दि ग्रेट ओशन रोड ट्रिपनंतरच्या दुस-या दिवशी आम्ही बॅलार्ट इथल्या सोवेरीन हिल्स या भागात गेलो. परत तास दोन तासाचा सुरेख ड्राईव्ह. नक्की काय बघायला मिळणार आहे याची मुळीच कल्पना नव्हती. एकेकट्याच्या प्रवासात तसं ब-यापैकी ऑर्गनाईझ्ड रहाता येतं. रोज काय पाहिलं याची टिपणं काढून ठेवता येतात. उद्या काय पहायचय याचही जरा नेटवर सर्फिंग करुन ठेवता येतं. पण ग्रुपची मजा म्हणजे सततच व्यवधान न ठेवलं तरी चालतं जरा रिलॅक्स असं रहाता येतं. तसंही एखाद्या ट्रिपमधे दिर्घ काळपर्यंत पर्यटन करत असाल तर नंतर ही एखाद्या ठिकाणाची माहिती काढून, वाचून फिरायची गाडी लडखडायला लागते.
तर ते असो.
सोवेरिन हिल्सची पाटी कोरी होती. झटपट गाडी पार्क करुन एका इमारतीत शिरलो तर अठराव्या शतकातल्या ब्रिटिशांसारखी वेषभुषा केलेल्या एका महिलेचे दर्शन झाले. क्षणभर हे दृश्य बघून थबकायलाच झालं. तसाच तो अंगाबोंगा घोळदार फ्रिलवाला गाऊन, फुग्याच्या बाह्या, डोक्यावर बॉनेट. अगदी सिंड्रेलाच जणू. अगदी निशब्द पणे या महिलेच्या दर्शनाने आमचे स्वागत झाले. तिकिटं काढून आत गेलो आणि लक्षात आलं अरेच्या इथे काळ थांबलाय किंवा थांबवला गेलाय.
सोवेरिन हिल्स.
अठराव्या शतकाच्या मध्यावर ऑस्ट्रेलियातल्या या भुमीत सोनं सापडलं आणि सगळ्या जगाचं लक्ष इकडे वेधलं गेलं. अर्थातच सत्ता चाणाक्ष ब्रिटिशांच्याच हातात होती. झटपट वसाहती वसवल्या गेल्या. खाण कामगार आले. त्यांची घरं, मुलांच्या शाळा, बाजारपेठा, दवाखाने, चर्चेस उभी राहिली. थोडक्यात एक गावच इथे वसलं. अर्थात नंतर सोनं संपलं आणि एकेकाळची ही धगधगती वसाहत अक्षरशः ओस पडली.
१९७०च्या सुमारास या जागेला परत नव्याने संजीवनी मिळाली. जुनीच घरं, दुकानं, चर्चेस निट करुन घेतली. एक खाण नमुन्यादाखल जिवंत केली. माणसांच्या वेषभुषा देखील त्याकाळातल्या सारख्या करुन अक्षरशः अठरावं शतक आपल्यासमोर उभं केलेलं आहे. त्याकाळातल्यासारखी लाकडी घरं, राहुट्या, चर्चेस. तशीच निरनिराळ्या वस्तूंची दुकानं, दुकानातल्या वस्तू, ती विकणारे विक्रेते, एकूण एक बाज अठराव्या शतकातला. आणि हल्लीच्या जाऊ तिथे सोवेरियन घेऊच्या जमान्यात इथल्या ब-याच गोष्टी प्रिमियम रेटला विक्रीसाठी पण होत्या.
एकूणच ही काळ थांबवायची व्हिज्वुल गंमत थोरामोठ्यांनाही थक्क करते. लहानपणीच्या पुस्तकांमध्ये पाहिलेली जुनी ब्रिटिशकालीन चित्रातल्यासारखी ही माणसं, दुकानं, वस्तु, घोडागाडी बघून आपल्यातलं मुलं जागं होतं. मार्केटिंगचा जबरदस्त जमलेला हा नाटकीय खेळ आहे. त्याकाळातील एखादं ब्रिटिश गाव तंतोतंत आपल्यासमोर उभं रहातं. मग ते कास्ट आयर्नची भांडी असो, वा शिवणाचं साहित्य मिळणारं दुकानं असो वा किराणा दुकान असो वा बेकरी असो वा लायब्ररी असो. या लुटुपुटूच्या गावात फिरताना आपलंही मन हरखून गेल्या शिवाय रहात नाही. व्हिक्टोरिया-मेलबर्न मधलं हे अतिशय लोकप्रिय पर्यटकीय ठिकाण आहे. इथली प्रत्येकच गोष्ट विलोभनीय वाटते. त्यामुळे इथे दिवस कसा मावळतो कळत नाही.
