विल्यम रेकिटसच्या सॅंक्चुअरी मधून तडक फिलीप आयर्लंडमधली पेंग्विनची परेड पहायला निघालो. आडबाजूचा सागरी आणि डोंगराळ प्रदेश. छोट्या छोट्या वसाहती. टुमदार घरं. घरासमोर प्रसन्न हिरवळी, अनोखी झाडं-झुडपं-फुलं. हवेत गारवा. स्वच्छ निळंभोर आकाश. ऑस्ट्रेलिया-मेलबर्नचा हा तुकडा देखील आवडला. मग वसाहती मागे पडून सागरी किनारा गाठायला लागलो तशी तशी वेगळीच वनसंपदा नजरेस पडू लागली. पिळे मारलेली खोडं, त्यांचे विविध रंग-टेक्श्चर्स. काय पाहू आणि काय नाही असं वाटायला लावणारे. सहा वाजता फिलीप बेटावर पोहंचायचच होतं नसता इथेच रमलो असतो. अर्थात व्हेजिटेरियन फुडवाल्यांची डाळ इथे शिजणं अवघडच आहे. झटपट चहा-कॉफी मिळायची देखील मारामार होती इथे. फिलीप आयर्लंडला फटाफट पोहोचलो तिकिटं ताब्यात घेतली आणि व्हिजिटर्स सेंटरमधे माहिती वाचत बसलो.
इथे वास्तव्य करणाऱ्या, दिसणा-या पेंग्विन्सची जात सर्वात लहान जात आहे. जेमतेम ३२ इंच उंचीचे हे पेंग्विन्स इथे हजारोंच्या संख्येने रहातात. अख्खा ऑस्ट्रेलियन समुद्र किनारा बुशेशनी, बुटक्या झुडपांनी व्यापलेला आहे. तर या बुशेशच्या खालच्या बिळात ही पेंग्विन्स रहातात. सकाळ झाली की लुटू लुटू चालत अर्ध्या किलोमीटरवरच्या समुद्रात जातात. नंतर पोहत पोहत अजून आत पर्यंत अन्नाच्या ओढीने जातात. सायंसावल्या खुणावू लागल्या की परतीचं पोहणं उरकत परत लुटुलुटू घराकडे परततात. या पेंग्विनच हे सायंकाळच समुहाने घरी परतणं बघायला पर्यटक हजारोंच्या संख्येने येतात. स्टेडियम सारखी लाकडी उतरत्या पाय-यांची रचना किना-यावर केलेली आहे. इथे सर्वसामान्य प्रेक्षक बसतो. मार्केटिंगच्या फंड्याप्रमाणे अजून जवळून, वरुन, फेस टू फेस पेंग्विन बघायची सोय प्रिमियम रेटने उपलब्ध असते.
साधारण सातच्या सुमारास आपल्याला पाय-यांचा ताबा मिळतो. पेंग्विन्स येईपर्यंत आपण समोरचा खळाळता समुद्र, मावळतीच्या नभाचे विलोभनीय रंग वा गेला बाजार पर्यटकांनी टाकलेल्या आयत्या खाद्यपदार्थांना चटावलेल्या सीगल्सचे विहरणं बघत बसावं. नसता गप्पाटप्पांच हुकमाचं पान आपल्या हातात असतंच की. वार्षिक सिझन आणि दैनंदिन तापमानाप्रमाणे साधारण रात्रीच्या आठच्या पुढे पेंग्विन्स दिसायला लागतात. अर्थात एवढ्या मोठ्या विस्तिर्ण किना-यावर कुठे बघावं हे आपल्याला कळत नाही. लाऊड स्पीकरवरनं डायरेक्शन्स मिळतात. जेमतेम अडीच तिन विताचे पेंग्विन्स नाही म्हटलं तरी एवढी झुंड पाहिली की बुजतच असतील ना ?
