आज हनुमान जयंती आहे.
गेले काही दिवस झाले आम्ही हनुमानाच्या वंशजांचा हिरण्यवरचा धुमाकूळ बघत आहोत.
कोरोना व्हायरसमुळे हिरण्य पार थंडावलंय. चार सहा स्थानिक मदतनीसांच्या सहकार्याने आमचा इथला क्वारंटाईन स्टे सुसह्य होतोय. परंतू हिरण्यच्या भटारखान्यातल्या टाकावू मालावर पोटभरणारे किंवा पोट भरण्यासाठी सोकावलेली माकडांची झुंड भलतीच अस्वस्थ झाली आहे.
सवयीतला इथला जेवणाचा राबता थांबलाय पण उन्हाळा इतका कहरी झालाय की त्या माकडांना हिरण्यच्या तलावालगतच्या हिरव्यागार परिसरात रहाण्याशिवाय पर्याय नाहीये.
कोणाचीही असो, पोटात आगडोंब उसळवणारी भूक ही अस्वस्थ करणारीच असते.
उपाशी तापाशी माकडं हिरण्यच्या झाडो-यांवरच्या वासंतिक फुलोऱ्यावर येथेच्छ ताव मारत आहे.
मिळेल तिथे धुडगूस घालत आहेत. आमच्या वास्तव्याने जराशी शेफारलेली श्वानं या धुडगूस घालणा-या मर्कटांना अक्षरशः पाण्यात पहाताहेत.
थोडक्यात गेले चार पाच दिवस झाले माकडं आणि श्वानं फारच इरेला पडलेत.
आजपर्यंत हिरण्यच्या परिसरात कधीही, कुठेही एकटी फिरायला न घाबरणारी मी हल्ली चक्क काठी घेऊन बाहेर पडते. नसता सोबत नेते. माकडं आता आमच्यावर व आमच्या श्वानांवर दूरुन-जवळून खुन्नस खाऊनच आहेत.
क्या करे पापी पेट का सवाल है.
अगदी आमच्या खोल्या देखील ऊन्हाच्या तिरीपेसाठी उघड्या ठेवताना दोनदा विचार करावा लागतोय.
कालच मी पहाटेसच गॅलरीत बसून गजरे करत होते. एका भल्या मोठ्या स्टीलच्या टोपल्यात मोगरे होते. कुठून तरी एक माकड त्या भांड्याकडे आशेने बघत होते. माझं लक्ष नाही असं पाहून अगदी माझ्या जवळ आले. घाबरुन मी पटकन मोबाईल, टोपलं आणि गजरे घेऊन रुममध्ये पळाले. दार लावून खिडकीतून बघतीलं तर माझं दो-याचं रिळ त्या मर्कटाने हस्तगत केले होते. सिगरेट सारखं तोंडांत ते रिळ धरलं. पण नंतर माझा आरडाओरडा ऐकून ते रिळ तिथेच टाकून त्याने पळ काढला.
जेवणाची थांबलेली रसद, माणसांचा शुन्य वावर असलेलं सुशेगात हिरवं हिरण्य आणि अंगभूत मर्कट चाळे यामुळे या वास्तव्यात वानरे उदंड जाहली असंच म्हणायची वेळ आली आहे.
No comments:
Post a Comment