Friday, 3 April 2020

F Coronadiaries@hiranyaresorts भूक.....

हिरण्यच्या लॉन्सवर हुंजा की आणि नंतर अर्ध्यातासानंतर साधा चहा घेत एकटीच बसले आहे. आमच्या हिरण्यच्या अप्रुपाचा एक कावळा डोक्यावरनं चोचीत काहीतरी पांढरं पकडून उडताना दिसला.
कालच आम्ही कुटुंबीय बोलत बसलो होतो. माणसांचा राबताच नसल्यामुळे हिरण्यवर माकडं, पाखरं सुखनैव नांदताहेत. माकडांनी तर त्रस्त केलंय झाडांची पानं, फुलोरा फस्त करुन, धांगोडा करुन. 
तर आम्ही बोलत होतो. आमचा भटारखाना बंद असल्यामुळे चोरीछुपे पोळ्या वा इतर टाकलेल्या पदार्थांवर ताव मारुन भुक भागवणारे माकडं, कुत्रे वा पाखरं हल्ली ब-यापैकी भुके रहाताहेत म्हणून. नाही म्हटलं तरी रतीबाने आयतं जेवण मिळत होतं. तेच हल्ली बंद झालंय. कुत्र्यांची काळजी घेतली जातीये. पण रानातली पाखरं व माकडांची जरा पंचाईतच झाली आहे. त्यामुळे माकडांनी झाडांवर हल्ला चढवला आहे. तर मला त्या कावळ्याच्या तोंडातला शुभ्र तुकडा बघून वाटलं अरेच्या याने थर्माकोलचा तुकडा उचलला की काय. भुक असह्य झाल्यावर अडगळीतला केक बिक लागलेला तुकडा याने उचललेला दिसतोय.
दहा मिनिटात तो कावळा तसाच पांढरा तुकडा तोंडांत घेवून एका झाडावर मजबूत पकड करुन, इकडे तिकडे सावधपणे बघत बसला. तेवढ्यात एक लहानचणीचा बुलबुल पक्षी त्या कावळ्यापाठी अस्वस्थपणे पण  जवळपासच सुरक्षित अंतरावर येऊन बसला. फुट दिड फुटाचा जेट ब्लॅक कावळा आणि मुठभरीचा बुलबुल. 
अरेच्या या कावळ्याची जरब बसवणारी हालचाल आणि बुलबुलची अगतिक मौनी हालचाल, नक्कीच त्या काळतोंड्याने बुलबुलचं अंड पळवलंय. 

अंड पडणार-फुटणार नाही अशी कावळ्याच्या चोचीची हलकी पकड, फांदीवरची दमदार पकड आणि त्या गरीब बुलबुल पाखराला दुरुन देखील दमात घेणारी जबरी देहबोली.
दोन्ही पाखरं मौनात. 
एक कावेबाज दडपशहा तर दुसरा अगतिक पिटुकला.

कायम चुलबुलेपणाने चटरपटर करणारे देखणे बुलबुल पक्षी. पण या शिकारी कावळ्यापुढे आज या पाखराची अक्षरशः वाचा गेली होती. मुकपणे तो कावळ्यावर नजर ठेवून होता. या फांदीवरुन त्या फांदीवर हतबलपणे बसत होता. त्याची अस्वस्थता मलाही बैचेन करत होती. पण भुकेलेल्या कावळ्याने डाव साधला होता. एकाचा वंश खोडून तो त्याची भूक भागवत होता. ज्याचं वंशवृद्धी करणारं अंड नष्ट होत होतं तो हतबल होता, अगतिकपणे मूक झाला होता. असहाय्यपणे आपलं पोटचं अंड मटकवणा-या कावळ्याकडे बघण्या खेरीज तो वाचा गेलेला बुलबुल काहीही करु शकत नव्हता. 
हे मुकनाट्य मी स्तंभित होऊन पहात होते. 
झळकिनी डोळ्यासमोर आक्रोशमधला अगतिक आणि असहाय्य ओम पुरी आला. परिस्थितीपुढे शरण आलेला ओमपूरी गळ्यातल्या आवंढ्यांने आणि भकास डोळ्यांनी पण मूकपणे खूप काही बोलून जातो. 
विमनस्क झाले. राजस-गोंडस पालक बुलबुलसाठी काळीज तुटलं.
शेजारी आमचा कष्टाळू धनाभाऊ उभा होता. 
धनाभाऊ..या कावळ्यांमुळे आपली इतर पाखरं पण कमी होणार का काय आता ?
होना, मांजरी आणि कावळे कुटं पन जाऊन अंडी-पिल्ले खाऊन टाकतेत. 
कावळे हाकलले पाहिजेत मग.
आशे कशे हाकलता येतील ? मोकड्या वावरात सगडेच -हानार. आपन कुटं कुटं बगनार ? अशे तर चालूच -हाते सगडीकडे.

वावरात लवलवून काम करणारा एक साधा खान्देशी माणूस माझी समजूत घालत होता. किती सहजपणे तो भूक या विषयाकडे, या नुकत्याच पाहिलेल्या या जीवन संघर्षाकडे बघतोय. 

सध्या या कोरोना विषाणूंमुळे सगळं जग वेठीला धरलं गेलयं. ज्याला त्याला आपल्या, आपल्या जिवलगांच्या आरोग्याची, जगण्याची काळजी आहे आणि रोजच्या त्यांच्या, आपल्या पोटापाण्याचीही भ्रांत आहे. 

We all are zeroing on survival and hunger.
And that is connecting us very deeply to the mother nature.





No comments:

Post a Comment