संक्रमण...
रोटरी युथ एक्स्चेंजच्या कार्यक्रमात औरंगाबाद शहरात, भारतात साधारणतः फ्रांस, ब्राझील, इटाली, जर्मनी, कॅनडा इथुन बहुतांश मुलं मुली येतात. ढोबळपणे पश्चिमेकडून येणारी मुलं जास्त असतात.
भारतात आल्यानंतरचा पहिला महिना नवलाईचा असतो. नंतरचे दिवस श्रावण, गणपती, नवरात्र, दिवाळीत जातात. त्यानंतर ही मुलं इतर अशाच पाच पंचवीस मुलांबरोबर दक्षिण भारताच्या दिर्घ ट्रिपला जातात. एकाच मानसिक अवस्थेतल्या या मुलांची लगेच घट्टमुट्ट मैत्री होते. भारतातले बरे वाईट संस्कार, घरोघरचे रितीरिवाज यावर ही मुलं अहमिकेनी चर्चा, भांडणं करतात. थोडे स्थिरावत नाहीत की हिवाळा येतो आणि अक्षरशः लग्न, संमेलनं, रोटरी कॉन्फरन्सेसची, इतर सांस्कृतिक समारंभाची मंदियाळीच लागते. भराभर दिवस संपतात आणि नवीन वर्ष उजाडतं. मग मात्र या मुलांच्या मनात सुरु होतो एक हुरहुर लावणारा काऊंट डाऊन. लास्ट फ्यु मंथच, लास्ट फ्यु विक्स आणि डेज असं मोजत ही मुलं एप्रिलच्या आसपास भारत सोडायच्या कल्पनेने अस्वस्थ व्हायला लागतात. एकमेकांना भेटले की हाऊ मच दे हॅव चेंजड्, आणि आता आपल्या पालकांना देखील आपल्यातले बदल मान्य करणं अवघड जाणारे अशा चर्चा करु लागतात.
म्हटलं तर आता ख-या अर्थाने इथले दिवस एंजॉय करायला लागतात. पण मनामधे हे आता संपत आलंय, पुन्हा कधीही हे दिवस, हा देश अशा पध्दतीने वाट्याला येणार नाहीयेत याची प्रचंड हुरहुरही असते.
त्यांची पश्चिमेकडची जीवनपद्धती आणि आपली जीवनपद्धती यांचा ही मुलं फार खोलवर जाऊन तौलनिक अभ्यास करतात. या अनुभवावर आधारित असे आयुष्यावर दुरगामी परिणाम करणारे निर्णयही मनोमन घेतात. त्यावर बोलताना लॉजिक वापरतात, सेंटिमेंटल होतात. या काळात या मुलांशी बोलणं एक अतिशय ह्रद्य अनुभव असतो. फक्त बोलतं करा त्यांना, घडाघडा सगळी खळबळ, हुरहुर मोकळेपणाने सांगतील.
पाश्चिमात्य देशातून आपल्या देशात वर्षभरासाठी आलेल्या या सुकुमार मुलांच्या भावना, विचारांची दिशा समजुन घेणं आपल्यासाठी देखील डोळे उघडणारं असतं.
काही मुलं तर कुटुंबियांपेक्षा त्यांच्या पाळीव प्राण्यांना जास्त मिस करताहेत असं गमतीत सांगतात.
ताटातला तुप मेतकूट भात बोटं चाटत संपवताना मी आता माझ्या देशात गेले की हातानेच जेवणार आहे आणि you should not have problems about it हे तिथल्या पालकांना फोनवरनं आधीच ठणकावून सांगून ठेवतात. लेटिशियाने तर घरच्यांना आवडो न आवडो परतल्या नंतर जाऊ तिथे कुर्तीज, स्टोल्स, मोरणी, पैंजण अशा एकदम भारतीय गोष्टी वापरायचं ठरवलयं. I just don't want to forget India. Ofcourse I will be happy to go back. But after two days, what ? I will miss India terribly. मेलिनने तर आपल्याकडचा पाण्याचा तुटवडा बघून आणि आता आंघोळीसाठी बकेट आणि मग वापरत असल्यामुळे फ्रांसमधे घरी गेल्यावर शॉवर घेणं बंद करायचं ठरवलंय. It's so easy with bucket and mug. We waste so much water with shower. Na, I am not going to use shower again. दोघीही मुली टॉयलेट्समधल्या इंडियन पॉटसवर जाम खुश आहेत. Hygenically it's so good and it's sitting posture is too good for your bowel movement.
एक जानेवारीपासून एकीने नॉनव्हेज खाणं सोडलयं, तर दुसरीला त्यातली भुतदयेची बाजू कळतीये पण I love that food so much. It's difficult to stop non-vegetarian, but yes I have understood it's not good to kill someone for your taste. But to give up is also difficult.
परवा चारठाण्या घेऊन गेले तर तिथल्या ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याने, आपुलकीने अगदी भारावून गेली ही मुलं. Now they can relate to Indian culture impartially. भारतीय मसाले, खाद्यपदार्थांशिवाय जगणं आता अशक्य वाटायला लागलं आहे.
इथली गर्दी, अस्ताव्यस्त रहदारी, धुरळे, वास, कोलाहल इतकं सगळं अगदी श्वासात भिनलं जातं की मायदेशी गेल्यावर चार दिवसांत आपण भारतासाठी होमसिक होऊ याची खात्री या मुलांना पटून ती अजूनच कसनुशी होतात. हळवी होतात. यांची ही मानसिकता त्यांच्या ख-या पालकांना समजणं अशक्य असतं. मग ही मुलं आपल्यासारख्याच सहप्रवासी असलेल्या इतर एक्स्चेंजमधल्या मुलांशी भावनिकरित्या इतकी जोडली जातात की आपला विश्वासही बसत नाही.
हजारो किलोमीटरच्या अंतरावरची ही विविध देशातली मुलं पण भारताच्या नाळेने आयुष्यभरासाठी ऋणानुबंधी होऊन जातात.
एका गावचं माहेर असलेल्या सासुरवाशीणीत जसं जीवाभावाचं मैत्र निर्माण होतं तशीच यांची इतर एक्स्चेंजर्सशी भावनिक मैत्री होते.
They understand each other more than their parents. मला वाटतं इथेच पालकांचा हात सोडायची प्रक्रिया सुरु होऊन ही मुलं ख-या अर्थाने स्वतंत्र आणि निर्णयक्षम होतात. चांगलं-वाईट ठरवायला लागतात. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पंखावर घ्यायला तयार होतात, आतूर होतात.
शिंपल्यातल्या मोत्यासारखा एक अनुभव आणि या सुरवंटांची सुरेख फुलपाखरं होताना बघणं खरोखर जगणं समृद्ध करतात.
No comments:
Post a Comment