधे उगम पावलेल्या कोरोनाने अख्ख्या जगाला बॉम्बवर बसवलं आहेच. आणि कोरोनाच्याच क्वारंटाईनच्या काळात केलेल्या चिवड्याच्या निमित्ताने व्यक्त व्हायला चीनी विचारवंतच कामी आला बरं. आता या भुतलावर खमंग चिवडा खात या चीनी-अमेरिकन सॅटेलाईटसची आकाशातली पकडा पकडी मानमोडी करत बघत बसते.🧐
तर असे आहेत बादरायणी संबंधातील हिंदी-चिनी भाई भाई.🙂😑
पटतंय का ?
नाही पटलं तर सोडून द्या.
क्वारंटाईन डिप्रेशनचा आविष्कार समजा आणि लेखाकडे काणाडोळा करा.🙂
मंग काय ? हाय काय आन् नाय काय.🙃
No comments:
Post a Comment