Friday, 20 December 2019

ऑस्ट्रेलिया ट्रिप...१३ दि ग्रेट ओशन रोड. मेलबर्न.

मेलबर्न मधल्या दुसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध दि ग्रेट ओशन रोडच्या ड्राईव्हला बाहेर पडलो. अर्थात हायर्ड गाडी आणि घरातलाच चालक असल्यामुळे एआरबीएनबीमधला आमच्या मर्जीतला चहा, ब्रेकफास्ट उरकूनच पहाटेस बाहेर पडलो. 

दि ग्रेट ओशन रोड हा साधारण २५० किलोमीटरचा मेलबर्न जवळचा साऊथ इस्टर्न ऑस्ट्रेलियातला एक सिनिक रोड आहे. It's world heritage site and the  biggest-longest war memorial. दुसऱ्या महायुद्धातील परतलेल्या सैनिकांकडून हा देखणा रोड बांधून घेतलाय. आणि त्या सैनिकांच्या स्मरणार्थच बांधलाय. 
ऑस्ट्रेलियाच्या साऊथ इस्टर्न किना-याजवळून जाणारा हा रस्ता आणि इथला प्रवास खरोखरच फार सुंदर आहे. एकाबाजूला खडकाळ किनारे, सर्फिंगला सुयोग्य असणारा नितळ समुद्र तर दुस-या बाजूला कधी घनदाट झाडी, तर कधी हिरवीगार कुरणं तर कधी राखाडी-करडी झुडपं. येऊन जाऊन हा प्रवास सहाशे किलोमिटरचा होतो पण कधीही थकवा जाणवत नाही.
गुगलताईच्या म्हणा वा गुगलकाकाच्या नादाने म्हणा  आम्ही जरा रस्ता चुकलोच. साधारणपणे दोन तासा साठी अंतर्गत रस्त्यानेच फिरलो. पण लगेचच कनेक्टेड रोड मिळाला आणि फेसाळत्या निळावंत समुद्र किना-याला लागलो. 
तसंही आम्ही दोघं फिरतो तेव्हा सहसा राऊंड ट्रिपच करतो. शक्यतो राजमार्ग जाता येता टाळतो. परिसर डावी-उजवी बाजू करत पहाण्याकडे आमचा कल असतो. थोडक्यात आमच्या स्टाईलने या रस्त्यावर फिरणं झालं.

