Friday, 3 April 2020

G Coronadiaries@hiranyaresorts इक हसीन शामको...

काल संध्याकाळी नवीन कुर्ता घालून तयार होऊन फेरफटका मारुन हिरण्यच्या लॉन्सवर जाऊन बसायला म्हणून निघाले तर मुलं हिरण्यच्या तलावाला प्रदक्षिणा घालायला निघाले होते. त्यांच्यात चले पाव मीही सामिल झाले.

दोन चिंचोळ्या होत जाणा-या डोंगररांगांमध्ये भिंत बांधून पावसाचं पाणी अडवून हा तलाव केलाय. हा तलाव आठशे वर्षांपूर्वीचा आहे. एका बाजूने धरणासारखी बांधीव भिंत, तर तिन्ही बाजूंनी डोंगर. साहजिकच बाकी तिन्हीबाजू नैसर्गिकरीत्या जशा असतील तशा आहेत. त्यात परत शतकांपासून पाऊस पडून, वाहत्या पाण्यामुळे तयार झालेल्या खडकाळ घळ्या आहेत. भरपूर चढ उतार आहेत. एकूणच माणसांचा इथे राबता नसतो त्यामुळे सगळीकडे काटेरी झाडं झुडं कसेही वाढलेले आहेत. अर्थात जनावरांमुळे, (गाई-म्हशी-बक-या) आणि त्यांच्यामागून येणाऱ्या हाका-यांमुळे  अडचणीतल्या का होत नाहीत पण पायवाटा तयार आहे. 

डोंगरांनी वेढलेला तलाव, माणसांची चाहूल तशीही फारशी या भागात नसते. या कोरोना भयाच्या काळात तर अजूनच चिडीचूप आहे. 
उतरतं ऊन, पाखरांची कलकल, माकडांची लगबग कधीच मागे पडली. अचानक एक भला थोरला साप सामोरा आला. बहुदा नागच असावा. आम्ही चौघं-पाच जणं आणि आमच्या दोन तीन श्वानांच्या चाहुलीने त्याने सुरक्षित ठिकाण सरसरुन गाठले. तुम्ही घाबरट नसलात तर असे नैसर्गिक वातावरणातले सुदृढ व रसरसशीतपणे चमकणारे साप पाहिले की एक जबरी जादू तुमच्यावर होते. थोडी भिती वाटते पण डोळेही दिपतात. 
सापांच ते सरसरुन नाहीसं होतं बघणं एक जबरदस्त नजरबंदीचाच खेळ असतो.

तसेच पुढे गेलो. चढ उतार, माती-खडक-गवत, काटे-कुटे पार करत, एकाबाजूला तलावाचं सायंप्रकाशातलं रुप न्याहाळत, दूरवरचा दौलताबादचा किल्ला बघत हा फेरफटका कधी संपला कळलही नाही. मधेच एका ठिकाणी तिनं दोन-तीन फुटी साप मेलेले दिसले. बहुदा भावंडच असावीत आणि कुणा शिकारी पक्ष्याने-प्राण्याने डाव साधला असावा.

आमची श्वानं माकडांना बरेच हुसकवतात. आता माकडही यांना उचकवण्यात बहाद्दर झाली आहेत. 
उगा आपल्या एकमेकांच्या खोड्या काढत रहातात आणि हिरण्य व्हॅलीमधे यांची जुगलबंदी घुमत रहाते. डोंगरातल्या आडबाजूच्या झाडावर रात्रीची जागा पटकावून बसलेल्या एका माकडाच्या नादी बिब्बा लागला आणि डोंगरात एकटाच वाट हरवून बसला.

अंधार झालेला. 
एकटा बिब्बा डोंगरात आणि त्याच्या जोडीला इरेला पडलेलं एक खतरा माकड. दोघंही डोंगरात आमने-सामने खाऊ का गिळू करत. दोघंही मागे हटेनात. आम्ही खाली, ते डोंगरात, त्यात अंधार झालेला. इतक्या अंधारात, खडकाळ, डोंगरात शोधायला तरी कसे जाणार ?
शेवटी सगळ्यांनी आपापले मोबाईल टॉर्च ऑन केले, बिब्बाला आश्वस्त करत दिशादर्शक आरोळ्या दिल्या. 
या सामुहिक आवाजाने ते माकडही नरमलं असावं. 
एकट्या बिब्बासमोर ते तरी का मागे का हटेल ? 
शेवटी त्याच्याही जीवाची बाजी लागलीच होती ना ?
बिब्बा आपला म्हणून आपल्याला त्याचं कौतुक. Survival of the fittest, and fight for survival या कालातीत तत्वावरचं निसर्ग अनादी काळापासून नांदतोय. आपण माणसांनी स्वार्थापोटी काहींना संरक्षण दिलंय तर काहींना नष्ट करायचा विडा उचललाय.
Otherwise, निसर्गातली साखळी नैसर्गिकरीत्या पाळली जाते. 
Nature has evolved accordingly.

तर दहा मिनिटांच्या तणावा नंतर बिब्बा अंधा-या डोंगरातून धापा टाकत आला आणि आमचा जीव भांड्यात पडला. होना, शेवटी आपला तो बाब्या हेच खरं.

एक सुरेख आणि रमणीय फेरफटका. रानोमाळ चालायच्या भानगडीत फार फोटो काढायला जमलं नाही. तरीसुद्धा वेगवेगळ्या कोपऱ्यातून दिसणारे डोंगर, तलाव, झाडं, दौलताबादचा किल्ला यांचे सुरेख फोटो काढलेत. 

I just love this place !
Proud to own a fraction of this kaleidoscopic and amazing nature.

#LoveYouHiranya♥️

No comments:

Post a Comment