Monday, 11 May 2020

4 #क्वारंटाईनकेसाईडइफेक्ट्सऍन्डडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह

कुणाला खरं वाटणार नाही पण इथे हिरण्यला कोरोना क्वारंटाईनच्या कालावधीतला वेळ कसा जातो कळतही नाही.
पहाटेस सुरु झालेला दिवस मधल्या दुपारचा तासाभराचा सिएस्टा सोडला तर अक्षरशः एॅक्शन पॅक्ड जातो. 

रुममधलंच पहाटेचं गरम पाणी प्राशन, मग चहा. 
मग सकाळचे हिरण्यमधल्याच वेगवेगळ्या पायवाटांवरचे फेरफटके. थोडंसं सोशल मिडियात डोकावणं. आपल्याला काही लिहायचं असल्यास ते टाईपणं, तेही परत एखादा आयता चहा घेत. नंतर किचनमधे डोकावून भाज्या आणि चटण्या करणं वा इनिशियेट करुन देत रुम गाठणं. मग आंघोळ, धुणं. 
रुम आवरत सोमीवरच्या आपल्या लिखाणाला मिळालेल्या लाईक्सवर डोळा ठेवत कंमेंटसना उत्तरं देणं. तापलेल्या ऊन्हामधे रेस्टॉरंट मधे जाऊन जेवण झटपट उरकणं. मग रुममध्ये येऊन कथारुप महाभारताची काही पानं उलटवणं हे क्रमप्राप्तच आहे. 
घेतला वसा टाकू नये या न्यायाने हे महाभारताचे दोन खंड संपवायचेच आहेत.
भर उन्हाळ्यात तेही चुटपुट कारणासाठी शे दोनशे मिटरच्या फे-या रेस्टॉरंट पर्यंत मार मारुन, सकाळचे मनमौजी फेरफटके उरकून भरल्यापोटी हे महाभारत वाचणं म्हणजे हमखास झोप येतेच. 

तीन नाही वाजत की कधी भरतकाम, कधी आयपॅड, कधी कॅमेरा अशा गोष्टींच्या नादी लागणे. ऊन्हं उतरली की कधी योगासनं, नाहीतर पोरांच्या नादी लागून स्क्वॅटस, क्रंचेस वा सिट अप्स् असला काहीतरी जीवकाढू व्यायाम करणे. 
परत इच्छा, हवामान आणि शारिरीक दम शिल्लक असेल तर परत एक फेरफटका फोटो काढत रमत गमत मारणे. तदनंतर रात्रीच्या जेवणासाठी स्थानापन्न होणे, मस्त शुभ्र पलंगपोस टाकलेल्या खाटा असतात. 
नभात चंद्र-चांदण्या झगमगत असतात.  मग नातलग, मित्रमंडळींनी फोनवरुन ख्याली खुशहाली विचारणे. आमच्याही कुटुबियांच्या दिवसभरातल्या पहिल्यांदाच चतुरस्त्र अशा गप्पा रंगतात. नऊ नाही वाजत की वन डिश फूड समोर येतं. 
मस्त गारव्यात, मऊशार हिरवळीवर, शितल चांदण्याखाली ऊभ्या आडव्या गप्पा, चर्चा रंगतात, वादही पेटतात.
अशा त-हेने एक दिवस सार्थकी लागतो.  

तर आजचा हा पाचुचा फोटो अशाच एका अनवट ठिकाणावरुन काढला आहे.
पण भल्या सकाळी आज मी तिथे कशी पोहोचले हे पुढच्या पोस्टमध्ये...👍

No comments:

Post a Comment