ऑस्ट्रेलियातल्या लग्नघरात एक संध्याकाळ मोकळी मिळाली आणि जरा धावतपळतच सिडनीजवळच्या एका रेप्टाईल झुला व्हिजीट दिली. पर्यटनाला गेलं की अगदी काही तास सुध्दा काहीही नवीन न बघता, करता घालवणं म्हणजे एक गुन्हा असल्यासारखा हा झु व्हिजिटचा कार्यक्रम उरकला.
जरासं अंतरावरच झु, डोंगर कापून केलेले सुंदर रस्ते. तुरळक वहातुक. गप्पीष्ट मराठी चालक. इथे एका पुणेरी गृहस्थांच ड्रायव्हिंग स्कुल आहे. हा आजचा चालक त्यांचा कॉलेजवयीन पण कायद्याने गाडी चालवू शकणारा सुपुत्र. खूप गप्पीष्ट. दरवर्षी भारतात गणपती उत्सवात येऊन, ढोलपथकात भाग घेणारा हाडाचा मराठी मुलगा. इतर चालकांपेक्षा यांच्याशी गप्पा मारणं अजूनच मजेशीर वाटलं. शाळेतले स्थानिक व इतर परदेशी मुलं, देश निहाय एकमेकांशी असलेली खुन्नस, एॅबओरीजिनल्सचे प्रॉब्लेम्स, अस्वस्थता, त्यांचं सद्यपरिस्थितीतलं सोकावलेपण, शे-दोनशे वर्षांपूर्वी ब्रिटिश राजकर्त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या आडबाजूच्या एकांती बेटावर आणून सोडलेले ब्रिटिश कैदी हे इथले आधुनिक नागरिक. त्यांच्या आता पुढच्या पिढ्या आणि त्यांचा ओरिजनल ऑस्ट्रेलियन असण्याचा फुकाचा रुबाब, ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्तींपरी असलेली अनाकलनीय आकर्षणं, एॅबओरीजिनल्सच्या ड्रीमटाईम स्टोरीज...वगैरे. एकुणच एका तरुणांकडून ऑस्ट्रेलियन स्पंदनं समजून घेताना झु कधी आलं कळलंच नाही.
ऑस्ट्रेलियन खंडाला, देशाला शोभेसा आडमाप झु. झाडीत लपलेला, हिरव्या कुरणांनी रेखिलेला. बरेचसे प्राणी आजपर्यंत फक्त वाचूनच माहित होते ते प्रत्यक्षात पहायला मिळाले. तमाम ऑस्ट्रेलिया सारखीच इथे माणसं कमी. त्यामुळे सगळेच प्राणी सुखनैव विहरत होती. अर्थात पिंजऱ्यातच. चार सहा तरुण महिला कर्मचारी फटाफट कामं करत होत्या. पिंज-यात चारा टाकणे, लाकडं तोडणे, गवतकाडी जमा करणे इत्यादी बरीचशी आपल्या दृष्टीने पुरुषी कामं या गो-यागोमट्या महिला-मुली लिलया करत होत्या. अगदी तुरळक व्हिजिटर्स. आम्हीही आपले निवांत प्राणी बघत चाललेलो. पण ही अशी बंदिस्त अवस्थेतली घाबरलेली, लाजणारी, वैतागलेली प्राणी-पक्षी संपदा बघणं कंटाळवाणं होतं. कदाचित अभ्यासकांना ही पर्वणी वाटू शकते. पण उगाचच, लाकडा आड, दगडा आड, कपारीत, फांद्यांवर बुजून बसलेले, लपलेले प्राणी-पक्षी हुडकून बघणं, हे बघ, तो बघ करत इतरांना दाखवणं मनाला पटत नाही. इथेही तो वालाबीजला चारा खाऊ घालायचा कार्यक्रम होतो. पण फारसे व्हिजिटर्स नसल्यामुळे तो कार्यक्रम रहीत झाला होता. फोटोंमध्ये गोंडसगोंडूले दिसणारे कोआलाज निलगिरीच्या झाडांवर बघणं अतिशय कंटाळवाणे काम आहे. त्यांच्या त्या मंद आणि स्लो हालचाली सगळी मजा घालवून टाकतात. जिवंतपणाची तरतरी अशी नाहीच.
रमत गमत फोटो काढत तासभर छान फिरलो. परत स्वच्छ आणि नेटक्या वॉशरुमचा रस्ता सोवेनियर्सच्या गर्दीतूनच काढला. आणि परतीला लागलो.
रस्त्यातच एका ठिकाणी वॉटर बॉडी होती. बहुदा खाडी होती. इथे ब-याच लोकांकडे स्वत:च्या बोटी असतात. गाडीला टो करुन इच्छीत स्थळी बोटी आणायच्या आणि बोटिंगचा आनंद घ्यायचा. सुंदर संधीप्रकाश, समोर स्वच्छ पाणी, दोन्ही बाजूंनी खडकाळ डोंगर...तरी मन रमेना. आईस्क्रीम व्हॅनमधून आईस्क्रीम घेतलं आणि परतलो.
आमच्या उत्साही चालकाने परतताना एका मंदिरात नेलं. शांत, निरव परिसर. अजूनच निर्मनुष्य. मंदिराच्या सभामंडपातील दोन्ही भिंतींवर भारतातील तमाम लोकप्रिय देवतांचे छोटे कोनाडे. कोनाड्यात मुर्त्या आणि वर त्यांची नावं. इथेच राम, सीता आणि हनुमानाच्या मुर्त्यांसमोर राम और उनका परिवार अशी पाटी वाचून हसू आले. इतरही पाट्या गमतीशीर होत्या. घरी परततानाचा रस्ता नविन वसाहतीतून होता.
चढ उताराचा रस्ता, दुतर्फा सुंदर कौलारु, टुमदार घरं. घरासमोरच्या चढ-उताराच्या हिरवळी, उंच झाडं, तुडुंब फुललेले जॅकरंडा, एकेक घरात जीव अडकायला लागला. फोटो तरी किती काढणार ? नजरेनीच ही सुखावह दृश्य टिपली आणि आळंबळं उरकलेलं पर्यटन आटोपून परतलो.
No comments:
Post a Comment