Wednesday, 6 May 2020

शुकरान इजिप्त...१ (ब)

कैरोतल्या ताहरिर चौकातल्या आमच्या रुममध्ये मानसिकरीत्या स्थानापन्न होऊन, गारीगार करकडे पिऊन ताजेतवाने आणि निश्चिंत झालो. हॉस्टेलच्या मालकाशी म्हणजे या मुलींच्या भावाशी एॅह्य्मद(अहमद) बहुदा फोनवरुनच बोललो आणि संध्याकाळचा फेरफटका आणि रात्रीचं जेवण कुठे करता येईल याच्या चौकशा आणि उद्याचं कैरो म्युझियमचं दर्शन पक्क केलं आणि तयार होऊन बाहेर पडलो. 

डिसेंबर-जानेवारी म्हणजे इजिप्तमध्ये हिवाळा असतो. आपल्याला साधारणतः इजिप्त वगैरे देश म्हणजे कायम उन्हाळाच वाटतो. पण तसं नाहिये. इजिप्तमध्ये आणि खुद्द कैरोतही भरपूर थंडी होती. थोडक्यात काहीही कपडे घातले तरी वरुन थंडीच्या बंदोबस्तासाठी जॅकेट्स, स्वेटर्स आणि स्टोल्स घेणं क्रमप्राप्त होतं.

खाली उतरताना मुद्दामच पाय-यांचा वापर केला. आपल्या जुन्या थेटरांसारख्या रुंद आणि शहाबादी पाय-या, भिंतींना कमरेपर्यंतच्या उंचीपर्यंत ऑईलपेंट मारलेला. त्यातही हिरवी-चॉकलेटी रंगसंगती. अंधा-या कोपऱ्यात एक सिक्युरिटी सदृश्य म्हातारा पलंगावर बसलेला. मेन गेटला लोखंडी जाळीचं दार, दारा बाहेर झटपट पोळी -भाजीचा इजिप्तशियन अवतार देणारं एक फुटकळ दुकान. उन्नीस बीस फरक सोडला तर हे दृश्य भारतातल्या कुठल्याही शहरात बघायला मिळेल. विशेषतः गजबज असलेल्या चौकांमध्ये. 
अहमदने पायीच फिरत जवळच्या आबू तारेक या सुप्रसिद्ध रेस्टॉरंट मधे जाऊन तिथली कोशारी खाऊन बघायची शिफारीश केली होती. जेमतेम दहा पंधरा मिनिटांचा वॉक. हमरस्त्याच्या आडबाजूचे प्रशस्त रस्ते, उंचेल्या पण जुनाट इमारती. कुठे गॅरेज, तर कुठे पंक्चरची दुकानं. कुठे ट्रॅव्हल एजन्सी तर कुठे म्युझिक शॉप. आणि प्रत्येक दोन इमारतींच्या बोळात हुक्का वा शिशा जॉईंटस. आपल्यासारख्याच चहाच्या टप-यांसारखेच मेक शिफ्ट हे जॉईंटस आहेत. छोट्याशा टेबलावर मिक्सर वगैरे ठेवून सिझनप्रमाणे गरम-गार ज्युसेस देतात आणि हुक्के तर असतातचं. एका टोपलीत निखारे असतात. रस्त्याच्या फुटपाथवर अगदी छोटी टेबलं आणि काही खुर्च्या असतात. ज्याला हुक्का ओढायचा आहे तो येऊन बसतो, आपापला फ्लेवर सांगतो, हवा असल्यास ज्युसही घेतो आणि तासनतास शिशा ओढत बसतो. अधूनमधून निखारे रिप्लेस होतात, फ्लेवरही एॅड होतो. सगळ्यात कमाल याची वाटली की आपण जसे कुठल्याही कोपऱ्यातल्या चहा टपरीवर बिनदिक्कत जातो तसेच हे इजिप्तशियन पुरुष आणि believe me हिजाबधारी महिला देखील बिनधास्तपणे या हुक्का जॉईंटवर हजेरी लावून जातात. प्रत्येक दोन इमारतींमध्ये हेच दृश्य. आम्ही मायलेकी हे दृश्य बघूनच हरकून गेलो. बाहेर अंधारलेलं, गारठा वाढलेला, थंडीमुळे सुटबुटातले देखणे इजिप्तशीन चटचट घराकडे निघालेले, तद्दन वेस्टर्न कपडे, त्यावर स्टायलिश ओव्हरकोट आणि डोक्यावर गच्च हिजाब (head scarf) घातलेल्या महिला बिनधास्त पंधरा-वीस मिनिटं या जॉईंटसवर टेकत होते, उबदार हुक्का आणि गरम लेमन टी घेत मोबाईल निरखत, गप्पामारत निवांत बसून जात होते.

