फूलों के रंग से
दिल की कलम से.....
सध्या आमच्या किक्स या गाडीवर माझा हात बसवणं चालू आहे. त्यामुळे रोज सकाळी एक तासाभराचा ड्राईव्ह ड्रायव्हरला शेजारी बसवून चालू आहे. दोन तीन दिवस झाले वेगवेगळे रुटस काराक्रांत केले. आज म्हटलं चला गावातून गाडी फिरवू. कालच होळी-धुळवड झालेली गावही जरा सुस्तच असेल म्हणून मध्य शहरातल्या नेहमीच अत्यंत गजबजलेला असणा-या गल्लीत गाडी नेली. अपेक्षेप्रमाणे गल्ली सुनसान त्यामुळे तिचे नेहमीचे चहलपहलवाले गल्लीपण जाऊन सकाळचे ऐसपैस सुस्त रस्तेपण जाणवत होतं. हॉकर्सच्या विळख्यांमुळे या भागात स्कुटरसुध्दा चालवणं बरेचदा मुश्कील जातं. आज रस्ता अगदी स्वागताला पहुडल्यासारखा.
हं...बरेचदा आपल्याही गावात, आपल्या सरावाच्या भागात असे कधीमधी अवेळी जात रहावं. आपल्या गावाचं एक वेगळंच रुप आपल्याला भावून जातं.
सरसर गाडी हाकणं चालू होतं. मधेच रंगबिरंगी बाजार भरलेला दिसला. अरेच्या हे सकाळचं फूल मार्केट.
वॉव, झकासच आहे की.
जाऊ द्या, थांबायला नको.
आपला आत्ताचा एजंडा या गाडीवर हात साफ करायचा आहे. तशीही या गल्लीत गाडी थांबवणं म्हणजे वैतागच आहे. थोडी पुढे गेले तर ताज्यातवान्या आणि रंगबिरंगी फुलांचा सुगंधी बाजार अजूनच ऐसपैस झालेला दिसला. शेवटी राहवलंच नाही. गाडी बाजूला पार्क करुन झपाट्याने या बाजारात शिरले. नुकताच पुण्याहून माल येऊन पडला होता. बोली लावून खरेदी होत होती. पोत्यांनी गुलाब, झेंडू व मोग-याची फुलं होती.
मोकळा रस्ता, दुतर्फा दोनेक मजली जुन्या इमारती, खाली फुटकळ-फटीचर दुकानं, पण दुकानासमोर मात्र फुलांच्या राशी पडलेल्या. जेमतेम दोन गल्ल्यांमधला बाजार पण इसका नुर देखकेही दिल रुमानी हो गया.
आजपर्यंत कोणीच कसं आपल्याला या फूल बाजाराविषयी बोललं नाही किंवा आपल्याही आजपर्यंत हे कसं लक्षात आलं नाही बरं ? दुनियेभरचे सगळे बाजार पालथे घालण्यात आपण माहीर, पण आपल्या गावच्याच या बाजाराकडे कसं बरं आपलं दुर्लक्ष झालं ? खटाखट फोटो काढताना मनात अशा प्रश्नांची मालिकाच सुरु झाली.
जवळपास सर्व ठोक व्यापारी मुसलमान. फुटकळ दुकानदार आपापला माल घासाघीस करुन उचलताहेत. अगदी एखाद दुसरं कुटुंब वैयक्तिक खरेदी करताहेत. पण एकुणच पुरुषांचच राज्य आहे या बाजारात.
आता इतर मेट्रोपॉलिटिन शहरांपेक्षा हा बाजार नक्कीच छोटा असेल तरीपण पर्यटन नगरीतल्या पर्यटकांना या बाजाराची सैर नक्कीच आवडेल. आजपर्यंत कुणी असा पर्यटकांना या छोटेखानी बाजारात फिरवायचा प्रयत्न केलाय का ?
It's so wonderful.
एक अर्ध्या तासाची सक्काळची रपेट पण दिवस सुगंधी करायची ताकद असलेला हा बाजार खचितच आहे.
झेंडू, गुलाब, मोगरे, शेवंती, निशिगंध व इतरही काही एग्झॉटिक फूलं. पोत्यांनी पडलेली. होलसेलचा बाजार त्यामुळे किमतीही वाजवी.
कुठल्या मुहुर्तावर गाडी इकडे आणली कोण जाणे, मला तर एक सुगंधाची कुपीच सापडली.
इथल्या वरच्या मजल्यावर रहाणा-या लोकांची काय मजा आहे नं?
रोज दाराशी फुलांच्या राशी. रोजची सकाळ सुगंधाने दरवळणारी. कोणे एकेकाळी गुलमंडीवर फुलांचा मोठ्ठा बाजार होता म्हणे.
आताचा बाजारही फार छोटा नाहीये तसा.
श्रीखंडातल्या केशराच्या काडी इतकंच याचं महात्म्य.
रंगाला मोहक असणारा, सुगंधाला बिनतोड उतरणारा, आणि बघणा-याची नजर निववणारा हा फूलबाजार औरंगाबादची एक अनोखी शान आहे.
So Aurangabadkars, please make sure that you visit this phul bazaar.
It's sheer bliss to be here.
#LoveYouAurangabad💓
No comments:
Post a Comment