सोवेरिन हिल्स पाहिल्यानंतरच्या दुस-या दिवशी एकाच रस्त्यावरची दोन ठिकाणं बघायची होती. एक होतं डॅंडेगॉन जंगलातलं शिल्पकार विल्यम रिकेटसची शिल्पमय सॅंक्चुअरी आणि नंतर समुद्र किना-यावरचा पेंग्विन शो.
परत भैरु उठला आणि चरुन फिरायला निघाल्यासारखे सगळेच निघालो. मेलबर्न मधली सुंदर सकाळ, सुंदर रस्ते. झटपट मार्गस्थ झालो. वळणावळणाचे रस्ते पार करत, दमट जंगलाचा सुवास घेत विल्यम रेकीटस या मनस्वी शिल्पकाराच्या जंगलातल्या कर्मभुमीत पोहोचलो.
घनदाट जंगल. उंचीपुरी झाडं, त-हे त-हेचे झुडपं, फुलं-पानं-पक्षी. नजर टाकू तिथे काहीतरी नवीनच हिरवाई नजरेस पडत होती. निरव जंगलात अनोख्या पक्ष्यांच्या शिळाही घुमत होत्या. इथल्या सुरम्य गर्द झाडीतच लपली आहेत विल्यमची शिल्प.
विल्यम रेकिटस हा ऑस्ट्रेलियन शिल्पकार, कलावंत. निसर्गात रममाण होणारा. मातीशी, निसर्गाशी इमान राखणारा. ऍबओरिजीनल्सच्या संवेदना समजून घेणारा, राज्यकर्त्यांच्या दडपशाहीच्या विरुध्द शिल्पातुन व्यक्त होणारा. तरी देखील राज्यकर्त्यांनी विल्यमच्या कलात्मक तळमळीची दखल घेऊन त्याच्या झाडात, लाकडात कोरलेल्या शिल्पांची एक सॅंक्चुअरीच तयार केली आहे. माफक तिकीट काढून ही शिल्प बघत अनवट जंगलात फेरफटका मारता येतो. मानवाचं निसर्गाशी असलेलं आदिम नातं, ऍबओरिजीनल्सचा टाहो आणि मानव-निसर्गाचं एकमेकांवाचूनचं अधुरेपण व्यक्त करणारी ही शिल्प आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात.
विल्यम रेकिटस हा कलदंर कलावंत होता. आयुष्यभर त्याने आपल्या कलेलाच वाहून घेतले होते. सत्तरच्या दशकात भारतातल्या अध्यात्मिक विचारांना समजून घेण्यासाठी हा कलावंत काही महिने पॉन्डेचरीलाही राहून गेलाय. ही शिल्प सुंदर तर आहेतच पण या शिल्पांना कोंदणासारखं मिळालेलं हे आडवाटेचं जंगल देखील खूप मनोहारी आहे.
या ठिकाणी कितीही रमावसं वाटलं तरी पुढच्या डेस्टिनेशनची वेळेत पोहंचायची ओढ होती त्यामुळे झटपट पावलं उचलली आणि मार्गस्थ झालो.
No comments:
Post a Comment