ब्लु माउंटन, जेनोलन केव्हज. सिडनी.
लग्नघरात परत असाच एक दिवस मिळाला आणि आम्ही सिडनीपासून साधारण दोनशे किलोमीटर दूरच्या ब्लु माउंटन आणि जेनोलन केव्हज बघायला निघालो. आज लग्नघरातले दोन पाहुणे पण आम्हाला सामील झाले त्यामुळे भाड्याची मोठी गाडी घेऊन निघालो. इथे गाडी मिळणं सोपं आहे पण तो तासावरचा ड्रायव्हर परवडत नाही. आणि तसाही ड्रायव्हर उपलब्ध नव्हताच. तरी मला वाटतं मराठी खात्यापित्या घरातल्या एका सिए मराठी व्यक्तीने मैत्रीखातर ड्रायव्हर म्हणून नव्हे पण आमची गरज ओळखून यायचं ठरवलं. आम्हाला तर काय सोने पे सुहागाच. गप्पा मारायला, ऑस्ट्रेलियन जिवनशैली विषयी सांगायला चांगलाच आपला माणूस मिळाला. परत प्रवासभर हिंदी गाण्यांची रेलचेल. धमालच आली.
इथली अंतरं म्हणायला खूप किलोमीटर्सची असली तरी आडमाप पसरलेला देश, तुरळक माणसं, अतिशय उत्तम रस्ते, सुरळीत वाहतुक व्यवस्था आणि सुखद हवा त्यामुळे हे प्रवास कंटाळवाणे होतच नाहीत.
तर सकाळी भरपूर थंडीचा जामानिमा करुन झटपट उत्साहातच निघालो.
भरपूर गप्पा, सुंदर हवा, रस्ते आणि निसर्ग..
त्या ब्लु माऊंटनला कधी पोहोचलो कळलंच नाही. सकाळची वेळ, कोवळं ऊन, भरपूर थंडी आणि डोंगरातलं भन्नाट वारं. उतरल्या उतरल्याच काकडलो. पण ब्लु माउंटन या नावाला साजेशा दूरवर पसरलेल्या डोंगरांच्या निळ्या गहि-या लाटा पाहिल्या आणि नजर निवली. सर्वदूर पसरलेल्या आणि निलगिरीच्या घनदाट जंगलाने भरगच्च भरलेल्या द-या-खो-या, आणि वर निळंभोर आकाश, शुभ्र ढगांचे पुंजके. अगदी पिक्चर परफेक्ट दृश्य.
हवेतलं दव निलगिरीच्या पानांवर पडत, आणि त्यातून परावर्तित होणाऱ्या सुर्यकिरणांमुळे आपल्याला गडद निळा रंग दिसतो. म्हणून या ठिकाणाला ब्लु माउंटन म्हणतात. या द-या-खो-यात एॅबओरीजिनल्स वास्तव्य आहे. भरपूर मोठा विस्तिर्ण असा हा भाग आहे. तरत-हेच्या कंडक्टेड टुर्स इथे ऑपरेट होतात.
जंगल वॉक्स, ट्रेक्स, एॅडव्हेंचर एॅक्टिव्हीटीज...एक ना अनेक. परत सगळं सुनियोजित. कुठेही गर्दी, गोंधळ नाही. म्हणजे सिडनीचं डार्लिंग हार्बर असो वा ब्लु माउंटन मधला वॉक असो सगळं शिस्तीत जिथल्या तिथे.
तर उंचंच उंच सॅन्डस्टोनचे डोंगर त्यावरची झाडांची निळाई आणि काही डोंगर वर्षानुवर्षाच्या इरोजनने घासून सुळक्यांसारखे झालेले. इथेच ते प्रसिद्ध थ्री सिस्टर्स नावाचे विलोभनीय डोंगर आहेत. डोंगरकड्यांवर सुरक्षित असे बांधीव प्लॅटफॉर्म्स आहेत, छोटे छोटे पायरस्ते आहेत. सुंदर जंगली फुलझाडी. निवांत फिरावं, निसर्ग टिपावा आणि परतावं. कुठेही दुकानं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स नाहीत, विक्रेते नाहीत. एकुणातच सुशेगात अनुभव.
