Saturday, 4 April 2020

सांबार मसाला आणि महाभारत....

माझ्या घरातलं रोजच्या वापरातलं जे सगळ्यात मोठं भांडं-टोपलं आहे ते इथे हिरण्यला सगळ्यात छोटं भांडं आहे. तेही शोधून काढलंय आणि परत परत धुवून वापरतोय.

तर आज इडली सांबारचा बेत आहे. 
आमची लेकही अशी की जगभरचे सांबार बिनबोभाट खाईल पण आई दिसली की आई...तूच सांबांर कर बरं आणि खूप कर अशी ताकीद कम् फर्माईशच असते. त्यामुळे भल्या थोरल्या कढईत साहित्य परतायला घेतलं. थोडं थोडं वाढीव करत, कढईला साजेसं साहित्य घेतलं तरी पावकिलो पेक्षा जास्त मसाला परतला गेला. असुदे. सध्या दोन चारच स्टाफ इथे वास्तव्याला आहे. तेही चाखतात मॅडमच्या हातचे घरगुती वळणाचे पदार्थ म्हणून हल्ली जरा जास्तच भाज्या, चटण्या करणं चालू आहे, आमच्यादृष्टीने भीमकायी असलेल्या या स्वैपाकघरात.

हं तर भीमावरुन आठवलं, घरुन इथे येताना कधीची वाचायची शिल्लक राहिलेली दोन तीन पुस्तकं बॅगेत टाकली होती. 
माझ्या एक अभ्यासू आणि सिध्दहस्त लेखिका मैत्रिणीचं अजिंठ्यावरच पुस्तक आणि राजहंसने त्यांच्या हिरक महोत्सवानिमित्त काढलेले महाभारताचे दोन खंड. मुळ लेखिका कमला सुब्रह्मण्यम आणि अनुवादक मंगेश पाडगावकर आहेत. हे महाभारताचे दोन खंड कधी आणि का घेतले आठवत नाही पण राजहंस म्हटलं की डोळे मिटून इथे हिरण्यला ती पुस्तकं वाचायला आणली.
अजिंठा जरा निवांतपणे वाचायची इच्छा आहे आणि वाचल्यानंतर तडक अजिंठा गाठायची इच्छा आहे त्यामुळे त्याला बाजूला करुन ब-यापैकी माहित असलेलं हलकं फुलकं कथारुप महाभारत आधी हातात घेतलं.