या गावाच्या वेशीतून बाहेर पडलं की जवळच एक नवराबायकोने उभारलेलं म्युझियम आहे. मला आता फारसं त्याविषयी काही आठवत नाहीये यातच सगळं आलं.
एखाद्या अडगळीत पडलेल्या वास्तुला, परिसराला किती चपखलपणे टुरिस्ट एॅट्रॅक्शन बनवता येतं हे इथे येऊन प्रकर्षाने कळलं. अर्थात तमाम जगामध्ये एकेकाळी असलेली ब्रिटिशांची अपुर्वाई, एॅट्रॅक्शन देखील याला कारणीभूत आहेच.
For Indians it's easy to relate here.
As usual फिरुन पाय कुरकुर करायला लागले तसे परतीला लागलो.
रोज उठून एखादं ठिकाण बघणं, किती का रस्ते, निसर्ग चांगला असे ना का उठलं की पळणं नाही म्हटलं तरी अतीच होतं. At some point your mind stops to absorb the surrounding. And we were heading towards it. पण साचेबंद पर्यटनात याला पर्याय नाही.
घरी परतलो. जरा नेटवरनं माहिती घेतली तर जवळच एक रात्रीचा बाजार भरतो ते कळलं. जेवणं उरकून आम्ही चौघी बायका तातडीने बाहेर पडलो. ट्राम मधे बसलो तर दोघी तिघी गो-या मुली दारु पिऊन टुंग झालेल्या आमच्या शेजारी येऊन बसल्या. आधीच परका देश, गावं त्यात परत रात्रीची वेळ, उत्साहाने चौघीच बाहेर पडलेलो, त्यात ही बला. पण लगेच आमचा स्टॉप आला आणि त्या खिदळणा-या मुलींच्या तावडीतून सुटलो. एखाद्या आठवडी बाजारासाठी या विस्तिर्ण छपराखाली भरलेला बाजार. सगळा खेळ एका रात्रीतल्या काही तासांचा. तरीपण भरपूर गर्दी. क्रिसमच्या स्वागतासाठीची रोषणाई, उत्साही वातावरण. पाऊल ठेवताच आमचं महिला मंडळ खूश झालं. खायचे-प्यायचे अनेक स्टॉल्स, भरपूर कपडे, चपला, क्राफ्टी गोष्टी विक्रीला, साथीला संगीताचे सुर आणि धुंदावलेली तरुणाई. इथेच आम्ही एकमेकांच्या कमरेत हात घातलेले तरुण आणि एकमेकींच चुंबन घेण्यात गर्क असलेल्या तरुणी पाहिल्या आणि चकीत झालो. ऑस्ट्रेलियातला रेड लाईट एरिया बघायला मला विशेष इच्छा होती. पण त्याची काही अंशीची झलक इथे बघायला मिळाली. या ठिकाणी येणारे रस्ते अक्षरशः चैतन्याने भारलेले होते. काय बिशाद आहे इथे हरवायची. रात्रीचे दहा कधीच वाजून गेलेत तरी तरुणाई झुंडीने डेरे दाखल होत आहे. वळणावळणावर लाईव्ह म्युझिक सादर होतय. रस्तोरस्ती चित्र रेखाटली जाताहेत. कुठे म्हणून रात्रीचा दरारा जाणवत नाहीये. उलट त्या गहि-या नभात वर वर जाणा-या चंद्राबरोबर रात्र अजूनच रंगीन और मदहोश होत आहे.
तरीपण चक्क ऊसाचा रस पिऊन हाडाच्या भारतीय महिलांनी हा क्षण साजरा केला आणि परतलो.
Art, craft, music and love for life...
this is the thrusting pulse of Melbourne.
No comments:
Post a Comment