Tuesday, 12 May 2020

9 #क्वारंटाईनकेसाईडइफेक्ट्सऍन्डडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह

अगदी झुंजूमुंजूला उठायचा उत्साह आता मावळत चाललाय. निसर्गरम्य हिरण्यलाच आहोत. तरी हा देखील आता सोन्याचा पिंजराच वाटू लागला आहे. 

उठून तरी काय करायचं इतक्या लवकर ? 
तशीही अगोचर माकडं गॅलरीजवळच्या झाडांवर फलाहार करत बसलेलेच असतात त्यामुळे दारही उघडं टाकता येत नाही. 
चला आज लोळूच यात. 
एखादा दिवस उगाचच उसासे टाकत उगवतो.
काय करावं बरं म्हणजे आपलं मन रमेल आता ?

जावं का एॅपकोच्या दुकानात ? भले काही खरेदी करो ना करो, त्या सुपरिचित आणि लाडक्या दुकानात जाणं, मऊसुत सुती, सळसळत्या रेशमी रंगबिरंगी साड्या-कापडं हाताळले तरी आपल्याला एनर्जेटिक वाटेल नाही ? तसंच त्या दुकान सांभाळणा-या नोकरदार व्यक्तीलाही छान वाटेल आपलं नेहमीचं काम करायला मिळतंय म्हणून.
या...मॅडम...फार दिवसांनी आलात ? भरपूर स्टॉक आलाय सोसायट्यांकडून. बोला काय दाखवू ?

का जावं पाणचक्कीतल्या आपल्या नेहमीच्या दुकानात आणि डोळे भरुन बघाव्यात एॅमेथिस्ट, मॅलॅकाईट, एॅगॅट, टायगर्स आय, लॅपिझ लॅझुलीच्या वजनी आणि गुळगुळीत माळा ? हात लावून त्यांचा आश्वस्त थंडगार स्पर्श अनुभवावा ?

का काढावी स्कुटर आणि फिरुन यावं शहरातल्या पुरातन पु-यांमधून, गल्ल्यांमधून. घ्यावेत जुने नवे वास उर भरुन. निरखावीत हिरवी, निळी, भगवी माणसं ? 
वाकलेली-रापलेली, पिवळी-राखाडी माणसं. बघावं त्यांच्या डोळ्यात. शोधावी जगण्याची आदिम आणि चिरंजीव चमक. जाणून घ्यावं त्या चमके मागचं स्फुलिंग आणि लवचिक कण्यामागची प्रेरणा ?

का जावं भाजी बाजारात आणि हुंगावा त्या भाज्यांचा तजेलदार वास ? ही कोथिंबीर, तो कढिपत्ता, हा पत्ताकोबी, ही दोडकी, ही टरबूजं तर ते अंगूर, ते हाकारे ते चैतन्य.

रोजच्या जगण्यात जाणवतही नाही की आपण किती उर्जा घेत असतो आपल्या रोजच्या दैनंदिन कामातून, अशा अनेक संबंधित व्यक्तीकडून ते. ही माणसं, हे व्यवहार आपल्याला कळत नकळतपणे किती अपूर्व अशा पॉझिटिव्ह एनर्जीने भारुन टाकत असतात ते.
कोरोना क्वारंटाईनच्या दोन-तीन आठवड्यांतच आपले हे हाल आहेत. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जुलमी बंदिवासात एकाकी कसे दिवस काढले असतील बरं ?

इथे टिळक-सावरकर प्रकर्षाने आठवताहेत. बंदिवासातही जे आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत. उलट अरुंद, अंधा-या खोल्यात रुजून गगनावरी गेलेला त्यांचा सृजनशीलतेचा वेलू पाहिला की अक्षरशः थक्क व्हायला होतं. या कणखर थोरवी पुढे आपली कुरकुर नगण्य पालापाचोळा आहे.

No comments:

Post a Comment