इथेच पुढे केबल कारने या डोंगरावरुन त्या डोंगरावर गेलो. पारदर्शक केबल कार मुळे चहुबाजूंनी निसर्ग न्याहाळता येतो. पण अशी उपराउपरी जंगलं बघण्यातली मजा लगेच संपुष्टात येते. जंगलं चालत चालत अनुभवायची असतात. इथल्या ऑस्ट्रेलियन निसर्गात तिच मजा आहे. काहीही पाहिलं तरी अजून किती बघायचं शिल्लक आहे, जाणून घ्यायचं बाकी आहे याचाच फार घोर लागतो जीवाला.
It's a huge land with so many unique features.
थ्री सिस्टर्स नंतर सिनिक रेल आणि केबल कारमधून जंगलात फिरायचा आनंद घेतला. नंतर जवळच्याच जेनोलन केव्हज या आडबाजूच्या ठिकाणी गेलो. हा सुरेख रस्ता तर अजूनच निर्मनुष्य आणि निरव.
दुतर्फा सुंदर हिरवीगार कुरणं, दाट झाडी. संगतीला हिंदी गाणी.
One of the best drives in Australia.
प्रचंड पहाडी प्रदेश. त्यासमोर आपण आपल्या गाड्या इवलुश्या वाटतात. एका कपारीत लपलेल्या चारदोन इमारती. तिथेच आमचा गाईड उभा. सॅन्डस्टोनच्या डोंगरांमधल्या कपारींमधे या रंगबिरंगी, वैविध्यपूर्ण अनेक गुहा लपलेल्या आहेत. सगळा चढ उताराचा, अंतर्गत अंधारी, कोंदट कपारींचा भाग असल्यामुळे दोन तीन प्रकारच्या टुर्स इथे ऑपरेट होतात. आमच्यासारख्या नवख्यांसाठी ज्या सुलभपणे पहाण्याजोग्या केव्हजचा ग्रुप होता त्याची आम्ही तिकिटं काढली आणि गाईड येईपर्यंत फोटो काढत बसलो. अजिबात गर्दी नाही. आणि हजर असलेल्या माणसांचाही मुळीच आवाज नाही.
गाईडच्या मार्गदर्शनाखाली खडक चढलो व आत आत अंधा-या कपारीत जाऊ लागलो. थोडी फार लाईमस्टोन्सची चित्रविचित्र फॉर्मेशन्स दिसली. पण जसे जसे आत अंधारात शिरु लागलो तसे तसे हजारोवर्षांच्या पाण्याच्या प्रवाहातील मीठाने तयार झालेले चित्रविचित्र आकार. वळणावळणावर चुनखडीच्या रंगबिरंगी आकारांनी, हिरव्यागार पाण्याने नजरबंदीचा खेळ सुरू केला. मोजकीच लोकं होती तरी पण अंधा-या गुहेत दाटीवाटीने उभं राहून, कसाबसा मोकळा श्वास घेत त्या चुनखडीची अनोखी रुपं बघणं अवर्णनीय होतं. निसर्ग काय भरभरुन देतोय आपल्याला. आपणच निसर्गाला समजून घ्यायला, सांभाळायला थिटे पडत आहोत. साधारण तासाभराची टूर पण एका नैसर्गिक विस्मयकारी जगतात घेऊन गेली. इथे थोडंसं अंधारी कपा-यांमुळे गुदमरल्यासारखं होतं. पण रंगबिरंगी, चित्रविचित्र आकारांची दुनिया काठाशी घेऊन वहाणा-या या गुढ हिरव्या-निळ्या पाण्याची ओढ इथुन पाऊल उचलू देत नाही.
बाहेर उजेडात येऊन मोकळा श्वास घेतला आणि तिथल्या एका सोवेनियर दुकानात शिरलो. परत एकदा नेहमीच्याच यशस्वी वस्तू प्रामुख्याने होत्या. पण इथली सेमी प्रेशस स्टोन्सच्या वस्तूंची रेलचेल बघून आपलं अजिंठा प्रकर्षाने आठवलं. जांभुळका एॅमेथिस्ट बघून तर मला माहेरच माणूस भेटल्यासारखीच अपुर्वाई वाटली. संध्याकाळ होत आलेली. दहा मिनिटात जेनोलनचा परिसर सुनसान झाला. सायंकालीन सावल्यातले ते महाकाय खडक उरात धडकी भरवू लागले. परत एकदा सुंदर रस्ते, निरव शांतता, सुरेख कुरणं, घनदाट झाडी आणि गडदणा-या आकाशाची सोबत घेत घरच्या रस्त्याला लागलो.
No comments:
Post a Comment