घर सोडून आठवडा होतोय.
कोरोनाच्या धास्तीने घरात बसायच्या ऐवजी आमच्याच हिरण्य रिसॉर्टमध्ये रहात आहोत. सगळं कुटुंब म्हणजे आम्ही दोघं, मुलगा-सून, मुलगी आणि ब्राझिलियन कन्या असे मिळून रहात आहोत. Once in a lifetime opportunity. तीही निसर्गरम्य परिसरात.
प्राप्त परिस्थितीत दिवस आनंदात जात आहेत.
पहिले दोन दिवस नवलाईचे गेले, पुढचे दोन दिवस अजून उत्साहाचे गेले, दोन दिवस एकमेकांचा, एकमेकांशी ताळमेळ व दिनक्रम जमवण्यात गेले, पुढचे दोन दिवस आहे त्या परिस्थितीत परत आपापली खोई हुवी स्पेस शोधण्यात गेले.
आज मात्र घराची आठवण येतीये. घरकामाला येणाऱ्या सख्यांची तर प्रकर्षाने आठवण येतीये. रोजचं त्यांच शिस्तीत येणं, नेमून दिलेली कामं करणं, कामं करता करता सुखदुःखाच्या गप्पा मारणं. कितीही नाही म्हटलं तरी आपल्या गृहिणीपदाच्या राज्यात त्यांच महत्त्व अनन्यसाधारण असतं. थोडावेळ का होईना पण त्या देखील आपल्या कुटुंबाचा भाग झालेल्या असतात. घरातली सजावट, स्वैपाकघरातील भांडी-कुंडी जरी आपण चोखंदळपणे केलेली-आणलेली असली तरी घरातले कोपरे, अडचणीच्या जागा, पाय-या-फरश्या, आपली भांडी, आपले ओटे आपल्यापेक्षा या महिलांच्या जास्त ओळखीचे असतात नाही ?
आज भांडी घासणा-या बाईंना क्षेम खुशालीचा फोन केला.
असा कामाला बगल देऊन केलेला पहिलाच फोन असावा बहुतेक. कदाचित नाव सेव्ह केलेलं असेल तर सवयीने त्यांचाही जीव धसकला असेल. आल्या वाटतं ताई घरी, म्हणूनच फोन लावला काय की असं मनात म्हणतच त्यांनी फोन उचलला असेल.
काही नाही हो, सहज फोन केला. शहरात आहात का गावी गेलात ? सगळं ठिकै ना ? सांभाळून रहा.
हो ताई, सगळं ठिकै. सगळं बंदच हाय. कुठ्ठं म्हनुन बाहेर जायची सोय नाई. गावीच जमलोत सगळे. तुमी पन सांबाळून -हा ताई.
रोजच्या तासा अर्ध्यातासाच्या मदतनीस कम मैत्रिणी.
यांचं कष्टमय अथकपणे शिस्तीत जगणं, जीवन संघर्ष, छोट्या गोष्टींतून आनंद शोधायची वृत्ती, सामाजिक दडपणाखाली रहायची गरज, यांची भाषा, यांचं हसू, यांच्या कामाची पध्दत, आपल्याला मिळणारी यांची उस्फुर्त दाद हे सगळं फार नरचरींग आहे आपल्यातलं माणूसपण जपण्यासाठी.
ताई...तुमाला लगी लईच नादै भांडीकुंडी जमवायचा. लगी कुटल्या बी गावाला गेल्या की कायतरी आनतातच.
तुमच्यामुळं लगी येक से यक तांबपितळीची भांडी बगायला मिळतेत. कुन्नाकडं इतका पसारा नसलं. तुमाला हौशच भारीये.
मावशी माझ्या घरातली ही भांडी तुम्ही प्रेमाने, कष्टाने आणि स्त्री सुलभ कौतुकाने झळाळून काढता म्हणून त्यांची शोभा वाढत आहे.
ये चमकिले बर्तनोंकी अगर मै कोख हुं, तो तुम गोद हो.
अजून काय सांगू ?
No comments:
Post a Comment