Saturday, 21 March 2020

Corona...1 अनलिमिटेड हॅपिनेस...

अख्खं जग कोरोनाग्रस्त झाल्यानंतरचा पहिला विकेंड. जनरली सगळेच विकेंड कुटुंबियांसोबत घरी वा बाजारपेठांमध्ये फिरत, निसर्गात भटकंती करुन व्यतित केले जातात. पण या जीवघेण्या व्हायरसमुळे या विकेंडला सक्तीनेच घरी बसणं आहे तेही इतर माणसांचा जमाव टाळूनच. ओघानेच आपापल्या बायका पोरांच्या सहवासात घराची उब अनुभवणे या व्यतिरिक्त काहीही करण्यासारखं नाहीये.

आत्ता या क्षणी माझंही घर साखर झोपेत आहे. बंदिवासाची सोय म्हणून काल लेकीने बरेच बिस्किट पुडे आणून ठेवलेले टेबलावर दिसताहेत. कोरोनाग्रस्त विकेंडची निरवता चराचराला व्यापून आहे. कंटाळून बिस्कीट पुडा उघडला तर क्रिमचं बिस्किट निघालं.

आम्ही लहान असताना अशी सुबत्ता नव्हती. कधीमधी ब्रेड, टोस्ट, बिस्किट्स घरी यायचे. त्यातही क्रिम-जेलीवाले बिस्किट्स म्हणजे तर फारच कधीतरी. क्रिमची बिस्किटं फार आवडायची. दोन बिस्किटांमधलं ते मऊ व नारिंगी रंगां-वासाचे दाबलेले रवाळ क्रिम या खुसखुशीत बिस्किटांना चारचांद लावत. 
आमच्या काळी अधूनमधून एक-दोन बिस्किटे हातावर ठेवली जात. हल्ली प्रत्येकी एक पुडा तोही आवडी निवडीने मिळतो. 
तर आम्ही पाठची भावंडं या क्रिमच्या एकेक जोड बिस्कीटांची विभागणी करुन खायचो. मग एकाला कोरडं बिस्कीट मिळायचं तर दुस-याला क्रिमवालं मिळायचं. मग दुसऱ्या बिस्कीटामधे मात्र त्या दुसऱ्याचा क्रिमवाल्या बिस्किटावर हक्क असायचा. 
थोडक्यात फार कमी साधनांमध्ये अपार आनंद शोधला जायचा. खूप सामंजस्य अंगी बाणवायला लागायचं. 
तर आत्ता या पुढ्यातल्या तीन-चार पुड्यामधून ही क्रिमची बक्कळ दोन बिस्कीटं खाताना बालपणीतला तो चिमुटभर आनंद आठवला.

अनायसे घरी बसलोच आहोत तर आपल्या बालपणातल्या अशा अनेक लिमिटेड गोष्टींनी दिलेला अनलिमिटेड आनंद आपल्या मुलांबरोबर शेयर केला तर ? 
करुन बघा. 
आपल्या बालपणी दोन पार्लेजी बिस्कीटांमधे देखील किती तृप्त वाटायचं ते एकदा मुलांना सांगून तर बघा. आपले आई-वडील त्या दोन बिस्किटांना अजूनही विसरले नाहीत हे ऐकून त्यांनाही गंमत वाटेल. 

तशीच गोष्ट त्या टरबूजाची. 
टरबूजातला लालीलाल मगज काढल्यावर सालींजवळचा थोडासा गुलबट पांढ-या मगजाचा आम्ही सख्खी-मावस भावंडं ताटाभोवती गोलबसून फन्ना उडवत असू. आम्हाला अशा गोष्टी करु देताना न आई-बाप कधी ओशाळायचे न आम्हाला कधी कमीपणा वाटायचा. 
पण मधल्या काळात कुठलीही गोष्ट, पदार्थ चाटून पुसून संपवणे, पुर्णांशाने त्याचा वापर करुन कमीत कमी वेस्टेज होईल असं बघणे हे कमीपणाचं समजलं जाई. कपा-ग्लासात दोन घोट चहा-सरबत ठेवणे हे तर 
उच्चभ्रूपणाचं लक्षण होतं. 
अर्थात अनादी अनंत काळातही हार्ड ड्रिंक्ससाठी हा दोन घोट शिल्लक ठेवायचा नियम नसावा याची मला खात्री आहे.

पण हल्ली एक बरं झालंय. नवीन पिढी जागरुक झाली आहे. वैभवाच्या, संपन्नतेच्या कल्पना फार बदलल्या आहेत. 
परत आपल्या सोशल मीडियाचाही यात भरपूर हातभार लागलाय. टरबूजाच्या पांढ-या मगजाच्या डझनांनी रेसिपीज टाकून या बहिष्कृत ऐवजाला मान देण्यात सोमीचाही महत्त्वाचा वाटा आहे.
उरलेल्या भात-पोळीपासून ते जुने-या कपड्या-बुटांना देखील खुलेआम प्रतिष्ठा मिळतीये. हे फार छान लक्षण आहे.

तस्सच ते आंब्याच्या दिवसातलं खादाडणं. आंब्याचा रस काढला की त्याच्या साली-कोयी कोळून घेणे, नसता मुलांना चोखायला देणे हे घरोघर होत असे. आमच्या दातांनी, दात-या उमटलेल्या या पार निपटलेल्या साली कायम गोग्रास म्हणून दिल्या जायच्या. 
आणि कोय चोखून कोण जास्त पांढरी करतो याची पण भावंडांमध्ये अहमिका लागायची. 
अर्थात हे सगळं आपल्याप्रांतीच्या आंब्यांबाबतच असायचं. 
दारोदार - घरोघर हापूस आला आणि सालं काढून, फोडी करुन आंबे खायचा शिष्टाचार बोकाळला. 
तरी हल्ली फायबरच्या नावाखाली बरीच फळं सालासकट खाल्ली जातात. सालं काढून सफरचंद खाणारे पाहिले की हे कुठल्या ग्रहावरचे प्राणी आहेत असंच वाटायचं आम्हाला. 
तर असो.

Enjoy your family togetherness. 
It's a blessing in disguise.

Have a great storytelling time !

Sketch by artist Sumitra Ahlawat

No comments:

Post a Comment