Monday, 11 May 2020

3 #कोरोनाकेसाईडइफेक्ट्सऍन्डडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह

कबुतरं घुमताहेत, 
बुलबुल बागडताहेत, 
साळूंक्या पाणवठ्यावर आलेल्या बायांसारख्या कलकलताहेत. 
इतका वेळ हिरण्यरुपी अंगणात येथेच्छ धुमाकूळ घातलेल्या वानरसेनेची आमच्याच माणसाने एका कोपऱ्यात हुसकावणी केली आहे. 
तलावाकडे जाणा-या डोंगरातल्या पायवाटेवर गावातलं गोधन आलं आहे. 
खाणं आणि पिणं उरकायला.  
कोरोनाच्या भयग्रस्त जाणीवेतला ताज्या दमाचा गडी भराभर हाकारे देत त्यांना तलावाकडे पिटाळतो आहे. आजपर्यंत डूलत, डूलत रमत गमत जाणारी ही जनावरं या हाका-यांनी बावचळून गेली आहेत. एकमेकांना धक्के मारत, पायात पाय अडकवत, चिक्कार धूळ उडवत ही जनावरं लगबगीने पाणवठ्यावर जाताहेत.

आपल्याला कोरोनाच्या संचारबंदी मधे आपलंच पडलंय. पण अख्ख्या शहराला दूध पुरवठा करणाऱ्या या फ्रिंज एरियातल्या गोठे मालकांनी काय करायचं ? 
रोजचं चरायला, पाणी प्यायला दिवसभरासाठी दूरवर जाणारी जनावरं तुम्ही किती बंदिस्त ठेवणारं ? 
त्या जनावरांच आरोग्य, घराजवळची अपूरी जागा, मलमुत्र विसर्जनाच्या गैरसोयी, परत निसर्गातला रोजचा एक-दोन किलोमीटरचा फेरफटका नसल्यामुळे त्या जनावरांच बिघडलेलं तंत्र. 
ज्याला त्याला आपापल्या अडचणी आहेत. 
जमेल तसे लोकं मार्ग काढताहेत. एॅडजस्ट होताहेत. या गाई म्हशी देखील हल्ली रोज येत नाहीयेत. पण आठवड्यातून दोनदा तरी त्यांना फिरवणं गरजेचच असावं. गावाबाहेर असल्यामुळे बहुदा मॅनेज करता येतंय.

म्हणजे आजपर्यंत दिवसभर बाहेर मनसोक्त चरुन, घराच्या, गोठ्यातल्या वासरांच्या ओढीने संध्याकाळी लगबगीने परतणा-या गाईंमुळे जी धूळ उडते तिला गोरज म्हणतात. (संध्याकाळच्या लग्नमुहूर्तांना गोरज मुहूर्त म्हणतात) या वासरांच्या ओढीने घरी परतणाऱ्या गाईंवर ब-याच साहित्यीकांनी लिहिलंय, कवींनी काव्य रचलय. तर या सध्याच्या या कोरोना विषाणूच्या भयामूळे बंदिवासात असलेलं गोधन आता सकाळीच उत्कटतेने पाणवठ्यावर निघतंय. 
गाई म्हशींच्या गळ्यातल्या घंटांची उत्साही किणकिणच त्यांची पाणवठ्यावर जायची आतूरता अधोरेखित करत आहे. 
दुरवरुन ऐकू येणारा त्यांच्या खुरांचा दबदब आवाज, लगबगीमुळे वर उडणारी सुवर्णांकीत धूळ आणि कानात अक्षरशः रुंजत रहाणारी त्यांच्या घंटांची किणकिण. 

या दूरवरच्या कर्णसुखद अनुभवावर सुध्दा एखादा सृजनशील चार ओळी लिहिल का ?

No comments:

Post a Comment