हिरण्यला रहायला येऊन बरेच दिवस झालेत. आल्या आल्या आमचं घरातलं सगळं रुटिन मोडीत निघालं. झोपेतून उठलं की आधी हुंजा चहा करायचा. अंगणातल्याच दोन-तीन शेलाट्या तुळशींची आल्टुनपाल्टुन चार सहा पानं खुडायची. बाजारातून आणलेला पुदिना जपून वापरायचा. मग हुंजा चहातल्या हळदीने पिवळटलेल्या गाळणीतुनच चहा गाळायचा.
टी स्पुनने मध टाकायचा आणि आपल्या व्हरांड्यातल्या सिंहासनावर बसत, फेसबुकवर डोकावतं हा काढा कम चहा घ्यायचा. इकडे कोरोनापासून बचाव म्हणून गरम पाणी हळद प्यायला सांगताहेत आणि इकडे हिरण्यला येऊन आमचा हळदयुक्त हुंजा चहा घेणं नेमकं बंद झालेलं.
तर आता नवलाई संपून थोडासा आमचा शहरातला दिनक्रम प्रस्थापित करणं चालू केलयं.
आजचा हा हुंजा चहा. हिरण्यच्या एकावेळेस निदान पन्नास-शंभरांचा स्वैपाक करु शकणा-या बेसिक स्वैपाक घरात आमच्यासाठी लागणारी भातुकली सारखी भांडीच नाहीयेत. त्यामुळे माझ्या पध्दतीप्रमाणे, सरावाप्रमाणे इथे काम करणं कठीण चाललंय. चिमटा-सांडशी तर काल कशीबशी शोधून मिळाली. हे भल्यामोठ्या कढया असतात, या लोकांना चिमटा लागतच नाही.
तसंच ते चाकूच पण. इंचभर आलं कापायला हातभर चाकू. मोठाले बर्नर्स तर इतके भकाभक पेटतात की दचकायलाच होतं. पण हळूहळू आम्ही म्हणण्यापेक्षा मी या भीमकाय स्वैपाक घरात एॅडजस्ट होत आहे. आमची पण हिरणृयवरची माणसं आता जरा माझ्या वावरण्याला सरावली आहेत. तरी देखील तुळस-पुदिना आणा म्हटलं की ह्या साताठ काड्या आणून ठेवतात. दहा माणसांना पुरतील अशा या जुड्या पाहिल्या की घरची तुळस आणि निगुतीने तिची चारदोन पानंच, तेही आल्टुन पाल्टुन खुडणारे आपण आठवतो.
मला लागणारं किडूक मिडूक सामान-साहित्य आणून द्यायला या लोकांची फार पळापळ होते. तरीपण आता एक कोपरा मी माझा म्हणून ताब्यात घेतलाय. मला लागणारा छोटा चाकू, छोटे चमचे, बारक्या किसण्या, मापाच्या छोट्या वाट्या इत्यादी साहित्य तिथे जमवून ठेवलं आहे.
नेहमी पाचपन्नास वा शेकडा पब्लिकसाठी रपारप स्वैपाक करणारे आमचे उस्ताद हल्ली माझ्याकडून स्वैपाक शिकताहेत.
अर्थात अजूनही मला बरंच एॅडजस्ट करवून, धकवून घेत इथलं स्वैपाकपाणी उरकवून घ्यावं लागतंय. कारण घरच्या चवीच्याच भाज्या, चटण्या हव्यात हा आमचा हट्ट आहे. आपल्या शहरी राज्यातले मला अस्सच हवं, मला तस्सच लागतंचे आग्रही आणि नाजूक इमले इथे कोसळताहेत. तरी इथे अन्नधान्य ब-यापैकी मुबलकपणे उपलब्ध आहे, फक्त प्रोसेस करताना जास्त अडचणी येताहेत. जिथे सगळीच वानवा असेल तिथे लोकं कसे रहात असतील बरं ?
बचेंगे तो और लढेंगे या युक्तीचा प्रत्यय घेत जगणं हे खरं समृध्द जगणं आहे नाही ?
तर आजचा हा महत्प्रयासाने (म्हणजे नखाने अद्रक कुरतडून, तोडून) बनवलेला, चहाच्याच गाळणीने गाळावा लागलेला हुंजा टी.
Feeling absolutely Powerful !
No comments:
Post a Comment