Monday, 16 December 2019

ऑस्ट्रेलिया ट्रिप...१२ मेलबर्न

ऑस्ट्रेलिया ट्रिप...१२
मेलबर्न.
 
लग्न आटोपलं की आम्ही दुसऱ्या दिवशीच मेलबर्नला प्रयाण केलं. साधारण चार दिवस आम्ही तिथे वास्तव्य करणार होतो. सगळ्यात मेन एॅट्रॅक्शन होतं ते दि ग्रेट ओशन ड्राईव्हचं. 
या ट्रिपमधे आमच्याबरोबर ऑस्ट्रेलियातल्या नातलगांपैकी एक जोडी होती. त्यामुळे आम्ही ब-यापैकी निर्धास्त होतो. एआरबीएनबीचं बुकिंग केलं होतं त्यामुळे घरुन भारतीय, महाराष्ट्रीयन जेवण-खावण न्यायला ऊत आला होता. त्या मेलबर्नच्या एआरबीएनबीच्या किचनमधे काम करायची, पाक कौशल्य दाखवायची सगळ्याच महिलांना खुमखुमी आली होती. त्यामुळे चार दिवसांसाठी जगाच्या दक्षिण ध्रुवाजवळ जातांना देखील सामानाच्या वजनाचा अभुतपुर्व घोळ घालत सिडनी एयरपोर्टवर ट्रिपचा म्ह-हाटी शुभारंभ केला. 
दुपारचे तीन वाजत नाही की मेलबर्नला पोहोचलो. भाड्याच्या गाडीचे सोपस्कार पार पाडत झटपट मेलबर्नच्या फ्लिंडर्स स्ट्रिट या मध्यवर्ती भागातलं आमचं घर ताब्यात घेतलं आणि  या शहरातला पहिला फेरफटका मारायला बाहेर पडलो. 

मेलबर्न.
एकदमच चैतन्यदायी शहर आहे. सिडनी सारखंच स्वच्छ, प्रशस्त पण जरा जास्त माणसाळलेलं. रस्त्यांवर छान पण शिस्तीतली गर्दी. गाड्या, ट्राम्स, सायकलीस्टस् आणि पादचाऱ्यांची लुभावनी लगबग. चौकाचौकात झगमगणारं क्रिसमसचं डेकोरेशन, आडबाजूला विमनस्कपणे पडलेले भिकारी-ड्रगिस्ट, चौकाचौकातली स्थलनिर्देशक मोहक लोहशिल्प, रस्त्यांवरच्या हरेक झाडाच्या बुंध्यांना रंगबिरंगी लोकरीच्या क्रोशाने क्रिसमसयोग्यतेचे डिझाईन्स असणारे विणलेले चौकोन, पट्ट्या बघून तर खात्रीच पटली की हे रसिकांचं गाव आहे म्हणून. 
रोषणाईत झगमगून उठलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आर्किटेक्चर असलेल्या इमारती, रस्ते आणि आपल्याच तालात गर्क असलेली चटपटीत गर्दी. मेलबर्नच्या पहिल्या दर्शनानेच मोगॅंबो खुश हुवा. 
सुदैवाने आमच्या हॉस्टेलचं कार पार्किंग बरंच दूर होतं. त्यामुळे गाडी लावून घरी परतताना अनायसे रस्ते, चौक ओलांडताना बरचं काही बघून व्हायचं. मग ती एॅबओरीजिनल्सनी रस्त्यांवर चितारलेली त्यांची कला असो वा एखादा म्युझिशियनचा आविष्कार असो वा संध्याकाळच्या गारव्यातला कॉफीचा दरवळ असो वा एखाद्या जगप्रसिद्ध संस्थेचं आर्किटेक्चर असो. 

एकुणातच इथली कुंडली जमली आणि इथे आता छानच गंमत येणार आहे या सुखद भावनेनी एक झकासच at home फिल आला.

No comments:

Post a Comment