Sunday, 15 March 2020

सॅडर्डे-संडेच्या नशिबाची कथा...

सॅडर्डे-संडेच्या नशिबाची कथा...

फार दिवस नियमितपणे कुठलाही व्यायाम केला की आपलं शरीर आपल्या मनाचही ऐकेनासं होतं. आपल्या तावडीतून सुटून तेही बेटं स्वत:च्याच शिस्तबध्द तंत्राने वागायला लागत. 
परत मानो या ना मानो वयाचाही तगाजा लागतोच नशिबी.

सॅडर्डे-संडे योगाक्लासला सुट्टी म्हणून मस्त उशीरापर्यंत झोपावं म्हटलं तर कस्स्चं काय हो ? 
अलार्म वाजायच्या आधीच खट्टकिनी डोळे उघडतात मेले. 
खणखणीत जागं झालेलं शरीरही मग लोळायला कुरकुरायला लागतं. 
मग काय या लाडीगोडीवाल्या सॅडर्डे-संडेला चक्क लाथाडून उठावच लागतं आणि दैनंदिन कार्यक्रमात झोकून द्यावच लागतं. मग भलेही दुनिया घनघोर झोपलेली का असेना आपला दिवस कुरकुरत का होईना पण तुरुतुरु सूरु होतो.
 
मस्तपैकी हुंजा चहा बनवून व्हरांड्यातल्या आपल्या सिंहासनावर स्थानापन्न व्हायला म्हणून दार उघडावं तर माऊबाई आपल्या चेयरवर अंगाचं मुटकुळं करुन गाढ झोपलेल्या. च्यामारी सगळी दुनिया साखर झोपेत आणि आपलंच गणित चुकलेलं. 
जाऊद्या. 
No kurkur. Enjoy Sunday.

Hey, shuk..shuk...ऊठ. 
ऐ मावशे उठकीगं...चल ऊठ.

एखाद्या गरीबाने रिझर्व्हेशनच्या डब्यात विदाऊट रिझर्वेशन असताना पथारी पसरुन झोपी जावं आणि मग टीसीने त्याला खडबडून जागं करुन रिझर्वेशन दाखवं महटल्यावर तो बिचारा अर्धवट झोपेतला पामर इकडे तिकडे न बघता बखोटीला पथारी मारुन जसा निर्विकारपणे उठून चालू लागतो तशाच बेफिकीर अविर्भावात माऊबाई पाय उतार झाल्या. 
बरं पाय उतार झाल्यावर गुमानं दुसरीकडं जाऊन पडावं नं. पण तेही नाही. 
तिथ्थेच पायाशी घुटमळत आळोखे-पिळोखे देत शरीरातलं हाडन हाड मोकळं करुन दाखवणं चालू केलं. आता मान्य आहे की अस्मादिक चांगलीच योगासनं करतात. पण म्हणून का एका अश्रित मार्जार प्राण्याने आम्हाला खुन्नसवर चॅलेंज द्यायचं ? 
तेही सॅडर्डे-संडेला ? इत्ती जुर्रत ?

बा..बा...बा....बाबा!
काय ते शरीर ताणणं, काय ते पाठ गोलाकार करणं, काय ते पाय ताणणं, काय ती विश्वरुपी जांभाई, काय ते डोळे मिचकावणं...बघावं ते नवलंच. 

परत ही कवायत चकटफू दाखवून आपण कोणत्याच गावचे नसल्यासारखं आपल्याकडे चक्क काणाडोळा करणं. 
किती तो तोरा असावा एखादीला त्या वाघाची मावशी असल्याचा.
एकेकाला बरा जमतो असला दुस-यांना खिजवणारा नखरा.

जाऊद्या, आज आपल्या झोपेचही खोबरं झालं आणि आत्मविश्वासावरही बिब्बा पडला.

काय पण एकेक सॅडर्डे- संडे उगवतात बाई ?

No comments:

Post a Comment