Wednesday, 6 May 2020

शुकरान इजिप्त...१ (अ)

कधीचं लिहून हातावेगळं करायचं म्हणते आहे पण कुठली तरी माशी शिंकते आणि राहुनच जातंय लिहिणं. गेले जवळपास दिडवर्षात किती तरी मुहुर्त तशीच तोंडाला पानं पुसून गेली. शेवटी आजपासून इजिप्त प्रवासावर दिवसावार लिहायचं ठरवलं आहे. 
फोटो बघून, लेकीशी कंफर्म करुन आठवेल तसं लिहिणार आहे. बघू कितपत न्याय देऊ शकते ते. वाचकांना आवडेल अशी खात्री आहे तरी मनापासून सर्वांनी अभिप्राय कळवावेत.

२०१८च्या डिसेंबरमधे आम्ही ऑस्ट्रेलियाच्या दिर्घ प्रवासावरुन परतलो होतो. अचानक लेकीला कामानिमित्त जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात इजिप्तला जाणं भाग होतं. मीना प्रभुंच इजिप्तायन वाचल्यापासून इजिप्तने अक्षरशः झपाटलंच होतं. अनायसे संधी होती. लेकीबरोबर इजिप्तला जायचा लगेच निर्णय घेतला. तिकिटं-व्हिजाचा इंतजाम केला आणि लगेच डिसेंबरच्या ३० तारखेला प्रयाण देखील केले. साधारणपणे दहा जानेवारीपर्यंत आम्ही दोघी मायलेकी एकत्र रहाणार-फिरणार होतो. नंतर ती तिच्या ऑफिस ग्रुपला जॉईन होत २३ जानेवारी पर्यंत ती इजिप्तमध्येच रहाणार होती. मी मात्र नंतरचे ४ दिवस एकटी राहून १४ जानेवारीला एकटीच परतणार होते.

निघायच्या दिवशी मुंबईला पोहंचत नाही तर कैरोत दोन बॉंब स्फोट होत दोन चार पर्यटक गेल्याच्या बातम्या आल्या. निघायच्या आधीच एक दोन मैत्रिणींकडून इजिप्तची भरपूर ताजी माहिती घेतली होती. एका मैत्रिणीचा एक विद्यार्थी इजिप्तमधेच रहात होता. त्याच्याशी संपर्क साधला. त्याने तर तिथली परिस्थिती बघता येऊच नका असा सल्ला दिला. पण सुदैवाने अशा गोष्टींनी आम्ही कुटुंबिय असे पटकन डगमगत नाहीत. त्यात मुलगी निर्मिका बरोबर होती. त्यामुळे कुठलाही फारसा उहापोह न करता आम्ही मध्य रात्र-पहाटेची फ्लाईट पकडली. 
बहारीनला तीन चार तासांचा सकाळचा ले ओव्हर होता.

हिवाळी निळी पहाट. सर्वदूर समुद्र रेतीच्या रंगाच्या टोलेजंग इमारती. नावापुरती सडसडीत पामची झाडं. विमानतळावरची सुप्रभातीची प्रसन्न सकाळ. पण जरासं करडंच वातावरण. म्हणजे आम्हाला तसं वाटलं. 
अतिशय उत्तम शुभ्र कापडाचे लयदार गलेबिया घातलेले उंचेपुरे, देखणे अरब पुरुष. पण एकाच्याही चेह-यावर बेसिकपणे अपेक्षित असलेली पुसटसी स्मितरेषा वा नजरेनी दखल देणं, घेणं असेल तर शप्पथ. झाडून सगळे प्रिंस ऑफ अरेबिया निर्विकारपणे शुन्यात नजर लावून बसलेले. अगदी मोजक्याच महिला दिसल्या पण त्याही नखशिखांत बुरख्यात. त्या तर अजूनच इतर प्रवाश्यांपासून अंतर राखून असलेल्या. इस्लामिक गुरुंचा एक जथ्यापण कैरोपर्यंत आमच्याबरोबर होता. आपल्या जैन गुरुंसारखं क्रिस्प शुभ्र वस्त्र कमरेभोवती गुंडाळून त्याचा एक पदर खांद्यावरुन घेतलेला. लहानखूरी चण, खुरटी दाढी. नावातून, भाषेतून उघडे न पडते तर कुठल्याही हिंदूपंथाचे गुरु म्हणून सहज चालून गेले असते. विमान प्रवासात देखील जो तो म्हणजे बुरखाधारी महिला सुध्दा मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेल्या. काही जणांच्या हातात जपाची माळ. इथेच तो माझ्यासाठी नवीन असलेला दमघुटी बुरखा पाहिला. बुरखा म्हणजे सर्वांग झाकेल असा एक पायघोळ डगला असतो. चेहरा आणि डोक्यासाठी वेगळं कापड असतं. आपल्याकडे साधारण ओढणी गुंडाळून चेहरा उघडा ठेवतात. पण या एयरपोर्टवर चेहरा पुर्णपणे झुळझुळीत कापडाने झाकलेला. या कापडावर डोळ्याच्या ठिकाणी गॉगल्स सारखा एक कडक मास्क लावलेला. जेणेकरून थोड्याफार हालचालीने सुध्दा हा मास्क हलू नये आणि नाक डोळे उघडे पडू म्हणून हा अनोखा प्रकार. शुभ्र कपड्यातले ते राजबिंडे पुरुष आणि काळ्या डगल्यात बंदिस्त केलेल्या या रुपवान महिला. 
काही केल्या ताळमेळ बसेना. आता पुढचे १५ दिवस अशाच करडेपणाची सवय ठेवावी लागणारे म्हणून दडपणच आलं. 
तरीपण अधीरपणाने विमानातून दिसणारं पिवळं रणं, निळासागर बघत बालपणीच्या सिंदबाद, अलिबाबा, कासिमच्या लोभस कथा आठवत बसले. हातातल्या ग्लाॅसी मासिकात काही चित्रकारांवरचे अरेबिक भाषेतील लेख बघून जरा आश्वस्तही झाले.