आम्हाला दोघींनाही चारेक वर्षांपूर्वीची भारतातली हुक्क्याची लाट आठवली. आमच्या हिरण्यलाही दोन-चार हुक्का पॉटस होते. पण मी कधी फारशी त्या हुक्क्यांच्या नादी लागले नव्हते. पण इथल्या कैरोतल्या एका महत्त्वाच्या हमरस्त्या मागचा हा भर कडकडीत थंडीतला धुवां ही धुवां पाहिला आणि भलतीच इंप्रेस झाले. लगे पाव दोघीही एका ठिकाणी थांबलो. झकास पैकी हुक्का ओढला. खरं सांगू ? त्या हुक्क्याच्या चवीपेक्षा, उबे पेक्षाही ये धुवांधुवां माहौलनेही हमें जीत लिया. 
मस्तच सुरवात झाली. 
मग पुढे आबू तारेक या दुमजली यथतथा पण चहलपहलवाल्या रेस्टॉरंटमधे गेलो. परत आपल्या भारतीय जुन्या सर्वसाधारण हाॅटेल सारखं रुप. प्रथमदर्शनीच गल्ला. शेजारी चार सहा गांधी टोपी सारखी टोपी घातलेला कर्मचारी वर्ग. काऊंटरवरच मोठं मोठ्या टोपल्यात भात, स्पॅगेटी, पास्ता, तळलेला कांदा, वाफवलेले मसूर-काबूली चणे ठेवलेले. वरचा मजला जरासा प्रिमियम म्हणजे फॅमिलीवाला. तडक वर गेलो.  बिन हिजाबवाल्या आम्ही दोघीच त्यामुळे त्यातल्या त्यात स्मार्ट संभाषण समजू शकणारा वेटर आमच्या जवळ आला. दोन कोशारी मागवल्या. दहा मिनिटात मोठाल्या वाडग्यात खाली पाहिलेल्या सर्व पदार्थांचे मिश्रण समोर आलं. मोडक्या इंग्रजीत त्या वेटरने तुमच्या खिचडी सारखाच हा प्रकार आहे हे सांगितलं. त्या कोशारीवर काही सॉस त्याने टाकले, लागतील तसे टेबलावरचे अजून काही सॉस वापरा म्हणाला आणि तो गेला. स्टीलची टेबल-खुर्च्या, फास्ट मुव्हींग कस्टमर्स. भरपूर चहल पहल, भांडी-चमच्यांचा खणखणाट. 
आपले भेळ-चाटचे, थालीचे सेंटर्स जसे असतील तसे. आणि समोर आलेली कोशारी. आठ दहा जीनसांची आणि चार पाच सॉसेसची खरोखरंच भेळ कम् खिचडी होती. चवीला अत्यंत रुचकर आणि पोटभरीची. 
भात, मसुर-काबुली चणे, स्पॅगेटी-पास्ता,तिखटाचा-लसणाचा सॉस, व्हिनेगरची आंबट चव... सकाळपासून छान जेवलोच नव्हतो. येथेच्छ चापली ही स्वादीष्ट कोशारी. अन्नदाता सुखी भव म्हणत बिल पे केलं, वेटरला थंब्स अप करुन बाहेर पडलो. 
आता तर हुक्का जॉईंट अजूनच फुललेले. महिला जाऊन पुरुषांच्या रोजच्या टोळ्यांनी जागा पटकावलेल्या. मित्रांबरोबर हुक्का, लेमन टी, टर्किश कॉफी, गप्पा आणि तवला नावाचा बोर्ड गेम भलत्याच... मैफिली रंगात आल्या होत्या. 
झगमग पण शांत झालेले हमरस्ते, टेबला टेबलांवर हुक्के पेटलेले, खेळ-गप्पा रंगलेले. One corner of the Cairo was in its finest element. 
Loved this scenario. परत लगे पांव लेमन टी चाखला काही फोटो घेतले आणि रुमवर परतलो. 

हां ! 
मध्यरात्री सुरु झालेली एक्स्प्रेस आता यार्डात टेकली होती. 
सुंदरच. 
कैरोने पहिल्याच दिवशी मन जिंकलं. 
खरोखर आपलसं केलं.

त्या दोन गोड पोरी, त्यांच्या मदतीने, त्यांची काळजी घेत
हॉस्टेल चालवणारा त्यांचा जबाबदार भाऊ, खाटेवर पहुडत दक्ष रहाणारी सिक्युरिटी आणि मुख्य म्हणजे चवदार करकडे, रुचकर कोशारी आणि धुवांही धुवांवाला हुक्का... 
बस्स, माहौल तो बढियाही बनता जा रहा है. 
देखते है कल का दिन मुठ्ठी में क्या रखता है ?

No comments:

Post a Comment