Friday, 27 March 2020

C Coronadiaries@hiranyaresorts "🌍🌎🌏"

कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे हिरण्यचा आसरा घेतलाय. आता बरेच दिवस इथेच रहावं लागणारे म्हणून जरा टाइमटेबल ठरवणं चाललंय. 
सकाळच्या जेवणासाठी इथल्या किचनचा ताबा घेतलाय. घरगुती चवी ढवीच्या पालेभाज्या, शेंगभाज्या, फळभाज्या, वरणं करणं चालू आहे. 
थोडक्यात परिस्थितीचं भान येऊन इथला दिनक्रम आखलाय.

तर काल संध्याकाळी परिसरातील कचरा आणि मुख्यत्वे प्लॅस्टिक गोळा करायची वा श्रमदानाची मोहिम हाती घेतली होती. उतरत्या ऊन्हात घेतलं एक पोतं आणि निघाले कचरा गोळा करायला. अर्थात फार ऐसपैस एरिया नाही निवडला तरी भरपूरच उठबस झाली.

हिरण्यच्या निसर्गरम्य पण डोंगराळ परिसरातला कचरा शोधणं, उकरुन पोत्यात भरणं तसं फार सहज नाहीये. कचरा बिनदिक्कतपणे टाकणारेही लयी हुशार असतात. बरोबर अडचणीच्या ठिकाणी, झाडांच्या गचपणात सगळा कचरा( पेपर कप्स, पाण्याच्या बाटल्या, सॅनिटरी पॅडस, क्वार्टरच्या बाटल्या, चिप्सची-गुटख्याची रॅपर्स, कोल्ड ड्रिंक्सचे टिन्स..वगैरे) टाकतात. मग तो कचरा उकरुन आपल्या पदरात, सॉर्री पोत्यात टाकायला खुरपं हातात हवंच. तर पोतं, खुरपं आणि एकाची सोबत घेऊन निघाले मोहिमेवर.

बा..बा...बा....काय तो चिंधी कचरा ! 
बापरे अक्षरशः कबंर दुखली तो कचरा लवलवून उचलताना.
वर नमूद केलेल्या गोष्टीं शिवाय इतरही भरपूर कचरा जमिनीत दबलेला, आड बाजूला लपलेला होता.
मंडपवाल्यांचे फडके, तुटक्या झिरमाळ्या-चमक्या, प्लास्टिकची फुलं, सुतळ्या, थर्माकोलचे तुकडे-गोळ्या, फुसकलेल्या फुग्यांचे अवषेश, केक कापायचे चाकू, फुटके बॉल्स, तुटक्या चपला, चुरगळलेले टिश्यु पेपर्स, शॅम्पुचे पाऊचेस, टायर्सचे-पाईपांचे तुकडे, सुतळ्या, वायर्स...एक ना दोन. एकेक वस्तू उचलत गेले तशी विचारात हरवत गेले.

खरंच गरज असते का असे रुपया दोन रुपयांचे शॅम्पू पाउचेस वापरायची ? 
आणि ते टिश्यु पेपर्स, पेपर कप्स आणि ते डेकोरेशनचं उदंड असं बेगडी सामान, त्याचीही खरंच गरज असते का ? म्हणजे आधी गरज आहे का हे शोधणं महत्त्वाचं आहे मग त्या योगे झालेल्या कच-याचं नियोजन कसं करावं हेही महत्त्वाचे ठरते. 

आमचा हिरण्यचा एरिया बराच मोठा आहे आणि खूप फिरुन बघण्यासारखा आहे. डोंगरदरीतला, तलावाकाठचा निसर्गरम्य परिसर आहे. 
आलेला प्रत्येकजण इथे भरपूर भटकतो, रेंगाळतो.
मग काय बरेचजणं खाता खाता फिरतात. फिरता फिरता खातात-पितात. 
लग्न समारंभ, बारशी, वाढदिवस, एॅनिव्हर्सरीज, प्रिवेडिंग शुटस्, कॉर्पोरेट इव्हेंटस् असे भरपूर कार्यक्रम इथे येऊन सेलिब्रेट करतात. 
झाडीझुडीत लपलेलं रमणीय हिरण्य, अनमोल अशा हौसेला आणि डेकोरेशनला भरपूर वाव. 
आता हल्लीच्या काळातला वाव म्हणजे कसा ? 
तर बंदिस्त हॉलमध्ये वारेमाप फुलं-पानं वापरुन निसर्ग दाखवायचा आणि निसर्गरम्य परिसरात आलं की थर्माकोल, चमचमत्या बेगडी झिरमाळ्या, कट आऊटस्, रांगोळ्या, रबरी फुग्यांनी सगळा निसर्ग चिथाडून टाकायचा. वर्षभर चालणारे समारंभ आणि त्यांचे हे असे तडाखेबंद सादरीकरण. 
या सगळ्या सद्य संस्कृतीचा ताण आपल्या धरेवर, आमच्या वा कुणाच्याही अशा जागेवर वा मॅनेजमेंट वर किती पडतो याची जाणीव हा कचरा जमा करताना फार म्हणजे फार प्रखरतेने झाली. 
म्हणजे आपल्याला बुध्दी आहे म्हणून असे बेताल वागायचे का ? शेकड्यांनी शॅम्पू-गुटख्याचे सॅशे, चहाचे युज एॅन्ड थ्रोचे कप्स, टिश्युज, फोडलेल्या काचेच्या बाटल्या, क्रश्ड टिन्स...
Really this exercise made me very thoughtful.

कचरा गोळा करताना माकडं आसपास येथेच्छ बागडताहेत, एकमेकांच्या खोड्या काढताहेत, प्रणयराधन करताहेत. They don't need any celebration to express their feelings. Thank god, only humans do this mess. Otherwise what would have been our planets condition ?
We are paying a very heavy price for being intelligent.
PERIOD !!

असं कुठलंही आपल्या रोजच्या परिघाबाहेरचं काम केलं की एक दृष्टांत होतो. आज माझ्या कच-याविषयीच्या विचारांना चालना मिळाली. जाऊ तिथे खाऊ आणि बसू तिथे ** अशी एक म्हण आहे. खरचं we are living upto that saying. युज एॅन्ड थ्रोचा तर अतिच अतिरेक झालाय. 
फार लिहित नाही. कचरा गोळा करतांना पेक्षा मन आत्ता जास्त उद्विग्न होतंय.

मी यापुढे कधीही शॅम्पूचे सॅशे वापरणार नाही.👍

आणि वाचकांनो, कृपया या पुढे पाण्याची प्लास्टिकची बाटली(फेकायची झाल्यास) फेकताना झाकण लावूनच फेकत जा. बाटल्या पटकिनी नजरेत भरतात. झाकणं नजरेआड होत हळूहळू मातीत दबत जातात हो.

आपल्या बरोबर आपल्या मातीमायलाही श्वास घेऊ द्या. She deserves long life, more than us ! 🙏

No comments:

Post a Comment