कैरोत उतरेपर्यंत दुपार झाली. करंसी आणि सिम कार्ड घ्यायच्या नादात दोन तीन तास तिथेच उडाले. 
कैरो. 
एक अगदी प्राचीन मानवी वसाहत असलेलं शहर. तेही युरोप आशिया खंडाच्या मध्यावर. भरपूर संक्रमणं झालेली, देशोविदेशीच्या लोकांनी इथे पाय रोवलेले. त्याची एक झलक म्हणजे इथे खूप वेगवेगळ्या चेहरापट्टीचे, अंगचणीचे लोकं दिसतात. बघता क्षणीच तुम्हाला कळतं अरे he has got a unique features म्हणून. अर्थात हे सरसकटपणे पुरुषांविषयी म्हणते आहे मी. महिला इतक्या दिसणं, बारकाईने बघता येणं अशक्यच आहे. तशा एयरपोर्टवरच्या महिला सगळ्या उंच्यापु-या, गो-या, भरपूर मेकअप केलेल्या, मॅचिंग नेलपेंट, शुज आणि पर्सेस पण टाळल्या, तपकिरी डगला असलेल्याच होत्या.
तर या दोन तीन तासांत आम्हाला जे एका एजंटने टॅक्सी व हॉटेल साठी पकडलं की विचारायची सोय नाही. एक तर आमच्या मागे आमची कामं, त्यात भाषेचा प्रश्न त्यात परत लुटले जायची भिती. शेवटी कंटाळून आम्ही त्याची टॅक्सी घेतली. (या सदगृहस्थाचेही फिचर्स खूप वेगळे होते.)

एक गप्पीष्ट पण उमदा टॅक्सीवाला होता. इथलं पहिलं दर्शन जरा भारतासारखंच आहे. वाहतूकही आपल्यासारखी, टॅक्सीजही आपल्यासारख्याच यथातथाच. पण रस्ताभर टॅक्सीवाला दिलखुलासपणे गप्पा मारत होता. दुतर्फाच्या शासकीय, सार्वजनिक इमारतींविषयी माहिती सांगत होता. उजव्या हाताच्या मशिदीत मी दर शुक्रवारी जातो तेही सांगितलं. इजिप्तमधल्या अलिखित नियमानुसार त्यांची सुप्रसिध्द गायीका उम्म कुलथुमची गाणी याही टैक्सीत वाजत होती. 
ताहरिर चौकातलं आमचं हॉस्टेल आलं. परिसर उच्चभ्रू असला तरी ही इमारत अगदीच गई गुजरी होती. आमचं रहायचं ठिकाण बघून तो खर्जाच्या आवाजात बोलणारा, दिलखुलास हसणारा टॅक्सीवाला पण चकीत झाला. 
इथे कुठे रहाता ? बघा कसली बिल्डिंग आहे ? No good. 
झालं. आम्ही अजून गडबडलो. पण तसंही तिसऱ्याच दिवशी आस्वानला निघायचं होतं. आणि मुलगी बरोबर होती. ही तरुण मुलं हॉस्टेलवर रहाणं या कन्सेप्टला अगदी सोल्ड आऊट झालेली असतात. त्यामुळे टॅक्सीवाल्याच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करत उतरलोच.
जुनी इमारत. अंधारा एॅप्रोच, खडखड लिफ्ट. रंगबिरंगी भिंती. आमच्या औरंगाबादच्या जुन्या स्टेट, सादिया थियेटर्सची आठवण यावी अशी सगळी अवस्था. 
पण हॉस्टेलमधे गेलो तर दोन सुकुमार, टाईट जीन्स-टॉप घातलेल्या पण हिजाबधारी मुलींनी आमचं गोड हसून स्वागत केलं. थोड्याच वेळात कळलं गोड हसण्यामागे इंग्रजी भाषा समजायची असमर्थता आहे म्हणून. 
चेक इन केलं. रुम ताब्यात घेतली. 
इथे बेसिक सर्व सुविधा होत्या. ऐतिहासिक ताहरिर चौकातलं, भर हॅपनिंग एरियातलं वास्तव्य, हाकेच्या अंतरावरील कैरो म्युझियम आणि ट्रांसलेटरच्या मदतीने मदतीला सदैव तत्पर असलेल्या या दोन गोड बहिणी बघूनच आम्ही हुश्य केलं. सामान टाकलं. 
त्या मुलींनी लगेचच गडद रंगाच 
(रुह अफजासारखं) एक थंड पेय आम्हाला देऊन आमचं स्वागत केलं. भाषेचा प्रश्न होताच. पण या मुलींच्या मोठ्या भावाशी फोनवर बोलून अजूनच निश्चिंत झालो. भाऊ हे छोटेखानी हॉस्टेल चालवतो. दिवसा या बहिणी मॅनेज करतात.
हं...तर ते थंड पेय होतं करकडे. जास्वंदांच्या फुलांच्या अर्कापासून बनवलेलं साखर घातलेलं करकडे. उन्हाळ्यात थंड प्यायचं, हिवाळ्यात गरम प्यायचं. पहिलं करकडे गारीगार प्यायल्यापासून आम्ही जे त्या करकडेच्या प्रेमात पडलो आहोत की विचारायची सोय नाही. नंतरच्या प्रवासात देखील कुठेही कुणी ड्रिंक पाहिजे असं विचारलं की आम्ही एकसुरात करकडे मागवायचो.

We were and are just in love with karkade.❤️

No comments:

Post a Comment