आधी जरा खडकांच्या आडोशाला हे प्राणी लपतात. पण जशी जशी त्यांची येणा-यांची संख्या वाढते, अंधारही दाटतो तसे तसे हे पेंग्विन तुरुतुरु किना-यावरच्या बुशेशमधे लपलेल्या आपल्या बिळांमधे, घराकडे येऊ लागतात. लहानखुरे असले तरी यांचं चमकदार पिवळट-पांढरं पोट या अंधारातही झळाळून निघत. यांची चालही फार पिक्युलियर असते. एकदा झुंडीने परतायला लागले की मग हे पेंग्विन अजिबात बिचकत नाही. अक्षरशः अर्ध्या तासात हजारो पेंग्विन किना-यावर थडकतात. इथे फोटो काढायचा फार मोह होतो. पण फोटो काढणं अजिबातच अलाऊड नाहीये. तरीपण ओहो, वॉव, अमेझिंग, ऑसमच्या असंख्य चित्कारांनी हे कष्टकरी पेंग्विन नक्कीच बावचळून जात असणार. पहिली उत्सुकता ओसरली की पर्यटक परतू लागतात. तरीही अजून या पेंग्विनच्या झुंडी थडकतच असतात.
व्हिजिटर्स सेंटर ते किना-यापर्यंत यायला लाकडी वॉक वे बनवलेला आहे. या वॉक वेच्या आसपासच असंख्य बिळं म्हणजे पेंग्विनची घरं आहेत. त्यामुळे परतताना तर अजूनच जवळून ही कलकल करत घराकडे परतणारी मंडळी पहायला मिळते. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे जो तो पेंग्विन आपल्याच घराकडे बिनचूक परततो याची आहे. इतकी बिनचूक घराकडे परतणारी तर माणसं देखील नसतात हो.😉
इतका छोटा जीव, पण अन्नाच्या शोधात बर्फासारख्या गार समुद्रात दहा-बारा किलोमीटर आतपर्यंत जातो. धडपड करत भक्ष्य मिळवतो आणि तिन्हीसांजेला परत आपल्याच घरी नाकासमोर चालत परततो.
व्वा, मान गये उस्ताद.😁
मिसेस पेंग्विन्सची मुलाखत तातडीने घ्यायला पाहिजे.😊
असो. इथे भरपूर गारठा असतो. त्यात परत तासाभरापेक्षा जास्त बैठक झाल्यामुळे काकडायला होतं. एक हजार दोन हजार पेंग्विनची ही लुटुलुटू घरवापसी पाहिली, बिळातून येणारी लेकरांची च्याव, च्याव ऐकली की कौतुक संपतं आणि परतीचे वेध लागतात. परत एकदा परतीचा मार्ग सोवेनियर्सच्या दुकानातून जातो. इथले मार्केटिंग जबरदस्त आहे.
परतताना उगाचच त्या पेंग्विन साठी वाईट वाटले.
कुण्या शहाण्याला या जागेचा शोध लागला कोण जाणे.
बिचारे पेंग्विन. आपल्याच घरात यायची चोरी. तेही मीठ-भाकरीसाठीचे कष्ट करुन. एवढी पब्लीक बघून हे पेंग्विन आधी बिचकतात, बुजतात, घाबरतात आणि मग नाईलाजच असल्यामुळे ब्रेव्ह फ्रंट ठेवत घराकडे परततात.
उद्या आपल्या दैनंदिन हालचालींवर कुणी असा वॉच ठेवला तर ?
परतताना एका कांगारुने आमच्या गाडीला धडक दिली. कांगारुला आणि गाडीलाही काही झाले नाही. पण धडाक्न आवाजानेच कांगारुची ताकद कळली.
हायर्ड गाडी असल्यामुळे इन्शुरन्सच्या कव्हरेजची चिंता करतच घरी परतलो. इथले कायदे कसोशीनेच पाळावे लागतात. आमचा प्रश्न नव्हता. आम्ही तर आता काही दिवसांचे पाहुणे होतो. पण आमच्या ऑस्ट्रेलियन नातलगांच्या ड्रायव्हिंग लायसन्सला अडकाठी आली असती तर पंचाईत झाली असती. पण कुठलीही अडचण न येता सुटलो.
No comments:
Post a Comment