या रस्त्यावरचा ड्राईव्ह हे ऑस्ट्रेलियातलं मेन टुरिस्ट एॅट्रॅक्शन आहे. आधीच अगणित नैसर्गिक वैविध्य असलेला महाकाय देश-खंड, त्यात सगळंच जिथल्या तिथे, टापटीप, निटस. मग हे तर अत्यंत आकर्षक ठिकाण. कुठलीही खोट काढता येणार नाही असा सुबक, देखणा रस्ता, दुतर्फा नैसर्गिक सौंदर्याची रेलचेल, सुंदर हवामान, एका हाताला फेसाळता इंडियन ओशन तर दुस-या हाताला हिरवं अंगण...खरोखर its a dream journey. 
साधारणपणे भारतीयांना म्हणजे मला अरेबियन सी, बे ऑफ बेंगाल फारतर पॅसिफिक, एॅटलांटिक ओशन माहिती असतात. दक्षिण गोलार्धात असलेल्या महाकाय ऑस्ट्रेलियाला कोणकोणत्या समुद्रांनी वेढलयं हे या लेखासाठी व्हेरिफाय करायला आमच्या घरातला ग्लोब पाहिला तर चकीत झाले. It's our Indian Ocean. 
ऑस्ट्रेलिया समोर भले आपला देश लहानखुरा वाटतो पण या खंडाला वेढलेल्या अथांग महासागराला इंडियन ओशन हे नाव पाहून खचितच अभिमान वाटला. बसल्या बसल्या मुठभर मासही चढलं. 
तर हा रस्ता खरोखर अवर्णनीय आहे. दर पन्नास -साठ किलोमीटरवर असलेली अनोखी निसर्गदृश्य हा प्रवास अजूनच मनोरंजक करतात. चुनखडी आणि सॅन्डस्टोनचे मोठाले रंगीत खडक, शतकानुशतकांच्या वा-यामुळे, समुद्रलाटांमुळे या खडकांचे झालेले इरोजन, त्यामुळे या खडकांना प्राप्त झालेले आकर्षक आकार मनाला मोहवून टाकतात. याच प्रवासात ट्वेल्व्ह एॅपॉस्टल्स, लंडन ब्रिज अशी नावं असलेली प्रेक्षणीय स्थळं आहेत. मुख्य म्हणजे बराचसा प्रवास उंचावरुन होतो. समुद्र ब-यापैकी खाली राहतो. त्यामुळे बहुतांश किनारे इतके नितळ आणि निर्मळ आहेतना की चुकुनही खाली उतरुन आपल्या पदचिन्हांचं काजळबोट या मुलायम, सोनेरी वाळूवर उमटवावसं वाटत नाही. काही ठिकाणी एॅप्रोचेबल बिचेस पण आहेत. पण एक दिवसाच्या ट्रिपमधे प्रत्येकच बिच पादाक्रांत करण्याइतका वेळ मिळत नाही. इथे प्राणी-पक्ष्यांचही खूप वैविध्यपूर्ण आहे. पण त्यासाठी निवांत रहायला पाहिजे. इथले किनारे अगणित प्रकारच्या बुशेसनी तुडुंब भरलेले आहेत. वैविध्यपूर्ण रंग रुपाची ही लहानखुरी, खुजी वनस्पती फार उत्सुकता चाळवते. पांढ-या-पिवळ्या-करड्या-हिरव्या-तपकिरी रंगाच्या या घनदाट वनस्पतींचे कितीही फोटो काढले तरी मन भरत नाही. इथल्या घनदाटीत अनेक प्राणीजीव सुखाने नांदतात. त्यामुळे इथे लागणा-या बुशफायरची फार काळजी घेतली जाते. ऑस्ट्रेलियन बुश फायर ही ऑस्ट्रेलियन प्रशासनाची कायमची डोकेदुखी आहे.

इतका मोठा जगप्रसिद्ध रस्ता, बावनखणी निसर्ग, अफाट समुद्र तरीही कुठेही रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, दुकानांची बजबजपुरी नाही. सगळा मामला शांततेचाच. 
हां, नाही म्हणायला झुंडीने फिरणारे जपानी आणि फिलिपिनो आपापसात कचकच बोलून खरोखर वैताग आणतात. आणि पाऊल टाकू तिथे ते आपलेच फोटो काढणं. बापरे ! हा तर एक फार मोठा सामाजिक रोगच जगभर पसरलाय. कुठे तो मैलोगणती पसरलेला समुद्र, आवाक् करणारा निसर्ग, अमर्याद आकाश आणि कुठे वितभराचे आपण ?
पण नाही, जाऊ तिथे आपलीच कलकल आणि आपलेच फोटो. या आजच्या ट्रिपचा आणि निसर्गाचा रसभंग कोणी केला असेल तर त्या कलकली पर्यटकांच्या झुंडींनी. असो. 

जाऊन येऊन ही दि ग्रेट ओशन रोडची ट्रिप झकासच झाली. अख्खा प्रवासच प्रेक्षणीय असल्यामुळे टिपिकल साईट सिईंगसाठीची चढ उतार, पळापळ, तंगडतोड नव्हती. गाडीत बसल्या बसल्या आमच्याही खूप छान गप्पा झाल्या. 
एकत्र पर्यटनला बाहेर पडलं की प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वातले अनेक चांगले वाईट पैलू आपल्याला कळतात. आपल्याही आणि दुस-यांच्याही धाडसाची, सोशिकतेची, प्रसंगावधानाची एक नवी ओळख आपल्याला होते.  

Indeed, The great Ocean road trip is the best road trip for family.

No comments:

Post a Comment