Saturday, 21 March 2020

कुठूनही कुठे....

कुठूनही कुठे....

कोरोनाच्या धसक्याने जो तो घरीच ठिय्या देऊन बसलेत. खरंतर भरपूर वेळ हातात आहे. पण म्हणतात ना फुकटात मिळालं की किंमत रहात नाही तसंच या औरस चौरस ऊन्हाळी बंदिस्त दिवसांच झालंय. 
जो तो घरात बसून वैतागलाय. माणसं बैचेन असली की खूप खादाडतात. त्यामुळे सतत काही बाही पदार्थ करणं चाललंय. उन्हाळा तापतोय त्यामुळे सारखं काही तरी गार, थंड चाखावसं वाटतंय. फळं तर आहेतच पण आमच्याकडे सध्या रतीबाने घरगुती आईस्क्रीम करणं चालू आहे. कन्येला, लेटिसियालाही हे घरगुती कुल्फी कम् आईस्क्रीम भलतंच आवडलंय. मग काय, गरज नसताना देखील रोज लिटरभर दूध घेऊन आटवून आईस्क्रीम करणं चाललंय. 
रोजचा लिटरभराचा रतीब. हल्ली चहा कमी केल्यामुळे इतका रतीब लागत नाही. पण दह्या-तुपाच्या आणि आता आईस्क्रीमच्या लोभाने दुध घेतलं जातंय. 
झकास साय निघतीये. सायीचं विरजण, विरजणाचं लपकेदार लोणी, लोण्याचं रवाळ खमंग साजूक तुप. 
अहाहा...😋

सध्या आमच्याकडे या अस्मादिकांनी बनवलेल्या साजुक तुपाला भलतीच मागणी आहे. चिरंजीवांनी आईने बनवलेल्या तुपाला पक्की पावती कधीच दिली आहे. कन्येला तर साधं वरण, तुप, मीठ, लिंबू, भाताचा घास जात नाही या रवाळ साजुक तुपाशिवाय. घरापासून दूर रहाणा-या मुलांना अशी आईच्या हातच्या खाद्यपदार्थांची लज्जत कळली आणि ती त्यांनी खुलेपणाने मान्य केली की आपल्या तर अंगावरून मोरपिसच फिरतं बुवा. 
मुलांनी असं हक्काने तुपासारखे पदार्थ मागितले की टिनेजरमधला जेवणावरुन त्यांनी केलेला सगळा थयथयाट खुले और बडे दिलसे माफ केल्या जातो आणि घरगुती तुप बनवायला आपण कंबर कसून उभे रहातो.

तर आज परत दुध आटवून घेतलंय. आईस्क्रीमसाठी.
उकळत्या आटीव दुधात बदाम, चारोळी आणि खोबरं वाटून घातलंय, थोडं जायफळ व वेलदोडा पण टाकलाय. साखर तर आहेच. पसरट डब्यात हे दूध गार करुन फ्रिजमधे ठेवावं. फ्रिज झालं की ब्लेंडरने परत एकदा ते गोठलेलं दूध फिरवून मिक्स करुन परत फ्रिज करायला ठेवावे. झकास आईस्क्रीम होते. थोडेफार आईसिकल्स राहतातच, पण त्यामुळेच हे आईस्क्रीम खाऊन छान गार वाटतं. करुन बघा. कधीमधी दोनेक चमचे तुपात एखाद चमचा कणिकही खमंग भाजून घ्यावी व या उकळत्या दुधाला लावावी. अगदी कुल्फीसारखी चव येते.

हं..तर खरी पोस्ट आईस्क्रीम वा कुल्फी कशी बनवायची याविषयी नसून अस्मादिकांच्या एका वेगळ्याच सुपरस्टिशनविषयी आहे.

आता बदाम वापरताना मी कधीही रॅंडमली बदाम बिया घेत नाही. मोजूनच घेणार आणि प्रत्येक वेळेस त्या संख्येंच एक जस्टिफिकेशन माझ्यापुरतं माझ्या जवळ असतं. 
१ बदाम - १ आत्मा, २ बदाम - दिवस व रात्र, ३ बदाम - त्रिशूळ, ४ बदाम - आम्ही चौघेजणं, 
५ बदाम - पंचमहाभूते, ६ बदाम - षटक, 
७ बदाम - एक आठवडा, ८ बदाम -अष्टदिशा, 
९ बदाम - नवरस, 
१० बदाम - पहिली दोन नंबरी संख्या, 
११ बदाम -  हिंदू शुभ आकडा, 
१२ बदाम - बारा महिने...
अर्थातच तेराव्या बदामाला स्थानच नाही आणि पुढच्या संख्येला फारसं तगडं जस्टिफिकेशन न देता सब बदाम एक बराबर असा हिशेब असतो. 
बदाम खाऊन अक्कल येते म्हणतात ना ! 
बघा अस्मादिकांची बुध्दी कशी तेजतर्रार झाली आहे ते.
अर्थात ही शेखी फक्त बदामांच्या नशिबी, अगदीच कधी लोणच्यांसाठी लिंब लागली तर त्यांच्याही साठी, कधी खिरीत टाकायच्या, जॅम-जेलीत टाकायच्या साखर चमच्यांसाठी, लोणच्यात टाकायच्या मीठ चमच्यासाठीही.
बाकी काजू, पिस्ते, खारका, जर्दाळू, खजूर म्हणजे सब घोडे बारा टक्के. 
अशा मनस्वी आणि खट्याळ संवेदना फक्त आणि फक्त बदामांसाठी.
देशी असो, विदेशी असो बदामांना आपलं एकच ♥️ !

तस्सच त्या मोबाईलवर दिसणा-या आकडी वेळेचं देखील. 4.44 ला मोबाईल अवचितपणे बघीतल्या जाणं म्हणजे तर खणखणीत मणीकांचन योग. 
मग त्यानंतर 3.33, 12.12 वा इतर तत्सम सुवेळा.

तर अश्शी आहे गमंत. 
आपणच आपल्या मनामधे रचलेली एक मनोधारणा आणि ती धारणा पुर्ततेकडे नेणारे आपणच बुध्दीवादी महाभाग.

No comments:

Post a Comment