Saturday, 21 March 2020

Corona...2

आपण मारे उत्साहाने मुलींची नावं शोध शोधून ठेवावीत आणि आपल्या पोटी मुलगाच व्हावा, किंवा आपल्या भाचीसाठी स्थळं शोधायला आपल्यासाठी फर्मान सोडण्यात यावं आणि आपल्या नजरेस फक्त लग्नाळू पोरींचाच गोतावळा दिसावा अशी काहीशी चुकामुकीची ही वेळ आहे. 
खरंतर आपल्याला बाहेर पडून फार काही वाळूचे ढीग उपसायचे नसतात, पण बाहेर पडू नका म्हटलंकीच अडगळीतली कामं उरकायचा उत्साह येतो. मग तेवढ्यात कुणीतरी बहिण-मैत्रिण-सोशल मिडिया धोक्याचा कंदील दाखवते आणि मग आपली मती जाऊ का नको असं तळ्यात मळ्यात करायला लागते. 
मन उद्विग्न होतं. मग त्या उस्कटलेल्या मनस्थितीतच उन्हाळा, उष्णता, डायट-फायटचा विसर पडतो व आपण भरदुपारी चहा करायला जातो.

अरेच्चा, काय ही आपली चहाची तांबे पितळीची भांडी ? अंतर्बाह्य कळकटली आहेत. 
काय या कामवाल्या बायका ? आणि आपलंही हल्ली लक्षच नाहिये हां. 

धुम्मसणा-या मनाला आयतच सावज मिळतं. 
हातांची पर्वा न करता खसाखस तांबे-पितळी पितांबरीने घासली जातात. परिस्थितीचा सगळा राग भांड्यांवर निघतो. खर..खर...खर...
बिच्चारी भांडी आणि पितांबरी. आपल्या अंगभूत धर्माला जागत पितांबरीने चमकवलेली भांडी झक्क झळाळून उठली. 
ती आपली झिलईदार भांडी बघूनच मनाला उभारी मिळाली.

#कोरोनाकेसाईडइफेक्टस्

No comments:

Post a Comment