महाभारतामधे इतक्या विलक्षण व्यक्तीरेखा आणि त्यांच्या रोचक कहाण्या आहेत की कालांतराने काही नावं आणि व्यक्तीरेखा आपल्याही डोक्यातून पूसट होत जातात. तर महाभारतीय घटनांची आणि व्यक्तीरेखांची उजळणी म्हणून हे सुटसुटीत कथारुप महाभारत वाचायला घेतलं. 
नेटाने वाचतीये रोज दहा-वीस पानं पण काही विशेष नाहीयेत ही पुस्तकं. तरी आता मयसभेत पोहंचले आहे, त्यामुळे या नाट्यमय वळणावर इंटरेस्टिंग वाटेल बहुदा. पण इथवर येईपर्यंत जरा कंटाळवाणंच वाचन आहे हे. सुरवातीला मधे मधे तर राजहंसने हा कथारुप महाभारत पुस्तक काढायचा खटाटोप का केला असाही प्रश्न पडला. 
सुरवातच मुळी शंतनू, त्याचं ते गंगेच्या रुपावर बघताक्षणी भाळणं, मग भिष्म, सत्यवती, भिष्माची ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा, मग भावासाठी तीन रुपसुंद-या राजकन्या पळवून आणणं, त्यातली एक सुडाने पेटणं व बाकी दोघी निपुत्रिक असतानाच विधवा होणं, मग सत्यवतीची भिष्माला वंशवेल चालू ठेवण्यासाठी गळ घालणं, त्यानी ते निग्रहाने टाळणं, मग व्यासांच्या कर्तव्यबुध्दीच्या सहवासातून या दोन राण्यांना दोन पुत्र होणं, तिही सुदृढ नसणं. पुढे मग या पुत्रांची लग्न होणं, त्यांच्यातही काही अडचणी आल्यामुळे इतर देवांचा धावा करुन पाच पांडव जन्माला घालणं, मग पंडूचा माद्रीबरोबर रत होताना शापामुळे मृत्यु होणं, मग द्रौपदी स्वयंवरानंतर द्रोपदीला पाच पांडवांची पत्नी म्हणून रहावं लागणं, मग भावांनी दाखवलेलं सामंजस्य, मधल्या काळात हिडिंबा, चित्रांगदा आणि सुभद्रा याही राजकन्येंची पांडवांशी येनकेन प्रकरणे विवाह होणं वगैरे, वगैरे. 
थोडक्यात राजस पुरुषाने नजर पडलेल्या एका अनामिक पण सुंदर देहाच्या स्त्रीवर भाळणे, तिच्यासाठी झुरणे, मग यथायोग्य विवाह करवून आणणे, वैवाहिक संबंध आणि तदनंतरची अपत्यप्राप्ती या सगळ्या म्हटलं तर सरळधोपट पण मानलं तर विलक्षण कॉम्प्लेक्स गोष्टींवरच पहिली शे दोनशे पानं खर्ची झाली आहेत. आणि मुख्य म्हणजे हे खंड कथारुप असल्यामुळे वरील आणि इतरही राज्याभिषेक, लढाया, बदला या सारख्या जटील गोष्टी इतक्या बाळबोधपणे मांडल्या आहेत की वाचणारा अक्षरशः उबगतो. सरळधोपट आयुष्य देखील किती क्लीष्ट असतं हे आपण अनुभवतो. हे तर पिळे पडलेलं महाभारत. यातल्या प्रत्येकच व्यक्तीरेखेच्या आयुष्यात किती उलथापालथ आहे. स्त्रियांच्या तर अजूनच. गंगा, सत्यवती, अंबा, अंबालिका-अंबिका, कुंती-माद्री, द्रोपदी...

अरे काय हे ? 
राजा असला म्हणून काय झालं ? 
दिसली बाह्यरुपाने चित्तहरण करणारी स्त्री की कर लग्न. 
आणि त्या जंगलातल्या हिडिंबा वा चित्रांगदा पण या राजपुत्रांच्या नागरी राजस रुपावर भाळून किती पुढाकार घेणाऱ्या दर्शवल्या आहेत ? 
मानवी जगण्यातली एक अनिवार्य हतबलता, विधीलिखीत, प्राक्तन, त्यानुसार मानवाचं घसरणं, मोहित होणं, अहंकारी होणं, सुडाने, असुयेने पेटणं अशा काटेरी कंगो-यांचं मनोज्ञ दर्शन कुठेच होत नाही. सगळं आपलं गुळूमुळू, साखरेत घोळलेलं. मॅनेज्ड इव्हेंटस् सारखं. 

दोनशे पानातच मला तर महाभारतातील स्त्रियांची अवहेलना वाचून कसंतरीच झालं. 
अरे या जित्या जागत्या मानवी इच्छा-विकारांनी परिपूर्ण असलेल्या विलक्षण राजकन्या-राण्या आहेत का बेनाम दावणीच्या गाई ?

कदाचित अधिकृत महाभारतात या अशा अगम्य कृतींचे जास्त सखोल व अर्थपूर्ण विवेचन असेल पण या कथारुप महाभारतात हे सगळंच फारच उठवळ वाटतंय बुवा.

देखते है आगे क्या होता है ? और बहुत पन्ने बाकी है.

तो आज के ताजा चाय के साथ इतनाही.

No comments:

Post a Comment