Tuesday, 31 March 2020

E Coronadiaries@hiranyaresorts अतिक्रमण... मानवाचे निसर्गातले.

कुठल्याही शांत, निरामय आणि नैसर्गिक ठिकाणी निवांत बसलो की आपला आतला प्रवास सुरु होतो. आपल्या रोजच्या धावपळीत आपण फक्त आपण आणि आपल्या संबधितील इतर माणसांचा वा गोष्टींचाच विचार करत रहातो. पण निसर्गातला एकान्तवास चराचरातलं खूप काही टिपायला, इतरांना जाणून घ्यायला उद्युक्त करतो आणि आपण एखाद्या आपल्याच वा एकुणातच मानवी कृतींचा वेगळ्या दृष्टीने विचार करायला लागतो.

आता साधी हिरण्यची गोष्ट. 
हा पहिला फोटो रुममधून अक्षरशः झोपल्या झोपल्या काढला आहे. रोज डोळे उघडले की पाचशे मिटरवरचे डोंगर, त्यामुळे उगवतीचं नाट्यमयपणे प्रकाशमान होणारं आभाळ, त्या गगनातल्या ढगांच्या तलम लाटा, डोंगर पायथ्याची झाडीझुडी, आणि मग अगदी आमच्या रुम्सच्या गॅलरीला खेटून असलेली कडुलिंब, काशिद, चिचोरा अशी झाडं दिसतात. खोलीतला अंधार आणि बाहेरच्या निळसर जांभूळक्या प्रकाशातला हा नजारा. आजपर्यंत याच काचेतून दिसणा-या या पसाभर नजा-याचे दोनेक डझन तरी फोटो मी काढलेत. 
याच झाडांवर पहाटेपासून माकडं बागडतात, पाखरं आसरा घेतात, लगबग करत शिळांचा कोलाहल माजवतात. एकूणातच अशा लोभसं वातावरणात डोळे उघडले की आपणच आपले भाग्यवान असे वाटायला लागते. 

या रुम्सच्या खिडक्यांना बाहेरुन रिफ्लेक्ट होतील अशा बंदिस्त काचा आहेत. आतून बाहेरचं लख्ख दिसतं आणि बाहेरचं दृश्य बाहेरुन पाहिलं तर मिरर इफेक्टनी रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे गॅलरीतल्या प्रत्येक खिडकीत परत एक समोरचाच सुंदर निसर्गरम्य नजारा दिसतो. आता ही रिफ्लेक्टिंग ग्लासची सोय आपल्यासाठी खूप सुखद आहे. 
पण याच रिफ्लेक्शन मुळे काही पारवे, बुलबुल हमखास कपाळमोक्ष होऊन मरतात. 
हा अनुभव कालच आला. 
मी गॅलरीतच बसले होते. अचानक काहीतरी जोरात आपटल्यासारखा फटकिनी आवाज आला आणि एक पारवा पायथ्याशी तडफडत पडलेला दिसला. तो पारवा कुठून आला आणि असा कसा मरणप्राय होत पडला हे आम्हाला काहीच कळेना. मग आमच्या माणसांनी सांगितले की या जवळच्या झाडांवरच्या पाखरांना रिफ्लेक्टिंग ग्लासमधलं दृश्य आणि खरं झाड यातला फरक कळत नाही. काचेवर दिसणा-या झाडावरच ते झेप घेतात आणि कपाळमोक्ष होऊन तक्षणी मरतात. 
हे ऐकून जीव फार चुटपुटला.

आपल्या नजरेला सुखावणारी एक मानवनिर्मित काच, आणि त्यामुळे फसणारी आणि धारार्तीर्थी पडणारी ही अबोध पाखरं...काही ताळमेळ जमेना.

नाण्याची ही दुसरी बाजु बरीच दुखावून गेली. 
आत्मपरिक्षणाला उद्युक्त करुन गेली.

आपण निसर्गात येऊन अतिक्रमण करतो म्हणजे काय, काय करतो ? आणि त्याचे चराचरात सुक्ष्मपणे काय परिणाम होतात हे विचार केल्यास फारच उद्बोधक ठरेल.

No comments:

Post a Comment