कोरोना व्हायरसमुळे कंपल्सरी असलेल्या क्वारंटाईन काळात आम्ही कुटुंबिय दौलताबाद जवळच्या आमच्या हिरण्य रिसॉर्टमध्ये रहात आहोत.
दौलताबाद किल्ल्याजवळील हेरिटेज तलावालगतच, डोंगर रांगांमध्ये लपलेलं हिरवं गार हिरण्य. इथे सहसा चित्तवृत्ती प्रसन्नच रहातात. अर्थात माध्यान्हीचं तळपतं ऊन सोडल्यास.
या क्वारंटाईन काळात सकाळ संध्याकाळ प्रत्येकजण आपापले आवडीचे उद्योग निसर्गाच्या सान्निध्यात करत आहोत. कुणाची योगासनं, कुणाचे हार्ड कोअर एक्सर्साईजेस, कुणी स्किपींग करतंय. कुणी लॅन्डस्केप करतंय, तर कुणी टॅब घेऊन बसतंय. कुणी गजरे करतंय, तर कुणी भरतकाम करतंय तर कुणी हेड फोन्स लावून पळायला जातंय. कुणी स्विमिंग पूल मधे पोहतंय, कुणी इन्फ्लेटेड बोटीतून बोटिंग करतंय.
थोडक्यात भरपूर वैविध्यपूर्ण असलेले आपापले छंद जोपासणं चालू आहेत. अर्थातच सकाळच्या किंवा संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणातच.
आमच्या इथे सध्या माकडांच्या झुंडींनी फार वैताग आणलाय. रेस्टॉरंट मधली आयती मिळणारी अन्नाची रसद बंद झाली आहे. मेनरोडवरच्या ठिकठिकाणच्या फळवाल्यांकडून मिळणारा रतीबही बंद आहे या क्वारंटाईनमुळे. बिचारी माकडं उपाशी रहाताहेत. सावली आणि पाणवठ्यामुळे हिरण्यचा परिसर न सोडता आमच्या इथल्या अनेक झाडांचा कोवळा फुलोरा बघता बघता फस्त करताहेत. सकाळ-संध्याकाळ फलाहार आणि दुपारी आडबाजूच्या झाडांच्या सावलीचा आडोसा घेत ही माकडं हे परिक्षा घेणारे दिवस ढकलताहेत.
गारवेल, चिचोरे, कडुनिंब, कांचन, गुलमोहरांच्या झाडांवर बसून पाना-फुलांचा येथेच्छ फलाहार करताना ही मर्कट मंडळी,
अस्मादिकांची योगासनं-भरतकाम-गजरे करणं, सोशल मिडिया सर्फिंग, मुलांचं स्किपींग-वर्क आऊट्स, पोहणं, पग्जी खेळणं इत्यादी उद्योग इतके मन लावून बघताहेत की कालांतराने ही वानरसेना इव्हॉल्व्ह होऊन आमच्यासारखंच वागायला लागतात काय की ?
कोणे एकेकाळी अस्सच कोरोनासारखं एखादं आक्रित येऊन वानरांचे नर म्हणजे आपले आदरणीय पुर्वज इव्हॉल्व्ह झाले असावेत अशी मला आता दाट शंका येत आहे.
म्हणजे येत्या पावसाळ्यात दिसेल त्या प्रवाहात मनसोक्तपणे पोहणारी माकडं दिसली तर किंवा श्रावणात माकडीणबाई गजरा घालून उंडारताना दिसल्या तर आश्चर्य नको वाटायला.
बेसावधपणे पग्जी खेळणा-या लेकराला माकडीण आई फटकारताना किंवा कानात हेड फोन्स अडकवून २४*७ बातम्यात गर्क झालेल्या ह्यांना, "अहो ऐकलंत का ? मी कधीची बोलतीये तुमच्याशी" सारखं करदवाणारी शेपूटवाली माकडीण दिसणं फार दूर नाहीये बरंका या हिरण्य भुमीत. 😬
No comments:
Post a Comment