Tuesday, 12 May 2020

H Coronadiaries@hiranyaresorts

कोरोनाच्या छायेत नसताना आपापल्या ४-८-१६-३२ भिंतींच्या घरांमधे, आठ-दहा चढ-उताराच्या पाय-या असणा-या घरांमधे म्हटलं तर सगळेच समजूतदारपणे रहात असतात वा प्रयत्न तरी करतात. घरातली दैनंदिन कामं उरकली की जो तो आपापल्या बाहेरील वा घरातीलच विश्वात जातो, रमतो, कामं करतो. मग ती घरातली गृहिणी असो, वा यजमान असो वा मुलं असो वा आपले मदतनीस असो. 
आपापल्या कुवतीनुसार, तथाकथित उच्च-निच दर्जाप्रमाणे आपापलं एक स्वत:च असं विश्व तयार करतात. त्या विश्वातले ते तिथले राजे, राण्या वा कष्टकरी सैनिक असतात. कौटुंबिक चौकटीबाहेरची एक हवीहवीशी अशी मुक्तताच ही मंडळी आपापल्या विश्वात अनुभवत असतात. पण झालंय काय की या कोरोनाग्रस्तीमुळे जो तो घरात बंदिस्त झालाय. बाहेरच्या मोकळ्या आणि स्वत: निर्माण केलेल्या अवकाशात भरा-या मारायला सगळ्यांचे पंख फडफडताहेत. त्यामुळे या बंदिवासातली वैयक्तिक बैचेनी फार वाढली आहे.

एखाद्या समतल आणि एक फूट बाय् एक फूटवाल्या बुध्दीबळाच्या पटावर सगळे राजे-राण्या-सैन्य जमा झाल्यासारखे सगळे बंदिस्त झालेत. पण बुध्दिबळाचेही काही नियम असतात हो. आजपर्यंत आपापल्या विश्वात मुक्तपणे वावरणारे राजे-राण्या या बंदिवासाने भलतेच त्रस्त झालेत आणि चक्क बुध्दिबळाचे नियमही विसरलेत.

म्हणजे या कोरोनाग्रस्त काळातल्या बंद घरट्यातील प्रत्येकच व्यक्ती आता तिरकस चालायला बघतो आहे, राजकीय शिष्टाचार सोडून राजा काळं-पांढरं न बघता डूरु डूरु इकडे तिकडे उड्या मारतोय. घरची राणी म्हणजे तर काय महाराणी-महामायाच ती. 
राजा-वजीर, हत्ती-घोडे-उंट-सैन्य बाजूला सारुन हीच बया मोठ्या जोशात सगळे वार आततायी पणे झेलायला बघते आहे. 
बाकी आपली पोरं वा घरातले इतर नातलग म्हणजे वजीर, उंट, हत्ती, घोडे बिच्चारे आपल्याला नक्की कसं चालायचंय वा वागायचंय या संभ्रमात पडून आपापल्या खोल्यात, पागेत, तबेल्यात वा खान्यात पडून आहेत. आणि मदतनिस सैन्याचं म्हणाल तर त्यांनी रणांगणावरुन कधीच पळ काढत आपापल्या घरट्याचा आसरा घेतलाय.
थोडक्यात सद्यस्थितीत या कौटुंबिक बुध्दीबळाच्या पटावर राजे-राण्या, पायदळ-सैन्याचा कोणाचा पायपोस कोणात नाही अशी परिस्थिती आहे. 
कोण कोणाच्या आमने-सामने, बाजूने आहे हे ही आता कळेनासे झाले आहे. बंदिवासामुळे निर्माण झालेली घराघरातली रणधुमाळी शिगेला पोहंचत आहे.

तर बा कोरोना, आता आवर स्वत:ला आणि गुंडाळ तुझा गाशा आणि कर पोबारा. 
नसता हे असे घरट्यात बंदिस्त झालेले पामर आता एकमेकांचाच जीव घेतील आणि एकजात सगळेच डबाबंद होतील रे.

तो कोरोनासरकार...हम पें तरस खाओं और अब हमको बख्क्षो !
खुदा कसम, ये बेमिसाल खुली हवा हमें भी भाती है यार  !

No comments:

Post a Comment