Wednesday, 22 January 2020

सुया..मनी...पोत....

सकाळची वेळ, अचानक दारावर सुया..मनी..पोतचा आवाज आला. या गल्लीत पहिल्यांदाच. काहीही घ्यायचं नव्हतं तरी आपली त्या ग्रामीण महिलेची सुया, मन्यांची हारी बघायची इच्छा झालीच. 
शोकेसिंग इंडिया साठी लेटिशिया आहेच घरात. 
आवाज देत बोलावलं तर काळीभोर, पुरुषी चेहरेपट्टीची, ललाटभर पिवळं कुंकू भरलेली महिला अंगणात उभी राहिली. हात देऊन डाली उतरवली तर चमचम क्लिपा, चटपटीत बांगड्या, बाळांच्या हातातल्या पांढ-या-काळ्या बांगड्या, नजर-दृष्ट लागू नये म्हणून घालायचे ताईत, काही क्रिम्स, आरसे, कंगवे आणि एका डब्यात काळे, सोनेरी मणी आणि सुया. भरभर आम्ही मागितलेला पसारा बाहेर काढला. 
बाई ठसकेबाजपणे गप्पीष्ट. मराठीला तेलगू हेल. 
रुप म्हणाल तर सोलापुरी चादरच. निब्बर हात-पाय, रापट, सुरकतलेला रांगट चेहरा. बटबटीत साडी, भरताडी स्वेटर, केस विस्कटलेले कुठं म्हणून तलमपणा नाही. बोलणही दादागिरी छाप आगाऊ.
एकुणच आयुष्यात बरंच भरडलेलं गेलेलं व्यक्तिमत्व आहे हे जाणवत होतं. थोडेफार काळे-सोनेरी मणी घेतले, घासाघीस करत हिशोब केला तर मी माय रंडकी-कंडकी हाय, जरा पैशे दे की मला म्हणत शंभर रुपयांची नोट कडसरीला लावल्या गेलीच. निघायच्या वेळी काई खायला तरी द्या बाई म्हणत गळ घातली. घरातलं उरलेलं जेवण ताटात दिलं तर बांधून देगं माय माझा ल्योक हाय घरी. पंगू हाय. नेते त्यासाटी. परत जेवण एका डब्यात बांधून दिलं तर जरा चहा तरी पाज गं माय म्हणत गळ घातली. मी चहा करुन आणे पर्यंत लेटिशियाशी गप्पा मारत बसली. आम्ही चहात साखर कपात टाकतो. गडबडीत मी साखरच विसरले. माय गं साखर तरी देगं म्हणत परत मागणी झाली. लेटिशियाला म्हटलं डबाच घेऊन ये साखरेचा. लेटिशिया आपली वन, टू करत एकेक चमचा साखर टाकत होती तर टाक आजून, वत आजून करत तिला भंडावून सोडलं. मग चहा झाल्यावर बाई आमच्यावर खुश झाल्या. लेटिशियाला चकटफू सप्रेम म्हणून दोन कंगवे दिले, मला चार-पाच सुया दिल्या, आशिर्वाद दिले. या बाईंच्या अंगात देव येतो म्हणे. सामान भरताना त्याही कथा सांगून झाल्या. साखरेने भरलेला डबा बघून पटकीनी डालीतला स्वत:चा रुमाल काढला आणि लेटिशियाला साखर द्यायचं फर्मान सोडलं. 
लेटिशियाचं ती. वन, टु, थ्री करत चमचा चमचा साखर त्या रुमालात टाकायला लागली. या बाईंची नजर अख्ख्या डबाभर साखरेवर. आजूक, आजूक करायला लागल्या तरी लेटिशियाला कळेना ना ते आजूक प्रकरण. शेवटी बाईंनी स्वत:च्याच हाताने अख्खा डबा त्या रुमालात उपडा करुन घेतला, लगोलग गाठोडं बांधलं, मला बडे शेठ ही पदवी देत परत माझ्यासह माझ्या लेकरांना तृप्ततेने आशिर्वाद देत माऊलीने बाहेरचा रस्ता धरला.

बारा गावचं पाणी पिलेल्या या खमक्या सुया-पोतवालीचं वागणं बघून बहती गंगा में हात धो लेना, बोट दिलं की मनगट पकडणे या म्हणींचा प्रत्ययच आला. 
एकुणातच रंगरुपामुळे, भोचक बोलण्यामुळे, तेलगू भाषेमुळे आणि सुया-मण्यांबरोबरच पंगू पोरासाठी आतडं तुटणारी ही कनवाळू पण रंडकी माय नक्कीच भावली.

No comments:

Post a Comment